टेनिस खेळाडू खेळताना का किंचाळतात? त्यामागचं स्पर्धक आणि प्रतिस्पर्धीचं मानसशास्त्र जाणून घ्या !!

(मारीया शारापोव्हा)
टेनिस खेळणारे बहुतेक खेळाडू सर्व्हिस करताना किंवा परतवून लावताना जोरात ओरडताना किंवा किंचाळताना दिसतात! मोनिका सेलेस, सेरेना विल्यम्स आणि शारापोवा या बायका म्हणजे तर ओरडण्या-किंचाळण्याचा कहर आहेत! आता या ओरडण्याला इंग्रजीत ' ग्रंटींग' असा शब्द आहे आणि मराठीत हुबेहुब अर्थवाही शब्द नाही म्हणून किंचाळणं हा शब्दच आपण या लेखात वापरणार आहोत.
गेली अनेक वर्षं अकारण किंचाळण्याचा आरोप अनेक खेळाडूंवर करण्यात आला आहे. पण असं ओरडून काय मिळतं?
(नोव्हाक योकोव्हीक)
हे शास्त्रीय अभ्यास करून बघण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की खेळाडू सर्व्ह करताना ओरडतो तेव्हा प्रतिस्पर्धी खेळाडूला रॅकेटवर बॉल नेमका कधी आदळतो तो आवाज कमी ऐकू येतो किंवा ऐकू येतच नाही. त्यासोबत मेंदू आवाज ऐकण्यात गुंतल्याने सर्व्हिस परतावून लावायला ३० मिलीसेकंदाचा उशिर होतो, परिणामी चूक होण्याची शक्यता वाढते.
ही झाली प्रतिस्पर्धी खेळाडूची बाजू. पण जो किंचाळत असतो त्याचा काही वेगळा फायदा असतो का?
(राफेल नदाल)
तर संशोधनात असे आढळले आहे की ओरडणार्याची क्षमता सर्व्हिस करताना ४.९ टक्क्यांनी आणि ग्राउंडस्ट्रोक परतवतना ३.८ टक्क्यांनी वाढते. विंबल्डन -अमेरिकन ओपन ऑस्ट्रेलीयन ओपनसारख्या स्पर्धा खेळताना ही टक्केवारी फारच महत्वाची असते. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते खेळताना रिदम (तालबध्दता) कायम राहण्यासाठी किंचाळण्याचा उपयोग होतो.

(अँडी मरे)
पण हे किंचाळून खेळणं म्हणजे चक्क चिटींग आहे असं मार्टीना नव्हरातिलोवाचे मत होते. पण गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढतच आहे. 'टेनीस ग्रंट'ची सुरुवात मोनिका सेलेसने केली, तर पुरुषांमध्ये जिमी कॉनर्सने टेनिस ग्रंटची सुरुवात केली. गेली काही वर्षे सेरेना विल्यम्स आणि मारीया शारापोव्हा या अट्टल किंचाळणार्या समजल्या जातात. शारापोव्हा तर काही वेळा १०० डेसीबलच्यावर किंचाळत असते. पुरुषांमध्ये राफेल नदाल, अँडी मरे, नोव्हाक योकोव्हीक हे त्यांच्या ग्रंटसाठी ओळखले जातात.
(सेरेना विल्यम्स)
याबाबत काही नियम जरूर आहेत. WTA च्या नियमाप्रमाणे चालू असलेल्या खेळात ओरडण्याने व्यत्यय येत असेल तर ओरडणार्याला आधी समज आणि नंतर एका गुणाची शिक्षा होते. पण हा नियम केवळ कागदावरच आहे. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला ही शिक्षा झालेली नाही.
काही प्रेक्षक मात्र मारीया शारापोव्हाचे किंचाळणे चक्क एंजॉय करतात म्हणे! तुम्ही त्यांपै़की असाल तर सोबतची क्लिप बघा आणि ऐका मारीया शारापोव्हाला किंचाळताना!