computer

किट कॅट चॉकलेट बारच्या नावामागे सांगितल्या जाणाऱ्या कथा-दंतकथा तर वाचून घ्या..

'हॅव अ ब्रेक, हॅव ए किट कॅट' ही स्लोगन जाहिरातीत ऐकून आपल्या डोक्यात पक्की झालीय. कँडी बार अनेक आहेत, पण किट कॅटचं वेगळेपण म्हणजे यात असलेले क्रिस्पी वेफर लेयर्स! हा एक चॉकलेट बार आहेच,पण खाताना जाणवणाऱ्या कुरकुरीतपणामुळे किट कॅट जगभरात प्रचंड लोकप्रिय झालं आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण किट कॅट १९३५ पासून लोकप्रिय आहे. एकट्या यूकेमध्ये,लोक दरवर्षी १ अब्जाहून अधिक किट कॅट्स खातात. भारतात लोकप्रिय नसले तरी किट कॅटमध्येही शेकडो फ्लेवर्सही आहेत. पण, किट कॅटचा अर्थ काय आहे? किट कॅट हे नाव आले कुठून, याची माहिती आज आपण या लेखात करून घेऊयात.

किट कॅटचे ​​सध्या ३०० हूनही अधिक फ्लेवर्स आहेत. किट कॅटचा पहिला फ्लेवर १९९६ मध्ये आला होता. तो होता ऑरेंज फ्लेवर!!.तसा किट कॅट या नावाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. खरं सांगायचं तर किट कॅट बारच्या नावामागे अनेक वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. काहींचा दावा आहे की इंग्लंडमध्ये असलेल्या किट-कॅट नावाच्या क्लबच्या नावावरुन याचे नाव पडलं आहे. या क्लबमध्ये १७००च्या शतकाच्या सुरुवातीस सर गॉडफ्रे नेलर यांनी क्लब सदस्यांची चित्रे लावलेली होती. पण छोट्या सिलिंगमुळे या चित्रांच्या आकाराला मर्यादा होत्या तेव्हा त्याला "किट-कॅट साइज" असे संबोधले जायचे.

१७व्या आणि १८व्या शतकात “किट-कॅट” हा शब्द अजून काही ठिकाणी वापरला गेला. पेनसिल्व्हेनियामधील एका साप्ताहिकाचं नाव किट-कॅट होतं. हे मासिक कीटन ब्रदर्सने( Keighton Bros) प्रकाशित केलं होतं आणि या अंकाची सदस्यता ५० सेंट्समध्ये मिळायची.

काहींचा असा अंदाज आहे की किट कॅट हे नाव म्हणजे चाहत्यांनी "Keep in Touch, Kappa Alpha Theta" या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर घेऊन बनवलेलं संक्षिप्त रूप आहे. मेंटल फ्लॉस या मॅगझिनच्या म्हणण्यानुसार किट कॅटचा शोधकर्ता जोसेफ राउनट्रीची पत्नी कप्पा अल्फा थीटा सॉरिटीची सदस्य होती. त्यावरुनही हे किट कॅट नाव आलं असावं असं त्यांचं म्हणणं आहे.

अशा किट कॅट नावाबद्दल अनेक प्रकारच्या दंतकथा अस्तित्त्वात आहेत. पण प्रश्न उरतो - किट कॅटचा अर्थ काय आहे?

किट कॅट पहिल्यांदा इंग्लंडलमधल्या राऊनट्री नावाच्या कंपनीने १९३५मध्ये बनवले. तेव्हा या चॉकलेट बारचं नाव होतं Rowntree's Chocolate Crisp. दोन वर्षांनंतर त्याचं नाव किट कॅट चॉकलेट क्रिस्प असं ठेवण्यात आलं. राऊनट्रीने १९२० च्या दशकात बनवलेल्या चॉकलेटच्या बॉक्सवर हे नाव पहिल्यांदा दिसलं. त्यांनी हे नाव अधिकृतपणे १८ व्या शतकातील व्हिग साहित्यिक क्लबकडून घेतले होते. या क्लबचं नाव ख्रिस्तोफर कॅटलिंग Christopher Catling—किंवा किट कॅट असं होतं. १९८८ मध्ये राऊनट्री कंपनी नेस्लेने ताब्यात घेतली. नेस्ले अजूनही जगातील बहुतेक देशांमध्ये किट कॅट उत्पादन करते तर काही देशांत हर्शेकडे किट कॅटचे मालकी हक्क आहेत.

एक क्लासिक कँडी बार म्हणून मुलांना किट कॅट आवडतेच, पण मोठेही एक ब्रेक म्हणून किट कॅट आवडीने खातात. भले किट कॅट या नावामागे नक्की कोणती कथा सत्य आहे हे माहीत नाही, पण याची लोकप्रियता इतके वर्ष टिकून आहे. आज अनेक ब्रँड, वेगवेगळे चॉकलेट बार बनवतात, पण किटकॅटने आपला दर्जा कायम ठेवला आहे यात संशय नाही.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required