computer

भारतातले मनोहारी आणि तितकेच उपयुक्त १० रोप-वे. तुम्ही यातल्या कोणत्या रोप-वेचा आनंद घेतला आहे?

उंचच उंच रोपवे मधून फिरणे तुम्हाला आवडते का ? तुमचे उत्तर हो असेल तर हा खास लेख तुमच्यासाठीच आहे. आपल्या भारतात असे अनेक रोपवे आहेत ज्यांच्यातून फिरताना अतिशय सुंदर अनुभव येतो. फक्त पर्यटन म्हणून नाही, तर यातले बरेच रोपवे हे कमी वेळात अंतर पार करण्यासाठी सोयीस्कर म्हणून उपयोगी पडतात. उंचावरील प्रदेशात फिरण्यासाठी रोपवे मुळे बरीच सोय झाली आहे. चला पाहूयात अशी यादी ज्यातून फिरताना तुम्हाला निसर्ग अगदी जवळून अनुभवता येईल.

१. गुलमर्ग, जम्मू काश्मिर.

गुलमर्ग गोंडोला हा भारतातील सर्वात लोकप्रिय रोपवे आहे. ४२०० मीटर उंचावर असलेला हा रोपवे म्हणजे आशिया खंडातील सर्वात उंच केबल कार आहे. हा रोपवे गुलमर्ग रिसॉर्टपासून कोंगडोरी दरी यादरम्यान आणि कोंगदोरी दरी पासून अफर्वत टोका(Apharwat Peak)पर्यंत दोन भागात विभागला आहे. इथे असलेले बर्फाच्छादित पर्वत आणि उंचच्या उंच झाडे तुम्हाला स्वप्नवत आनंद देऊन जातात. इतक्या अप्रतिम निसर्गसौंदर्यामुळे डोळ्यांना एक पर्वणीच असते.

२. पटनीटॉप जम्मू आणि काश्मीर.

पटनीटॉप ते संगेत व्हॅली दरम्यान असलेला तासाभराचा प्रवास गोंडोला रोपवेमुळे अगदी बारा मिनिटांच्या आत पूर्ण होतो. केबल कारमध्ये बसलो की नजरेस दिसतात त्या म्हणजे उंच उंच हिरव्यागार झाडांच्या विविध प्रकारच्या छटा. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हा गोंडोला एकाही झाडाची छाटणी न करता बनवलेला आशियातील एकमेव रोप-वे आहे.

३. मनाली हिमाचल प्रदेश

सोलांग माउंट फट्रु Phatru दरम्यान असलेल्या या रोपवे मुळे हे अंतर फक्त दहा मिनिटांत पार होते. बर्फाच्छादित डोंगर आणि हिरवीगार झाडे असे विहंगम दृश्य या प्रवासात तुम्हाला अनुभवता येते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही मनालीला जाल त्यावेळी या रोपवेमधून प्रवास करून एक अनुभव नक्की घ्या. मनाली शहरापासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर हा रोप वे आहे.

४. मसूरी, उत्तराखंड

मसूरी येथील पाहण्यासारखा एक अप्रतिम स्पॉट म्हणजे गन हिल रोपवे. या ठिकाणाला गन हिल हे नाव पडण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी या टेकडीवर बसवलेली बंदूक. या रोप वे मुळे हिमालयीन पर्वतरांगांचे ३६०° अंशावरील दृश्य आपणास अनुभवयास मिळते. येथील मॉलपासून केबल कारमध्ये बसून तो आनंद तुम्ही घेऊ शकता. सूर्यास्तापूर्वीचा काळ हा या राईडचा आनंद घेण्याची सर्वोत्तम वेळ आहे.

५. गंगटोक, सिक्किम

सिक्कीममधील गंगटोक या राजधानीच्या ठिकाणी असलेला रोपवे म्हणजे गंगटोक रोपवे. एक किलोमीटर इतका लांब असलेला हा रोप-वे देवळाली मार्केटपासून सुरू होतो. या रोप-वेला दोन स्टेशन सुद्धा आहेत. नमनंग आणि ताशिलिंग. या प्रवासाचे वैशिष्ट म्हणजे त्यातून दिसणारे कांचनगंगा शिखराचे दर्शन!

६. उदयपुर, राजस्थान

उदयपूर हे राजस्थानमधील असे ठिकाण आहे जिथे फक्त गाडीतून फिरले तरी अप्रतिम निसर्ग सौदर्य अनुभवायला मिळते. आणि त्याच उदयपूरचे उंचावरील दर्शन म्हणजे एक विलक्षण अनुभव! हे उंचावरील दृश्य करणी माता रोप वे मुळे आपल्याला अनुभवायला मिळते. हा रोप-वे दीनदयाळ उपाध्याय पार्कपासून मछला टेकडीवरील श्री करणी माता मंदिरापर्यंत जातो. या रोपवे प्रवासादरम्यानच पिचोला लेक, फतेहसागर लेक, सज्जनगड किल्ला आणि सिटी पॅलेस कॉम्प्लेक्स या ठिकाणांचा ही आनंद घेता येतो.

७. औली, उत्तराखंड

समुद्रसपाटीपासून ३०१० किलोमीटर उंचावर असणारा हा रोप-वे औली आणि जोशीमठला जोडतो. हिमालयाचा आनंद घेण्यासाठी या औली मध्ये अनेक मार्ग आहेत. एक पूर्ण दिवस फक्त स्किईंग, पॅराग्लायडिंग आणि दिवसाचा शेवट या अशा निवांत केबल कार राईड अशी योजना करता येते. बर्फाळ प्रदेशाचा आनंद इथे घेता येतो.

८. नालंदा, बिहार

राजगीर रोप वे हा भारतातील इतर रोप-वे सारखा नसून तो एकट्याने पर्यटन करणाऱ्या लोकांसाठी खूप खास आहे. इथल्या खाजगी केबल कारमध्ये बसल्यावर राजगीर आणि रत्नागिरी टेकडी असा हा रोपवे बांधलेला आहे. या टेकडीच्या टोकावर ४० मीटर उंचावर अगदी पांढऱ्या शुभ्र रंगाचा विश्वशांती स्तूप आहे. हा संपूर्ण परिसर हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे.

९. दार्जीलिंग, पश्चिम बंगाल

२१३३ मीटर उंचावर असलेला Rangeet Valley केबल कार प्रोजेक्ट म्हणजेच दार्जिलिंगचा हा रोपवे. हा रोप-वे सिंगमरी Singamari पासून सिंगला बाजारपर्यंत पसरलेला आहे. रोप-वे मधून प्रवास करताना टेकड्यातून खळखळत वाहणारे पाण्याचे प्रवाह, धबधबे आणि दार्जीलिंगचे सुप्रसिद्ध चहाचे मळे पाहताना खूप मजा येते.

१०. शिमला, हिमाचल प्रदेश

शिमल्यातील हनुमानाचे सर्वात जुने असणारे जाखू मंदिर इथे जाण्यासाठी या रोपवेचा वापर होतो. फक्त सहा मिनिटांच्या राईडने तुम्ही या मंदिरात पोहोचू शकता. ही राईड करताना बर्फाच्या टेकड्या तर दिसतातच, पण त्याचबरोबर असेलली १०८ फूट उंच हनुमानाची भव्य मूर्ती पहायला मिळते. हा रोप-वे २००० मीटर उंचीवर आहे.

नवनवीन प्रवासाचे अनुभव घेताना रोप-वेची मजा काही औरच असते. तुम्ही यातील कुठल्या रोपवेचा अनुभव घेतल्यास आम्हाला जरूर कळवा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required