computer

१९९६ च्या वर्ल्डकप मध्ये ऐन सामन्यात विनोद कांबळी का रडला होता ??

क्रिकेटचा देव म्हटला जाणाऱ्या सचिनचा लहानपणीचा मित्र म्हणजे विनोद कांबळी. आज त्याची फक्त एवढीच ओळख बनून राहिली आहे. पण दिसते तसे नसते मंडळी. त्याचा सुरुवातीचा करिअरग्राफ बघितला तर हा भाऊ सचिनपेक्षा मागे राहील असे कुणीच म्हणू शकले नसते. पण म्हणतात ना, काळासमोर कुणाचे चालत नाही. बघता बघता आपला तेंडल्या पुढे निघून गेला. सचिन आणि कांबळी लहानपणी एकदम जिगरी दोस्त होते. बघता बघता त्यांच्या मैत्रीत दुरावा आला आणि नंतर तर एकमेकांना भेटणेसुद्धा त्यांनी बंद केले.  २०१३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत कांबळीने आपल्या वाईट काळात सचिनने साथ सोडल्याचा आरोप करून आमची मैत्री संपली असे सांगितले होते. कांबळीने सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर झालेल्या कार्यक्रमात बोलविले नाही. एवढेच नव्हे, तर लहानपणी त्यांनी खेळलेल्या ६६४ रन्सच्या पार्टनरशीपबद्दलसुद्धा सचिन बोलला नाही असा आरोप केला होता. 

कांबळीने मैत्री  तुटण्यासाठी सचिनला जबाबदार ठरवले होते. आता यात खरंच सचिन दोषी कि कांबळी, हे त्यांचे त्यांनाच माहीत राव! पण हा कांबळी पण लय डेंजर बॅट्सनमन होता बरं का!  आजही अनेकजण सांगतात कि प्रतिभेचा विचार केला तर कांबळी सचिनपेक्षा सरस होता. सुरुवातीला सचिन धडपडत असताना कांबळी मात्र धुवांधार बॅटिंग करत होता.  अक्षरशः धावांचा पाऊस पाड़त होता तो!! त्याने सचिनपेक्षा लवकर डबल सेंच्युरी ठोकली होती. टेस्ट मॅचेसमधले आकडे बघितले तरी कांबळी वरचढ दिसतो. टेस्ट क्रिकेटमधील कांबळीची सरासरी बघितली तर कांबळीची सरासरी   ५४.२० आहे तर सचिनची सरासरी ५३.७८ आहे. सचिन २०० टेस्ट मॅचेस खेळल्या, तर कांबळीने फक्त १७!

आता विचार करा मंडळी, एवढ्या कमी मॅच खेळूनही जर तो एवढा भारी परफॉर्म करतोय, तर त्याला अजुन संधी मिळाली असती तर त्याने संधीचं सोने केले असते नाही का? मंडळी, हा कांबळी इतका डेंजर होता कि आपल्या पहिल्या मॅचमध्ये जिथे भल्याभल्यांची तारांबळ उडते, सचिनसुद्धा पहिल्या मॅचमध्ये काहीच न करता आऊट झाला होता, तिथे ह्या भाऊने आपल्या पहिल्याच रणजी मॅचच्या पहिल्याच बॉलवर छक्का मारला होता.

हा गडी सुरुवातीला सुसाट चालला होता. पहिल्या ७ मॅचेसमध्ये त्याने दोन डबल शतके आणि दोन शतके ठोकली होती. मंडळी, कित्येकाना आपल्या पूर्ण करियरमध्येसुद्धा दोन डबल शतके करता येत नाहीत, ते या पठठ्याने अवघ्या ७  मॅचेसमध्ये करून दाखविले होते. कांबळीच्या नावावर आजदेखील सर्वात फ़ास्ट हजार टेस्ट रन्स बनविण्याचा रेकॉर्ड आहे.
 

