बालपणीचा सुपरहिरो शक्तीमान आता परत येतोय..
बच्चेकंपनीला आपल्या सुपरपॉवरने वेड लावणारा शक्तिमान पुन्हा एकदा दूरदर्शनवर परतणार आहे. पंधरा सोळा वर्षापूर्वी दूरदर्शनवरून प्रसारित होणारी शक्तिमान मालिका ‘शक्तिमान’ या पहिल्या भारतीय सुपरहिरोमुळे प्रचंड गाजली. शक्तीमानचे एक बोट वर करून गोल गोल फिरणे, किल्मिशच्या माणसांना मारणे, लहान मुलांना मदत करणे, गंगाधर हे विनोदी पात्र इ. गोष्टी अजूनही लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या लक्षात आहेत.
शक्तिमान मालिका सुरु होणार अशी खबर गेल्या अनेक वर्षापासून येत होती पण त्याला अधिकृत पुष्टी मिळत नव्हती. पण शक्तिमान हे पात्र साकारणारा ‘मुकेश खन्ना’ यांनीच याबद्दल एका मुलाखतीत अधिकृत घोषणा केली आहे. नवीन मालिकेतही मुकेश खन्नाच पुन्हा एकदा शक्तिमान साकारताना दिसणार आहे. मुकेश खन्ना यांना शक्तिमान मालिकेमुळे वेगळी ओळख मिळाली म्हणून ते आताही नवीन अवतारात शक्तिमान साकारण्यास सज्ज आहेत. यासाठी त्यांना पंधरा किलो वजन कमी करावे लागणार आहे असे देखील समजते.
नवीन मालिका जुन्या मालिकेपेक्षा काही वेगळी नसणार पण नवीन तंत्रज्ञान वापरून पूर्वपेक्षा जास्त परिपूर्ण करण्यात येणार आहे. आंतराराष्ट्रीय स्तरावर फ्लॅश , बॅटमॅन आणि इतर सुपरहिरोज तांत्रिकदृष्ट्या खूपच प्रगत असलेल्या आताच्या जमान्यात शक्तिमान त्यांना टक्कर देऊ शकेल का हाही एक प्रश्न आहेच.
शक्तिमान कोणत्या तारखेला येणार हे जरी अद्याप गुपित असल तरी या वर्षभरात तो आपल्या भेटीला येणार हे मात्र नक्की. तर मग तयार व्हा, शक्तिमान परत येतोय.




