computer

मंडळी, बिग बॉस सीझन २ येतोय, राडा पाहायला तयार आहात ना ?

मग काय, सईड्या, पुष्की, आऊ, रेशम-राजेश, चित्रविचित्र थत्ते ही मंडळी गेल्या वर्षी तुम्हांला लै आवडली होती म्हणे. म्हणूनच आता पुन्हा 'दिवस आहेत शंभर, कसा आता कंबर' म्हणत मराठी बिगबॉस २ येऊन राह्यले भाऊ!!
 
तुम्हांला पटणार नाही, पण आजच्या घडीला जगात  चाळीसेक देशांत हा ‘बिग ब्रदर’ नावाचा राडा चालतो आणि लोकांना आवडतोसुद्धा. ब्रिटनमधल्या बिग ब्रदर’मध्ये आपली  शिल्पा शेट्टी गेली होती. आता तो सीझन आपणकाही पाह्यला नाही, पण तिथं आपल्यासोबत भेदभाव झाल्याचा तिथं तिने आरोप केला आणि सगळ्या जगाची सहानुभूती तिनं मिळवली. अर्थातच, तो सीझन शिल्पा शेट्टी जिंकली.  २००६ साली हा शो भारतात आला  ‘बिग बॉस’ या नावाने. त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली व गेली १२ वर्ष हा शो प्रेक्षकांना रिझवतोय. हा कार्यक्रम असा आहे की लोक चारचौघांत बघतो म्हणून कुणी मान्य करत नाही आणि कुणी बघायचंही सोडत नाही!! खरं की नाही मंडळी?? 

आता हिंदीत यशस्वी म्हटल्यावर तो बिग बॉस  प्रादेशिक भाषांमध्येही करण्यात आलाय. सध्या बंगाली, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू भाषांमध्ये हा प्रोग्रॅम चालतो.  तो मराठीत कधी येतो हे विचारले जाऊ लागल्यावर गेल्या वर्षी कलर्स मराठीने ‘बिग बॉस मराठी’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणला. त्याला मिळालेल्या यशामुळे तो याहीवर्षी दुसरे पर्व घेऊन येत आहे येत्या २६ मे पासून. 

हिंदीतल्या बिगबॉसमध्ये लोकांची खोटी अफेयर्स झाली, एक-दोन लग्नं झाली, 'ओये विक्की विक्की ओये' सिनेमाचा खरा विक्की म्हणजे तो बंटी चोरही त्यानी आणला होता. तसाच प्रकार त्यांनी मराठीतही करायचा गेल्या वर्षी प्रयत्न केला. पण लोकांना ते रेशम-राजेशचं लफडं काही आवडलं नाही. म्हणजे एका बाजूने हे सगळे खोटं-स्क्रिप्टेड आहे, या लोकांना तिथं राहाण्याचे दिवसाचे इतके हजार मिळतात हे ही तेच लोक बोलत होते आणि पुन्हा हिरिरिने तिथल्या मेंबरांची बाजू घेऊन भांडतही होते. 

हे सगळं करण्याची वेळ परत एकदा आलीय.   एका  असं घर ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली, त्यांना आपलसं केलं, एक असं घर ज्याने भांडण-वाद विवाद बघितले, असं घर ज्याने मैत्री कशी निभवावी हे शिकवलं, ज्याने सदस्यांचे रडणं – हसणं पाहिलं, ज्या घराने सदस्यांचे मुखवटे काही दिवसांतच उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला, असं घर जे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. आता ते घर परत येत आहे नवे आणि अतरंगी सदस्य घेऊन मनोरंजन करायला, प्रेक्षकांची मने पुन्हा जिंकायला, नवा अनुभव मिळवून द्यायला.

तसं पाहायला गेलं तर ज्यांच्याकडे जास्त काम नसतं, ज्यांच्या आयुष्यात काही वादग्रस्त झालेलं असतं अशाच लोकांना बिग बॉसवाले त्या घरात आणतात. मग पैसे मिळवण्यासोबतच पुढचं काम मिळवणं, आपल्या आयुष्यात काय चाललंय याची सारवासारव म्हणा किंवा आपली बाजू मांडणं हे सगळं त्या घरात होतं. हां, एखादादुसरा असा काही वाद नसलेला माणूस किंवा बाईमाणूसही असतं म्हणा तिथं.  त्यामुळं आता या बिग बॉसमध्ये कोण जाणार हा प्रश्न न विचारता सध्या मराठीत वादग्रस्त आणि रिकामटेकडे किंवा नुसतेच वादग्रस्त किंवा नुसतेच रिकामटेकडे कोण आहेत यांची यादी बनवायला घ्या. गेल्या वेळेस मेघा धाडे, स्मिता धांडे, सई लोकूर असे बरेच लोक होते की त्यांना बघून लोकांना हे कोण असे प्रश्न पडले. तसे प्रश्न या वर्षीही पडण्याची जाम शक्यता आहे बरं मंडळी!!

गेल्यावर्षी महेश मांजरेकरने या सगळ्या लोकांची मस्त शाळा घेतली होती. यावर्षीही तेच सूत्रसंचालन करणार आहेत. यावर्षी ते घर मात्र आणखी मोठं झालेलं दिसतंय, तब्बल १४,००० चौरस फूट अश्या भव्य जागेमध्येते  तयार करण्यात आलंय. गेल्यावेळेस नथ-पोपट तर ठीक आहे, पण साड्यांचे पकाऊ इंटिरियर त्यांनी केले होते, यावेळेस अस्सलं मराठमोळ्या वाडा बनवला आहे. मध्यभागी मोठे अंगण आणि टास्क करण्यासाठी मोठे ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे. 

तर, रीन प्रस्तुत बिग बॉस मराठी - सिझन दुसरा, विशेष प्रायोजक म्हणून पुराणिक आणि Helo App!! ही घोषणा या महिनाअखेरपासून ऐकायची आहे आपल्याला. तुमच्यासोबत आम्हीही बिगबॉस पाहायला असूच. तेव्हा आता पटापट या सीझनमध्ये कोणकोण या घरात असतील याबद्दलचे तुमचे अंदाज सांगायला लागा मंडळी!!