computer

चवीढवीच्या पाककृतीत मिसळले जाणारे अन्नघटक आरोग्यासाठी सुरक्षित आहेत का ?

कल्पना करा, तुम्ही खाऊगल्लीतून जात आहात. कोपऱ्यावर एक चायनीजची गाडी आहे. पोटात भुकेचा आगडोंब उसळला आहे आणि जोडीला त्या गाडीच्या बाजूने येणारा चटपटीत, खमंग स्वाद या आगीत जणू तेल ओततोय. चायनीज खाणं तब्येतीला वाईट हे पुस्तकी ज्ञान अशा वेळी बाजूला पडणार हे नक्की! याचं कारण आहे त्या स्वादामुळे चाळवली गेलेली भूक आणि त्यातून तो पदार्थ चाखून पाहण्याची निर्माण झालेली तीव्र इच्छा. स्वाद, चव, रंग, पोत यांची ही मोहमयी दुनिया पंचेंद्रियांना सुखावणारी असली तरी आरोग्यासाठी मात्र तितकीशी सुखद नाही. बघूयात बाजारात मिळणाऱ्या पदार्थांतले कोणते घटक आपल्यासाठी घातक आहेत. हे पदार्थ जपून खाल्लेलेच बरे हे वेगळं सांगायला नकोच!
 

१. मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच एम. एस. जी.

याचं व्यवहारातलं अजिनोमोटो हे नाव आपल्या चांगलंच परिचयाचं आहे. चायनीज पदार्थांमध्ये वापरला जाणारा हा महत्त्वाचा घटक. हे रसायन पदार्थाच्या स्वादात भर घालतं, मात्र जास्त प्रमाणात अजीनोमोटो असलेले पदार्थ म्हणजेच चायनीज डिशेस, इन्स्टंट व डबाबंद सूप, खारवलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड यांच्यामुळे काही जणांमध्ये डोकेदुखी, अतिप्रमाणात घाम येणं आणि बधिरता ही लक्षणं आढळतात. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हालाही अशी लक्षणं जाणवली तर त्यांचं सेवन कमी केलेलं चांगलं.

२. आर्टिफिशियल फूड कलर्स

आईस्क्रीम, कॅंडी, जेली, केक्स अशा विविध पदार्थांचे मनोहारी रंग बघताक्षणीच भुरळ पाडतात. प्रत्यक्ष चव चाखण्याच्या आधी डोळेच त्यांच्या प्रेमात पडतात. या पदार्थांना सुंदरसं रंगरूप आणि टेक्श्चर बहाल करण्यात आर्टिफिशियल फूड कलर्सचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र हेच कृत्रिम रंग आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. यामुळे लहान मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्हिटी हा विकार बळावतो. याशिवाय काही रंग कॅन्सरसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरू शकतात. यावर उत्तम उपाय म्हणजे शक्यतो कृत्रिम रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंग आहारात समाविष्ट करणं. उदाहरणार्थ बीट, पालक यांसारख्या भाज्या उकडून त्याचा रस नैसर्गिक रंग म्हणून वापरता येतो.

३. सोडियम नायट्राइट

हा मुख्यतः प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरला जाणारा घटक आहे. त्यामुळे मांस काहीसं खारवल्याप्रमाणे लागतं आणि त्याला चांगला रंगही प्राप्त होतो. तसंच यामुळे जिवाणूंची वाढ रोखली जाते.

अतिउच्च तापमानाला नायट्राइटपासून नायट्रोसामाईन हे विषारी संयुग तयार होतं. नायट्राइट आणि नायट्रोसामाईन यांच्या अतिरिक्त सेवनामुळे कॅन्सरसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी प्रक्रिया केलेल्या मांसाचा (प्रोसेस्ड मीट) कमीत कमी वापर करा.

४. गवारगम

गवारीच्या शेंगामध्ये असलेल्या बियांपासून बनणारा गवारगम हा पदार्थ पदार्थांना दाटपणा आणण्यासाठी आणि बाइंडिंग एजंट म्हणून वापरतात. फूड इंडस्ट्री मध्ये आईस्क्रीम, सलाड ड्रेसिंग, सूप्स, सॉस यासारख्या पदार्थांचा हा महत्त्वाचा घटक आहे. यात अतिरिक्त प्रमाणात तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर असल्यामुळे रक्तशर्करेचे पातळी कमी होते आणि वजन कमी होतं. मात्र अति प्रमाणात खाल्ल्यामुळे पोटफुगी, गॅसेस आणि पोट दुखणे याचा त्रास होऊ शकतो.

५. हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप

मक्यापासून बनवलेलं हे आर्टिफिशियल स्वीटनर मुख्यतः ब्रेकफास्ट सीरियल्स, ज्यूस, सोडा, कॅन्डी यांच्यात वापरलं जातं. यामध्ये फ्रुक्टोज या शर्करेचं प्रमाण जास्त असतं. फ्रुक्टोजमुळे अतिरिक्त कॅलरीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वजनवाढ, डायबिटीस आणि अंतर्गत अवयवांचा दाह म्हणजेच इन्फ्लमेशन यासारख्या समस्या वाढतात.

