गेल्या शतकातील दहा उत्कृष्ट चित्रपटांच्या निर्मितीची कहाणी !

 'एकटा जीव ', 'इष्काचा जहरी प्याला ',  'एक होता गोल्डी ', आणि 'यही है रंगरूप ' या यशस्वी पुस्तकानंतर लेखिका अनिता पाध्ये यांचं नवं पुस्तक "दहा क्लासिक्स" नुकतच प्रकाशित झालं आहे.  हे पुस्तक म्हणजे भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील दहा अभिजात- अजरामर चित्रपटांच्या निर्मितीचा प्रवास सांगणारे पुस्तक देखील मराठी वाचकांसाठी असेच दस्ताऐवजीकरण आहे कारण अभिजात मानल्या जाणार्‍या या दहा कलाकृती कशा तयार झाल्या हे आपल्यापर्यंत पोहोचलचं नसतं . म्हणुनच "दहा क्लासिक्स’ व्दारे चित्रपटविषयक अतिशय दुर्मिळ माहितीचा खजिना या पुस्तकाद्वारे वाचकांना उपलब्ध झाला आहे. चित्रपटांचा निर्मिती प्रवास लिहित असताना जुन्या काळात होणारी  चित्रपटनिर्मिती, तत्कालीन दिग्दर्शक , कलाकार , तंत्रज्ञ , संगीतकार आदिं एक उत्कृष्ट कलाकृती तयार करण्याच्या ध्यासाने कशी मेहनत घेत असत, त्यांची काम करण्याची पध्दत कशी होती व आपल्यातील  'माणूसपण' ते कसे जपत होते हे देखील लेखिकेने अतिशय हळुवारपणे उलगडून दाखवलं आहे .         

                         

'दो बिघा जमीन ', 'प्यासा ', दो आंखे बारह हात ', मदर इंडिया ', ' मोगले  आजम', 'गाईड ', ' तिसरी कसम ', 'आनंद ', 'पाकिजा ' आणि 'उमराव जान ' या  १९५० ते १९८० या कालावधीतील दहा अभिजात  चित्रपटांची निवड या पुस्तकासाठी लेखिकेने केली असुन हे चित्रपट बनत असताना काय घटना घडल्या, या चित्रपटांची मोट कशी बांधली गेली याविषयी अत्यंत रंजक व  खुशखुशित माहिती वाचकांना वाचायला मिळेल. 'उमराव जान'चा वगळता अन्य नऊ चित्रपटांचे दिग्दर्शक व त्यातील बहुसंख्य प्रमुख्य कलाकार आज हयात नसल्यामुळे या चित्रपटांशी निगडीत हयात असलेल्या व्यक्तींना शोधून अत्यंत दुर्मिळ माहिती मिळवताना आपल्याला कशी प्रचंड मेहनत घ्यावी लागली असे अनिता पाध्ये यांनी पुस्तकातील आपल्या मनोगतामध्ये नमुद केले आहे. एखाद्या चित्रपटाची कथा कशी तयार केली, त्यातील  कलाकारांची निवड कशी झाली असेल, एखादा सीन कसा शूट केला असेल याबाबत बहुसंख्य सिने रसिकांना कुतूहल असते. अशा रसिकांना तर 'दहा क्लासिक्स ' वाचायला आवडेलच परंतु चित्रपटसृष्टीमध्ये  काम करु इच्छिणार्‍या अथवा काम करणार्‍या नवोदित दिग्दर्शक, कलाकार,लेखक,संकलक यांच्यासाठी तर हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारं आहे.  

                                        देव आनंद, दिलीप कुमार, रेखा, राजेश खन्ना , मधुबाला, गुरुदत्त यांचे असंख्य चाहते आजही आपल्याला पहायला मिळतात आणि आपल्या आवडत्या कलाकारांसाठी त्यांच्या पुरुष -महिला चाहत्यांनी अनेकवेळा गाइड किंवा मोगले आझम, उमराव जान अथवा प्यासा हे त्यांचे चित्रपट पाहिले असतील परंतु  हे चित्रपट बनत असताना काय काय घटना घडल्या, 'गाईड ' चं दिग्दर्शन करण्यासाठी विजय आनंद का राजी नव्हते ,  'आनंद ' हा चित्रपट राजेश खन्नाला कसा  मिळाला,आनंद सहगलची भूमिका त्याने कशी  साकार केली, '  दो  बिघा जमीन ' मध्ये बलराज साहनीना शंभू महंतोची भूमिका  देण्यास दिग्दर्शक बिमल रॉय सुरूवातीला का अनुत्सुक होते, गुरुदत्तच्या 'प्यासा ' मध्ये दिलीपकुमार मुख्य भूमिका करणार होता मग अचानक गुरुदत्तने 'विजय' ची भूमिका का केली, 'मोगले आजम ' मधील मुगल बादशहा अकबरची भूमिका साकार करण्यासाठी अभिनेता पॄथ्वीराज कपूर यांनी कशी मेहनत घेतली, हा चित्रपट बनवण्यासाठी १४ वर्षे का लागली, चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दिलीपकुमारनी मधुबालाच्या चेहऱ्यावर रागाने थप्पड का मारली व त्यानंतर मधुबालाचे वडील कसे आक्रमक बनले, तसंच "मदर इंडिया 'मधील बिरजूची भूमिका  दिलीपकुमार यांनी का नाकारली, ही व्यक्तीरेखा सुनील दत्तना कशी मिळाली, ' तिसरी कसम' ची निर्मिती करत असताना गीतकार शैलेंद्रना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागलं, '१७ वर्ष "पाकिजा 'कसा बनत गेला  या आत्तापर्यंत बहुसंख्य सिनेरसिकांना माहित नसलेल्या गोष्टींचा, घटनांचा उलगडा 'दहा क्लासिक्स वाचताना होईल. त्याचप्रमाणे 'उमराव जान ' मध्ये 'दिल चीज क्या है आप मेरी.. ' हे गाणे रेकार्ड करताना आशाबाई आणि संगीतकार खय्याम यांच्यामध्ये काय शाब्दिक जुगलबंदी घडली , "दुःख भारे दिन बिते रे भैय्या ' या गाण्यातील आत्तापर्यंत कुणाच्याही लक्षात न आलेली व त्याविषयी आत्तापर्यंत न लिहिलं गेलेली कोणती मोठी चुक घडली आहे , आनंदची गाणी पुर्वी कोणत्या चित्रपटासाठी रेकॉर्ड करण्यात आली होती अशा अनेक रहस्यांचा उलगडा हे पुस्तक वाचताना आपल्याला होत रहातो.     

                       अतिशय  सहज सोप्या व ओघवत्या लेखन शैलीव्दारे लेखिकेने अत्यंत सुंदररित्या दहा अभिजात चित्रपटांचा निर्मिती प्रवास आपल्या या पुस्तकाद्वारे वाचकांना सांगितला आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

सबस्क्राईब करा

* indicates required