१९९३ साली आपल्या करियरची सुरुवात करत असताना कांबळीने इंग्लंडच्या विरुद्ध २२४ रन्स बनवले होते. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या पुढच्याच मॅचमध्ये त्याने परत डबल शतक ठोकत २२७ रन्स केले. कांबळीचा हा सर्वोत्तम स्कोर आहे. कांबळीने आपल्या संपूर्ण करियरमध्ये १७ मॅचेसमध्ये ५४ च्या सरासरीने टोटल १०८४ रन्स केल्या. यात ४ शतके आणि ७ अर्धशतकेही सामिल आहेत. 

त्याचा वनडेमधील ग्राफ पण चांगला होता. १०४ वनडे मॅचेसमध्ये  ३३ च्या सरासरीने कंबळीने  २४७७ रन्स केले. कांबळीने आपली शेवटची टेस्ट मॅच २००० साली खेळली तेव्हा तो फक्त २४ वर्षाचा होता. २०११ साली त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

जेव्हा कांबळी रडतो

मित्रांनो, वर्ल्डकप म्हटला म्हणजे अनेक घटना घडत असतात.  तसाच १९९६ चा वर्ल्डकप पण अनेकार्थाने भारतीयांच्या लक्षात आहे. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेकडून पत्करावी लागलेली हार, ईडन गार्डनमधील प्रेक्षकांनी केलेला कारनामा आणि कांबळीचे रडणे या गोष्टी नेहमी लक्षात राहतील.

तर मंडळी, झाले असे कि श्रीलंकेने दिलेले २५१ धावांचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताने ३५ ओवर्समध्ये १२० रन केले होते. भरीसभर म्हणून ८ विकेटही गेल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीतसुद्धा विनोद कांबळी झुंज देत होता. तो नेटाने किल्ला लढवत होता. पण भारताची झालेली ही दुर्दशा प्रेक्षकांना पाहावली नाही. त्यांनी मैदानावर पेपर, बॉटल्स, खाद्य पदार्थांचे ट्रे फेकायला सुरुवात केली. आता खेळ म्हटला म्हणजे हारजीत होत असते. पण क्रिकेटर्सना देव मानणाऱ्या देशात मात्र देवाने चुकायला नको असा नियम आहे. आणि त्याच संतापाचा सामना मग प्लेयर्सना वेळोवेळी करावा लागतो. जर आपण असा धुडगूस घातला तर ते प्लेयर्स आपल्याला माफ करतीलही, पण नियमबाह्य वर्तन थेट ग्राऊंडवर करून चालत नाही. आपल्या प्रेक्षकांच्या हा कृत्यामुळे संतप्त झालेल्या अंपायरने मॅच श्रीलंकेला देऊन दिली. आणि भावुक झालेल्या कांबळीचा मैदानावरच बांध फ़ुटला. तो लहान मुलासारखा रडायला लागला.

मंडळी, त्याला निश्चित स्वतःवर विश्वास असेल. पण त्याला स्वत:ला त्या दिवशी संधी मिळाली नाही. मागच्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध जिंकत असलेली मॅच ऐनवेळी आपण हरलो होतो, कारण मुसळधार बॅटिंग करत असलेला हार्दिक पांड्या ऐनवेळी आऊट झाला होता. एक खेळाडूसुद्धा मॅच बदलू शकतो हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्या दिवशी प्रेक्षकांनी संयम बाळगला असता, तर कदाचित भारताने मॅच जिंकली असती. कदाचित वर्ल्डकपसुद्धा भारताने जिंकला असता. पुढे बाहेर फेकला गेलेला कांबळी कदाचित भारताचा धडाडीचा बॅटसमॅन म्हणून पुढे आला असता.

सुरुवातीला त्याचा करियर ग्राफ देण्याचे तेच कारण आहे मंडळी! अत्यंत प्रतिभाशाली बॅटसमॅनला संधी न मिळाल्याने त्याच्यासह भारताचेसुद्धा खूप नुकसान झाले होते.

 

 

आणखी वाचा :

कपिल देवने हे केले नसते तर भारताने १९८३ चा वर्ल्डकप जिंकलाच नसता !!

भारताचा क्रिकेटमधला विजय जेव्हा एका ब्रिटिश संपादकाला त्याचा लेख चक्क खायला भाग पाडतो, माहिती आहे का हा भन्नाट किस्सा ??

सबस्क्राईब करा

* indicates required