६. आर्टिफिशियल स्वीटनर

डायबिटीस पेशंटसाठी आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे सॅक्रीनसारख्या रसायनांचा वापर केला जातो. गोड खाल्ल्याचं समाधान मिळतं आणि तेही कमी कॅलरीजमध्ये. मात्र चवीला गोड असली तरी या कृत्रिम मधुरकांचे दुष्परिणामही आहेत. काही लोकांना यांच्या सेवनामुळे डोकेदुखीसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे वजन नियंत्रित करत असली तरीही ही स्वीटनर्स मर्यादित प्रमाणात घेतलेली चांगली.

७. करागीनन

आईस्क्रीम, पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये करागीनन नावाचा लाल रंगाच्या समुद्री शेवाळापासून मिळणारा घटक वापरला जातो. पदार्थाला घट्टपणा प्राप्त करून देणं आणि प्रीझर्वेशन हे याचं काम. मात्र संशोधनावरून असं आढळून आलं आहे की त्याच्या सेवनामुळे फास्टिंग ब्लड शुगर म्हणजेच उपाशीपोटीची रक्तशर्करा तसेच ग्लुकोज इनटॉलरन्स यांच्यामध्ये वाढ होते. आतड्यांमध्ये आढळून येणारे अल्सर्स आणि ट्यूमर्स किंवा ग्रोथ्स हा त्याचा एक दुष्परिणाम आहे. ज्यांना अल्सरेटिव्ह कोलाइटिस हा विकार आहे त्यांच्यामध्ये करागीननच्या सेवनामुळे हा विकार परत परत होतो.

८. सोडियम बेंझोएट

सरबतं, जॅम, लोणची यासारख्या पदार्थांमध्ये ते टिकवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह किंवा परिरक्षक म्हणून सोडियम बेंझोएटचा वापर केला जातो. मात्र त्याचे काही दुष्परिणामही आहेत. उदाहरणार्थ, सोडियम बेंझोएट काही प्रकारच्या फूड कलर्स बरोबर एकत्र केल्यानंतर लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या ADHD म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर या विकाराचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं आहे. तसेच सोडियम बेंझोएट व्हिटॅमिन सी बरोबर एकत्र वापरल्याने बेंझीनची निर्मिती होऊन कॅन्सरचा धोका वाढतो.

९. ट्रान्स फॅट्स

आजकाल अगदी शाळकरी मुलांनाही याबद्दल माहिती असते. ट्रान्स फॅट्समुळे पदार्थाचं शेल्फ लाईफ वाढतं, त्यामुळे पदार्थ जास्त काळ चांगला राहतो. बेकरी आयटम्स, मार्गारीन, व्हेजिटेबल ऑइल, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न यांत ट्रान्स फॅट्स असतात. यांच्या अतिरेकी सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढतो, शिवाय शरीरांतर्गत दाह वाढतो. शिवाय टाईप २ डायबेटीसचा धोकाही निर्माण होतो. आहारात काही बदल करून (मार्गारीनऐवजी घरगुती लोणी वापरणं) ट्रान्स फॅट्सचं प्रमाण कमी करता येतं.

१०. झान्थन गम

सलाड ड्रेसिंग्ज, सूप्स, सॉस यांच्यात पदार्थाला दाटपणा आणण्यासाठी हा घटक वापरतात. योग्य प्रमाणात खाल्ल्यास तो शरीराला फायदेशीर आहे. शिजवताना हा भातात घातला तर भातामुळे वाढलेली रक्तशर्करा कमी होते. पण म्हणून हा कितीही खाल्ला तरी चालेल असं नाही. अतिप्रमाणात खाल्ल्याने पचनाचे विकार होऊ शकतात.
 

११. आर्टिफिशियल फ्लेवर्स

बिस्किटं, जॅम, आईस्क्रीम यांच्यात चॉकलेट, स्ट्रॉबेरी, मँगो, ऑरेंज असे अनेक फ्लेवर्स असतात. हे आर्टिफिशियल फ्लेवर्स म्हणजे मूळ स्वादाची सहीसही नक्कल असते. त्यामुळे जिव्हासुख मिळत असलं तरी थांबा! याचा अतिरेकही घातकच आहे. प्राण्यांवर केलेल्या संशोधनानुसार, यामुळे लाल रक्तपेशींची संख्या कमी होते आणि बोन मॅरोच्या पेशींवरही विपरीत परिणाम होतो. मात्र माणसांच्या बाबतीत याबद्दल अजूनही ठोस पुरावे नाहीत. असं असलं तरी जपून खाल्लेलंच बरं, नाही का?

१२. यीस्ट एक्स्ट्रॅक्ट

चीज, सोया सॉस, आणि खाऱ्या पदार्थांमध्ये यीस्ट एक्स्ट्रॅक्ट स्वाद वाढवण्यासाठी वापरतात. यात भरपूर प्रमाणात सोडियम असतो, तसंच यातल्या ग्लुटामेट या घटकामुळेही काही विकार निर्माण होतात. मात्र हा पदार्थ तसा कमी प्रमाणात वापरला जात असल्याने त्याचे फारसे दुष्परिणाम दिसून येत नाहीत.

हेल्थ इज वेल्थ असं कुणीसं आपल्याला सांगून गेलं आहेच. त्या वेल्थ म्हणजेच संपदेची योग्य प्रकारे काळजी घेऊयात, हो ना?

सबस्क्राईब करा

* indicates required