computer

कपिल देवने हे केले नसते तर भारताने १९८३ चा वर्ल्डकप जिंकलाच नसता !!

१८ जून १९८३! झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डचे चेअरमन डेव्ह एलमन ब्राऊनना एक फोनकॉल आला. तो कॉल बीबीसीच्या रिपोर्टरचा होता. त्यांना ब्राऊनचा इंटरव्यू घ्यायचा होता. कारण त्यांना वाटत होते कि झिम्बाब्वे  भारताविरुद्ध सुरु असलेला सामना जिंकत आहे. तसे वाटणे पण साहजिक होते, कारण भारताच्या १७ रन्स वर ५ विकेट पडल्या होत्या. मॅच आयोजित करणारे आणि बीबीसीवालेसुद्धा हे बघून टेंशनमध्ये आले होते. त्यांना असे वाटत होते ही मॅच अर्ध्या तासात आटपेल. पण ब्राऊन यांनी दोघांना उत्तर दिले

'द गेम इज नॉट ओव्हर'

आणि मंडळी, ब्राऊनचे शब्द खरे ठरले. जेवढया लवकर आपले नेते पलटत नाहीत त्याहून लवकर मॅच पलटली.

मित्रांनो,  या मॅचमध्ये कपिल देवने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्याच्या एका इनिंगने संपूर्ण जगाला हलवून सोडले होते. त्याच्या या पहिल्या आणि एकुलत्या एक शतकाचे वर्णन खुद्द आपले सनीभाऊ म्हणजे सुनील गावस्कर यांनी 'बेस्ट वनडे इनिंग एव्हर' असे करून ठेवले होते. आणि ही मॅच साधीसुधी नव्हती मंडळी! ही वर्ल्डकपची मॅच होती. त्यातल्या त्यात भारतासाठी जीवन मरणाची मॅच होती. जर ती मॅच आपण हरलो असतो तर आपण सेमी फायनलला जाऊ शकलो नसतो. आणि आपण वर्ल्डकप पण जिंकला नसता.

१९८३ वर्ल्डकपची २०वी मॅच होती ती. टनब्रिज वेल्सचे मैदान खचाखच भरले होते. लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अशा परिस्थितीत भारतीय टीम बॅटिंगला उतरली. त्याकाळचे सेहवाग असलेले श्रीकांत आणि आपला लिटल मास्टर सनीभाऊ बॅटिंगला आले. पण मंडळी दोघेही जसे आले, तसेच गेले. त्यांना खातेसुद्धा उघडता आले नाही. त्यानंतर आलेल्या मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटीलची पण तशीच परिस्थिती झाली. अमरनाथने ५ रन तर संदीप पाटीलने पण डायरेक्ट एकच  रन बनवला. भारताचा स्कोर बोर्ड ९ रन आणि ४ विकेट होता. आणि मग क्रिझवर असलेल्या यशपालला सोबत करायला तो आला! त्यादिवशी तो काय ठरवून आला होता त्यालाच माहित, कारण तो दिवस फक्त त्याचा होता. मंडळी तुम्हाला समजले असेल आम्ही कुणाबद्दल बोलतोय, भारताचा कॅप्टन कपिल देव! अवघ्या २४ वर्षाच्या कपिल देवकडे भारताचे नेतृत्व सोपविण्यात आले होते.

कपिल आला तरी आपल्या प्लेयर्सची "तू चल, मी पण आलोच" प्रकारची बॅटिंग बंद नाही झाली. झिम्बाब्वेचे बॉलर्स पीटर रॉसन आणि केविन कर्रनने आपल्या टॉप बॅटिंग ऑर्डरला उखडून फेकले. कपिलला कळून चुकले होते की आता त्याला बाजू लावून धरावी लागणार आहे. म्हणून मग कपिल मैदानावर ठाण मांडून बसला. यशपाल गेल्यावर मैदानात रॉजर बिन्नी आला. त्याने काही काळ कपिलला साथ दिली. त्याने २२ रन केले आणि कपिल सोबत ५० रन्सची पार्टनरशीप केली. नंतर तो पण आउट झाला. त्यानंतर आला रवीशास्त्री. तो फक्त खाते उघडून निघून गेला. आता भारताचा स्कोर झाला होता, ७८ रन्स आणि ७  विकेट!

