आयुर्वेद सांगतोय ग्रीष्म ऋतूतील दुपार कशी घालवावी?

मे महिना म्हणजे भारतात कमालीचा उष्मादायक असा ग्रीष्म ऋतूचा काळ. परंपरागत ज्ञानाच्या आधारे, अनुभवजन्य आणि आपल्या वागणुकीला साजेशा पद्धतीने आयुर्वेदाने आपण कशाप्रकारे हा काळ व्यतित करावा, याबद्दल सूचना देऊन ठेवल्या आहेत.

ग्रंथांमध्ये ग्रीष्म ऋतूचर्या सांगताना या दिवसातली दुपार कशी घालवावी, याबद्दल आचार्यांनी विशेष विचार केलेला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ग्रीष्मात सूर्य आपल्या अतितीक्ष्ण किरणांनी पृथ्वीचा रसच शोषून घेतो. यामुळे आपल्या शरीरासही उष्म्याबरोबरीने पाण्याच्या कमतरतेलाही तोंड द्यावं लागतं.

म्हणून या काळातल्या दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका वाढला की असं सांगतात, जिथे-

१. मोठमोठे, सागाचे, ताडाचे असे भरदार सावली देणारे गगनचुंबी असे वृक्ष आहेत,

२. मोत्यांसारख्या द्राक्षांनी लगडलेल्या वेली आहेत,

३. आंब्याच्या झाडांवर कोवळ्या पालवी, मंजिर्‍या आणि घोसानी लटकलेली फळे आहेत,

अशा उपवनांमध्ये जावे.

 

या उपवनात-

अ. सुगंधी, शीतल जल शिंपडलेल्या पडद्यांचे मंडप उभारावे.

ब. या मंडपांमध्ये कमळाचे देठ, केळीची पाने, विविध रंगी कमळांच्या पाकळ्या आणि इतर कोमल फुलापानांपासून शय्या तयार करावी आणि त्यावर विश्रांती घ्यावी.

क. आजूबाजूला संगमरवरी, पुतळ्यांच्या स्तन-हस्त-मुखांतून पाण्याची कारंजी उडत आहेत, अशी धारागृहे निर्माण करून अशा ठिकाणी विश्राम करावा.

ड. अंगावर चंदनादिंचे शीतल लेप घालावेत,

ई. मोत्यांच्या माळा किंवा सुगंधी पुष्पमाला धारण कराव्यात,

फ. स्वच्छ, सूती आणि पातळ वस्त्रे वापरावीत,

ग. प्रफुल्लित कमलिनींप्रमाणे शोभणा-या स्त्रिया आणि मंजुळ, मनोहर भाषण करणा-या लहान मुलांच्या सान्निध्यात,

श्रमपरिहार करत दुपारचा काळ घालवावा म्हणजे आरोग्यदृष्ट्या उष्म्याचा त्रास होत नाही.

आजच्या काळात अशाप्रकारे दुपारचा वेळ घालवणं कदाचित एखाद्या शिल्लक राजाला किंवा अतिश्रीमंतालाच शक्य व्हावं, पण उन्हाच्या काहिलीचा अनुभव घेता घेता, आपल्या ग्रंथांनी सांगितलेला उपाय वाचता, वाचताही वाटतं, ‘दिल बहला ने के लिये, गालिब, खयाल अच्छा है…!’

सबस्क्राईब करा

* indicates required