computer

युरोपात एका कारखान्यात मजूर असलेला खाबी लेम जागतिक सेलेब्रिटी कसा झाला?

काही दिवसांपासून एका युवकाचे अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. हा भाऊ काय करतो? तर ज्या गोष्टी लोक खूप किचकट पद्धतीने करतात त्या कशा अत्यंत सहज साध्या पद्धतीने करता येतात हे एकही शब्द न बोलता आपल्या ३० सेकंदांच्या व्हिडिओतून दाखवत असतो. खाबी लेम हे त्याचे नाव आहे. एव्हाना तुम्ही त्याला ओळखलेच असेल.

खाबी लेमने काल टिकटॉकवर १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. खाबी ज्या इटलीचा रहिवासी आहे त्या देशाची लोकसंख्याही १० कोटी नाही. इतकेच नाही तर पठ्ठ्याचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स हे इन्स्टाग्रामचा मालक मार्क झुकरबर्गपेक्षा जास्त आहेत.

लॉकडाऊनमध्ये अनेकांचे कामधंदे बंद पडले. यात काहींचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले, तर काहींनी आपले काम बंद झाले हे एकप्रकारे खूप चांगले झाले हेच सिद्ध करून दाखवले. खाबी हा देखील त्यातलाच एक नमुना.

तो स्वत: इटलीत एका कारखान्यात कामाला होता. त्याची नोकरी गेली आणि त्याने सहज म्हणून टिकटॉकवर व्हिडीओ पोस्ट करायला सुरूवात केली. त्याचे व्हिडीओ म्हणावे तर खूप सोपे, पण त्याची आयडिया मात्र भन्नाट!!! आपल्या अफलातून हावभावांनी तो कॉमनसेन्सच्या गोष्टी लोकांना सांगतो.

खाबीचे व्हिडीओ लोकांना आवडू लागले आणि हळूहळू करत त्याने तब्बल १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठला. अवघं २१ वर्षं वय असलेला हा खाबी फक्त लॉकडाऊनच्या १७ महिन्यांत इतक्या उंचीवर गेला आहे. आज तो युरोपमधील सर्वाधिक फॉलोअर्स असणारी व्यक्ती आहे तर जगात त्याचा दुसरा क्रम लागतो.

एका कारखान्यात मजूर असलेला खाबी आज जागतिक सेलेब्रिटी आहे. त्याने ज्या आयडिया घेऊन व्हिडीओ बनवले ती काही खूप जगावेगळी संकल्पना होती असे नाही. पण आपल्याला सुचलेली आयडिया त्याने प्रत्यक्षात आणली आणि आज तो नव्या उंचीवर पोहोचला आहे.

खाबीच्या उदाहरणाने इंटरनेट क्रांतीमुळे तुमचे शिक्षण आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी तुमची एक डोक्यालिटी तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकते हेच सिद्ध होते.

सबस्क्राईब करा

* indicates required