computer

गरोदरपणाची कोणतीही लक्षणं नसताना दिला बाळाला जन्म....कसं शक्य झालं हे ??

एखादी स्त्री गरोदर आहे हे तिला स्वतःलाच माहित नसेल असं होईल का ? तर, हे शक्य वाटत नाही. कारण, गरोदरपणातील लक्षणे काही दिवसातच दिसू लागतात, पण काही अपवाद हे असतातच.

२० वर्षाच्या स्टेसी पोर्टर हिने नुकतंच एका मुलीला जन्म दिला. आश्चर्य म्हणजे तिला आपल्या गरोदरपणाचा पत्ताच नव्हता. १० मे २०१९ रोजी तिच्या पोटात दुखू लागल्यावर ती बाथरूममध्ये गेली. तिथे कोणत्याही त्रासाशिवाय तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिला.

मंडळी, यावेळी तिचा पार्टनर खालच्या मजल्यावर झोपलेला होता. तिने त्याला तब्बल ६० वेळा फोन करूनही तो उठला नाही. थोड्याच वेळात रडण्या-ओरडण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. हे जेव्हा लोकांना समजलं तेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आले. स्टेसी म्हणते की ‘हे एवढं झटपट घडलं की मला आता काहीच आठवत नाही.’

मंडळी, ही तशी पहिली घटना नाहीय. अशा घटना अधूनमधून घडतच असतात. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर भरपूर बातम्या सापडतील. आता प्रश्न पडतो हे शक्य कसं झालं ?

गरोदरपणात पाळी बंद होते, आपण सिनेमात बघतो तशा ओकाऱ्या होतात, खास करून मॉर्निंग सिकनेस म्हणजे सकाळी जाणवणारी मळमळ सुरु होते, वजन वाढतं, याखेरीज काही महिन्यातच पोट पण दिसू लागतं.

काय आहे कारण ?

मंडळी, गरोदरपणाचा पत्ताच न लागणे ही एक अवस्था आहे. या अवस्थेला शास्त्रीय भाषेत “क्रिप्टिक प्रेग्नन्सी” म्हणतात. या अवस्थेत स्त्रियांच्या शरीरात गरोदरपणाची कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. पोटातल्या बाळाची वाढ पण सावकाश होत असते. त्यामुळे अल्ट्रासाऊंड तपासणीत बाळ दिसून येत नाही. एवढंच नाही तर, प्रेग्नेन्सी टेस्ट मध्ये पण गरोदरपणाविषयी समजत नाही. याचं कारण असं की गरोदरपणात तयार होणारं hCG (Human chorionic gonadotropin) हार्मोन या अवस्थेत तयार होत नाही. राहता राहिला प्रश्न पाळी बंद होण्याचा, तर त्याला बरीच कारणं असू शकतात.

तर मंडळी, जवळजवळ २५०० स्त्रियांमधून एका स्त्रीत दिसणारी ही अवस्था आहे. तुमच्या आजूबाजूला कोणासोबत असं घडलंय का ?

 

आणखी वाचा :

आपण बाळाला नेहमी डाव्या बाजूलाच का घेतो ? जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण !!

गोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते ? हे आहे वैज्ञानिक उत्तर !!

लहान बाळ पापण्यांची उघडझाप का करत नाही ?? ही असावीत त्यामागची कारणं !!