दूरदर्शनचा नवा मेकअप - ५८ वर्षानंतर लोगो बदलणार !!

ज्यावेळी स्टार प्लस, सोनी, कलर्स, झी अश्या डेली सोपवाल्या साबणाच्या कंपन्या नव्हत्या आणि एकता कपूर सारखी बया आपल्या डोक्यावर परिणाम करत नव्हती, त्या काळात दूरदर्शन अर्थात डीडीकडे सगळेच डोळे लावून बसलेले असायचे. दूरदर्शन हे काहींना आजही चांगलंच लक्षात आहे. आणि का असू नये?  ‘महाभारत’, ‘रामायण’, ‘मालगुडी डेज’, ‘ब्योमकेश बक्षी’, ‘देख भाई देख’, ‘फौजी’, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, ‘हम लोग’, ‘उडान’, ‘तहकीकात’, ‘बुनियाद’, ‘नुक्कड’, ‘वागले की दुनिया’, ‘द जंगल बुक’, ‘शक्तिमान’  असे एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रम त्याकाळात दूरदर्शनवरून प्रसारित व्हायचे. जेव्हा या सर्व नव्या वाहिन्यांची लाट आली तेव्हा याचा बळी गेला ती वेगळी गोष्ट. असो...

आज दूरदर्शनची आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे दूरदर्शनचा आपल्याला ठाऊक असलेला लोगो बदलण्याचा निर्णय दूरदर्शन वाहिनीने घेतला आहे. लोगो बदलल्यामुळे आपल्या बालपणीच्या आठवणींवर पाणी तर पडेलच, पण दूरदर्शनचं असं म्हणणं आहे की नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी हा बदल गरजेचा आहे.

विशेष म्हणजे हा लोगो तयार करण्यासाठी देशातील सर्व लोकांना आमंत्रित केलं गेलं आहे. नव्या लोगोसाठी एक स्पर्धा घेण्यात येणार असून जिंकणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलंय. ज्याला कोणाला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी १३ ऑगस्टच्या आत अर्ज भरायचा आहे आणि  एका व्यक्तीकडून एकच अर्ज स्वीकारला जाईल. यात काही संस्थाही भाग घेऊ शकतात. दूरदर्शनच्या वेबसाईटवर तुम्ही यासंबंधी आणखी माहिती मिळवू शकता.

म्हटलं तर ही गुड न्यूज आहे आणि म्हटलं तर बॅड न्यूज. पण ५८ वर्षानंतर दूरदर्शन आपला लोगो बदलतोय, त्याचं आपण स्वागत करायला हवं...शेवटी बदल हा निसर्गाचा नियम आहे ना राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required