भारतातला पहिला सेलेब्रिटी परफ्यूम...पण तो बनवणाऱ्या माणसाचं दिवाळं का निघालं?

सोन्याला सुगंध ? आपण फक्त कल्पना करू शकतो. पण  'लता' नावाच्या सोन्याला सुगंध अर्पण करण्याचे धाडस २००० साली  दिपक रामराव काणेगावकर या ठाण्यातल्या एक उद्योजकाने केले होते.  विशुध्द रसायन या कंपनीच्या "गंध सुगंध" या शाखेने लता उ द पार्फ्युम (Lata Eau De Parfum )तयार केला होता. हा परफ्यूम म्हणजे भारतातला पहिला  सेलेब्रिटी परफ्युम होता. त्यानंतर झीनत अमान - अमिताभ बच्चन -शिल्पा शेट्टी -  शाहरुख खान यांच्या नावाने म्हणजे ज्याला आपण  "सेलेब्रिटी एन्डॉर्स्ड " म्हणतो, ते सुगंध आले. 

काणेगावकरांनी बनवलेल्या  'लता ' मध्ये ७८ वेगवेगळ्या सुगंधांचे मिश्रण होते.  ज्याला परफ्यूमची टॉप नोट म्हणतात ती टॉप नोट अर्थातच लताजींच्या आवडत्या सुगंधांची म्हणजे मोगरा आणि चंदनाची होती. या सुगंधाच्या निर्मितीसाठी कायगावकरांनी पॅरीसच्या तज्ञांची मदत घेतली होती.  'लता' साठी कायगावकरांनी खास काचेच्या कुप्या -पंप- पॅरीसमधून बनवून आणल्या होत्या. २००० साली सेलेब्रिटी एंडॉर्समेंट हा प्रयोग भारतीय बाजारात नविनच होता. बाजारात महागडे सुगंध फार तर पाचशे रुपयाच्या आसपास मिळायचे. लताची एक कुपी १७०० रुपयाची होती. महिनाभरात १६०० पॅक विकले गेले. सुरुवातीच्या काही पॅक्सवर लताजींची सही पण होती. मुंबई -दुबई सारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर  "लता" विक्रीसाठी  उपलब्ध करून देण्यात आला होता.  लतादिदींना 'लता' पुरस्कृत करण्यासाठी दिलेली रक्कम पण घसघशीत होती . 

मात्र, हा सगळा व्याप कंपनीसाठी " अव्यापारेषू व्यापार " ठरला आणि झालेल्या कर्जाच्या डोंगराखाली काणेगावकरांची कंपनी बुडली. कंपनीच्या सर्व मालमत्तेवर आणि कायगावकरांच्या खाजगी मालमत्तेवर बँका आणि देणेकर्‍यांची टाच लागली. 

 

वेळेच्या आधी आलेल्या सोन्याला सुगंध देण्याचा प्रयत्न  कंपनीला देशोधाडीला लावून गेला. अर्थातच आताचा चड्डी बनियनसुद्धा सेलेब्रिटी एंडॉर्समेंटने विकण्याच्या जमान्यात हे सगळे समजणे कठीणच आहे..

सबस्क्राईब करा

* indicates required