स्नेहल भाटकर : एक विस्मरणात गेलेले गाणे !!

महाराष्ट्राच्या संत परंपरेने एक अमूल्य देणगी आपल्याला दिली ती म्हणजे आपला भजन संप्रदाय. या परंपरेला संगीताचा साज चढवून संतांचे वचन घराघरात पोहोचवण्यात मोठा वाटा आहे, आपल्या ऑल इंडिया रेडीओचा! एकेकाळी आपल्या दिवसाची सुरुवात व्हायची “मंगल प्रभात” या कार्यक्रमाने, आणि भाटकर बुवांचा एकतरी अभंग ऐकल्याशिवाय या कार्यक्रमाची समाप्ती व्हायची नाही.
लयबद्द ठेका, बुवांचा सुमधुर आवाज आणि त्यांनीच दिलेल्या गोड चाली केवळ अविस्मरणीय आहेत. दूरदर्शनचं युग अवतरले आणि बुवांच्या गाण्यांना आपण पारखे झालो. ‘वारियाने कुंडल हाले’ सारखी गौळण गावी तर भाटकर बुवांनीच !
बुवा फक्त भजनी बुवा होते असं नाही. सध्या आपण ज्याला चार्टबस्टर म्हणतो अशी गाणी पण त्यांनी बॉलीवूडला दिली. बुवा आकाशवाणीवर नोकरी करायचे. त्यांचे खरे नाव वासुदेव भाटकर होते. आकाशवाणीच्या नियमाप्रमाणे हे नाव वापरून हिंदी सिनेमात संगीत दिग्दर्शन करणे त्यांना शक्य नव्हते म्हणून त्यांनी स्नेहल भाटकर या नावाने अनेक सिनेमांना संगीत दिले. आता एक माहितीसाठी सांगतो, भाटकर बुवा हे आपल्या रमेश भाटकर यांचे वडील (माहेरच्या साडी वाले).
‘कभी तन्हाईयो में हमारी याद आयेगी’ या गाण्याची एक कथा आहे ती अशी की, हे गाणं लता मंगेशकर गाणार होत्या. सतत ३ दिवस वाट बघूनही त्या स्टुडीओ मध्ये आल्या नाहीत तेव्हा ‘मुबारक बेगम’ यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. त्यावेळचं हे ऑल टाईम हिट गाणं होतं.
या गाण्यातल्या
‘ये बिजली राख कर जाएगी, तेरे प्यार की दुनिया,
न तू फिर जी सकेगा, न तुझको मौत आयेगी’
या ओळींवरून जीव ओवाळून टाकणारे सिनियर सिटीझन्स आजही तुम्हाला भेटतील.