f
computer

लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकलेले ११ सिने कलाकार !!

लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी #MeToo चळवळ हॉलीवूड पासून बॉलीवूड पर्यंत पोहोचली आणि अनेक नवीन खुलासे झाले. असाच एक खुलासा तनुश्री दत्ताने एका मुलाखतीत केला आहे. नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाच्यावेळी तिच्याशी गैरवर्तन केल्याचं ती म्हणाली. #MeToo चळवळ सुरु होण्याआधीच आपण याविरुद्ध आवाज उठवला होता असं तिचं म्हणनं आहे.

मंडळी, नाना पाटेकर यांचं उदाहरण ताजं असलं तरी बॉलीवूड मधल्या कलाकारांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराला मोठा इतिहास आहे. चला तर आज पाहूया यापूर्वी कोणकोण अशा गैर प्रकारात पकडले गेले आहेत.

१. जितेंद्र

आपल्या लाडक्या ‘जितेंद्र’ यांच्यावर काही महिन्यापूर्वीच लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला होता. हा आरोप त्यांच्याच मामे बहिणीने केला होता. ही घटना ४७ वर्षांपूर्वीची आहे. जितेंद्र यांनी मात्र हा आरोप फेटाळला.

२. शायनी अहुजा

शायनी अहुजाचं प्रकरण २०११ च्या सुमारास प्रचंड गाजलं. त्याने त्याच्या मोलकरणीवर बलात्कार केला होता. २००९ साली हे घडलं आणि पुढे २०११ साली त्याने याची कबुली दिली. त्यांनतर त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. बऱ्यापैकी स्थिर होऊ घातलेल्या त्याच्या करियरला यामुळे काळिमा फसला गेला.

३. अंकित तिवारी

अंकित तिवारी त्याच्या आशिकी २ (२०१३) मधल्या गाण्याने प्रचंड लोकप्रिय झाला. या चित्रपटाच्या २ वर्षांनी त्याला त्याच्या गर्लफ्रेंडवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पकडण्यात आलं. पुढे २०१७ साली त्याची निर्दोष सुटका झाली.

४. दिबाकर बॅनर्जी

दिबाकर बॅनर्जी यांनी खोसला का घोसला, ओय लक्की लक्की ओय, या सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. अभिनेत्री पायल रोहतगीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. पण त्यांच्याविरुद्ध पोलीसात तक्रार झाली नाही. दिबाकर बॅनर्जी यांनी हा आरोप नाकारला होता. 

५. महमूद फारुकी

परदेशी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महमूद फारुकी या दिग्दर्शकावर झाला होता. हा आरोप सिद्ध होऊन गेल्याच वर्षी त्यांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. महमूद फारुकी यांनी पिपली लाइव्ह सिनेमाचं सहदिग्दर्शन केलं आहे.

६. मधुर भांडारकर

प्रीती जैन या मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी मधुर भांडारकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. २००४ साली त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. मधुर भांडारकरांची केस ही कास्टिंग काऊचचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी प्रीती जैनला सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

७. करीम मोरानी

करीम मोरानी यांनी चेन्नई एक्स्प्रेस, रा-वन, या सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. दिल्लीच्या एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खटला दाखल केला होता. कोर्टाने त्यांचं जामीन नाकारल्यानंतर ते पोलिसांना शरण गेले.  

८. आदित्य पांचोली

एका मुलाखतीत कंगना राणावतने आपल्या स्ट्रगलिंगच्या दिवसांबद्दल सांगताना आदित्य पंचोलीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आपण आदित्य विरोधात FIR दाखल केली होती असही तिने सांगितलं. आदित्य पांचोलीने हे सगळे आरोप नाकारले आहेत.

९. इरफान खान

पान सिंग तोमर सिनेमाच्या वेळी इरफान खानने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ममता पटेलने केला होता. चित्रपटांचं आमिष दाखवून इरफानने तिचा छळ केला असं तिचं म्हणणं आहे. गंमत म्हणजे इरफान खानने आपण स्ट्रगलिंगच्या दिवसात कास्टिंग काऊचला बळी पडल्याचं सागितलं होतं. पण ममता पटेलच्या आरोपातून त्याने स्वतःने सुद्धा हाच प्रकार केल्याचं उघडकीस आलं.

१०. ओम पुरी

दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यावर सुद्धा लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला होता. हा आरोप त्यांच्याच पत्नीने केला होता. नंदिता पुरी यांनी ओम पुरी यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात हा आरोप केला होता. ओम पुरी यांनी कधीच याबद्दल आपलं मत दिलं नाही. पुढे नंदिता पुरी यांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केली.

११. राजेश खन्ना

राजेश खन्ना यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप अनिता अडवाणी यांनी केला होता. हा प्रकार घडला तेव्हा त्या १३ वर्षांच्या होत्या.

 

 

राव, आपल्याकडे अशा प्रकरणात अडकलेल्या फिल्म स्टार्सना पुढे उलट जास्त कामं मिळतात. यासाठी मिका सिंगचं उदाहरण आदर्श आहे. अगदी याच्या उलट प्रकार हॉलीवूड मध्ये घडलाय. ऑस्कर पुरस्काराने नावाजलेला अभिनेता ‘केविन स्पेसी’वर लैंगिक अत्याचाराचे अनेक आरोप झाले. त्यानंतर त्याला एका महत्वाच्या सिनेमातून काढून टाकण्यात आलं. त्याची गाजलेली मालिका ‘’हाउस ऑफ कार्ड्स’ मधूनही त्याची हकालपट्टी झाली.

केविन स्पेसी (स्रोत)

कालच बिल कॉस्बी या हॉलीवूडच्या कॉमिडीयनवर ड्रग्स देऊन बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला. त्याला १० वर्षापर्यंतची शिक्षा आणि १८ लाख रुपये दंड ठोठावण्यात आलाय. बिलच्या केसमुळे पहिल्यादाच एक वेगळा इतिहास रचला गेला. तो असा की ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने त्यांना दिलेली मानद पदवी परत घेतली आहे. hollywoodreporter.com नुसार एका युनिव्हर्सिटीने डिग्री परत घेतल्याची ही पहिली घटना आहे.

बिल कॉस्बी (स्रोत)

तर मंडळी, अशी ही आपली कलाकार मंडळी. चमकत्या पडद्यामागचं हे एक घाणेरडं सत्य आहे.