तब्बल २९ वर्षांनी हा सिनेमा अखेर रिलीज होतोय.. जाणून घ्या तो भारतात इतकी वर्षं का दाखवला गेला नव्हता..

तुम्ही 'सिली हवा छू गयी सिला बदन छिल गया' किंवा 'खामोशासा अफसाना पानी से लिखा होता, ना तुमने कहा होता.. ना मैंने सुना होता' ही गाणी ऐकलीयत का कधी? ऐकली नसतील तर आता नक्की ऐकाल.. ही दोन्ही गाणी आहेत १९८८ साली निर्माण झालेल्या गुलजारांच्या 'लिबास' सिनेमातली. 

हा सिनेमा गुलाजारांच्या 'रावी पार' या कथासंग्रहातल्या 'सीमा' या कथेवर आधारित आहे. एका सिनेदिग्दर्शकाची पत्नी काही वैवाहिक कारणांमुळं नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत जाते असं काहीसं याचं कथासूत्र आहे. सिनेमात मुख्य भूमिका केल्या आहेत शबाना आझमी, नसिरुद्दीन शाह, उत्पल दत्त, सुषमा सेठ आणि राज बब्बर यांच्या. संगीत दिलंय आर. डी. बर्मन यांनी.. 

पण तेव्हा हा सिनेमा रिलीज न होण्याची दोन कारणं सांगितली जात आहेत. पहिलं म्हणजे तेव्हाच्या सेन्सॉर बोर्डाला हे विवाहबाह्य  प्रेमसंबंध रुचले नाहीत आणि दुसरं म्हणजे या सिनेमाचे निर्माते विकास मोहन यांना या सिनेमाचा गुलजारांनी केलेला शेवट पसंत नव्हता. कारण काही असो, हा सिनेमा रसिकांपर्यंत पोचला नाही. नाही म्हणायला हा सिनेमा १९९२मध्ये बंगळुरू इथं झालेल्या एका फिल्म फेस्टिव्हलमधे दाखवण्यात आला होता आणि त्यानंतर  १२ वर्षांनी म्हणजेच २०१४मध्ये गोव्याला झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो झळकला होता. परदेशातही यास सिनेमाचे फिल्म फेस्टिव्हलच्या दरम्यान काही शो झाले होते, पण पुन्हा तेच.. हा सिनेमा सर्वांपर्यंत पोचला नव्हता.


आता मात्र झी क्लासिक आणि निर्माते विकास मोहन यांचा मुलगा अमूल मोहन यांच्या प्रयत्नाने अखेर हा सिनेमा रिलीज होतोय. २९ वर्षांत लोकांच्या आवडीनिवडी आणि सिनेमाचं तंत्र दोन्ही बदलली आहेत.. या विषयावरही काही सिनेमे येऊन गेले आहेत. अशा परिस्थितीत हा सिनेमा कितपत चालेल हे येणारा काळच ठरवेल.. 

सबस्क्राईब करा

* indicates required