झिम्बाब्वेचा कॅप्टन डंकन फ्लेचरने भारताच्या टीमला सळो की पळो  करून ठेवलेल्या रॉसन आणि कर्रनला काही काळासाठी आराम दिला आणि भारतीयांच्या जीवात जीव आला. याचा फायदा क्रिझवर असलेल्या मदनलाल आणि कपिलदेवने पुरेपुर घेतला. भारताचा स्कोर त्यांनी १४० पर्यंत नेला. पण परत अपशकुन झाला आणि मदनलाल १७ रन करून आऊट झाला. मैदानावर आलेला सय्यद किरमानी कपिलदेव जवळ  गेला आणि त्याला म्हणाला

'तुम अपना नॅचरल गेम खेलो, टेंशन मत लो'

'कपिलने उत्तर दिले ' आपल्याला अजुन  ६० ओवर्स खेळायच्या आहेत'

तुम्हाला वाटेल वनडेमध्ये ६० ओवर्स कशा काय? तर मंडळी, तेव्हा ६० ओवर्सची मॅच असायची आणि आता सारखा प्लेयर्सना ड्रेसकोड पण नव्हता. कपिलने आता झिम्बाब्वेच्या बॉलर्सची धुलाई करायला सुरुवात केली. किरमानी तर नंतर बोलला की कपिलच्या बॅटमध्ये पॉवर आली होती. सुरुवातीला सिंगल, डबल घेणारा कपिल आता सिक्स आणि चौक्याशिवाय थांबतच नव्हता. फक्त ७२ बॉल्समध्ये त्याने त्याचे शतक पूर्ण केले. इकडे किरमानी पण त्याला स्ट्राइक देत होता. झिम्बाब्वेचे बोलर्स नवव्या विकेटसाठी आटापिटा करत होते. नवव्या विकेटसाठी झालेल्या पार्टनरशीपमध्ये कपिल-किरमानी १२६ रन करून नाबाद राहिले. तिकडे पॅवेलियनमध्ये बलविंदर सिंग संधु पॅड बांधून आपल्या नंबरची वाटच पाहत राहिला. किरमानीने आपल्या या इनिंगमध्ये २४ रन केले. तर ६०ओवर पूर्ण होईपर्यंत कपिलने १३८ बॉल्सवर १७५रन ठोकून काढले होते.

कपिलने त्यादिवशी ऐतिहासिक इनिंग खेळली होती. जी नंतर इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली. त्या एका इनिंगमुळे भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्या दिवशी भारताला हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला होता. त्यानंतर भारताने परत वळून पाहिलेच नाही.

कपिलच्या या इनिंगचा प्रभाव इतका जबरदस्त पडला की जेव्हा कपिल ही इनिंग खेळून पॅवेलियनमध्ये परत गेला तेव्हा त्याला खुद्द गावस्करने आपल्या हाताने पाणी भरून दिले होते. त्याला भेटून शाबासकी दिली. कपिलच्या या इनिंगमुळेच भारताने ६० ओवर्समध्ये २६६ रन्स बनवले. नंतर उतरलेली झिम्बाब्वेची टीम २३५वर ऑल आउट झाली. त्या मॅचमध्ये मदनलालने सर्वाधिक म्हणजे तीन विकेट घेतल्या. रॉजर बिन्नी आणि अमरनाथने पण चांगली बॉलिंग केली. त्यांनंतर टीम सेमी फायनलला पोहोचली आणि वर्ल्डकप सुद्धा जिंकला.

पण मॅच कुणालाच पाहता आली नाही.

मंडळी क्रिकेटच्या इतिहासातली अत्यंत महत्वाची ही मॅच मात्र कुणालाच पाहता आली नाही. पाहणे तर सोडाच, साधी रेडियोवर कॉमेंट्रीसुद्धा ऐकता आली नाही. कारण त्या दिवशी बीबीसीचे लोक संपावर होते. कैमरामॅन मैदानावरसुद्धा आला नाही. दुर्दैवाने या मॅचची रेकॉर्डिंगही उपलब्ध नाही. जसा आपण २०११च्या वर्ल्डकप मधला धोनीचा विनिंग छक्का आपण कधीही यू ट्यूबवर जाऊन पाहू शकतो, तशी ही मॅच पाहू शकत नाही. फक्त त्या मॅचची आठवण काढून खुश होऊ शकतो. मात्र संपूर्ण भारताला कपिलदेवच्या या अविस्मरणीय इनिंगचा नेहमीच अभिमान वाटेल.

 

आणखी वाचा :

भारताचा क्रिकेटमधला विजय जेव्हा एका ब्रिटिश संपादकाला त्याचा लेख चक्क खायला भाग पाडतो, माहिती आहे का हा भन्नाट किस्सा ??

सबस्क्राईब करा

* indicates required