computer

जय हो- झिरो ते हिरो. ध्येयासाठी संघर्ष करणारा सुपर हिट चित्रपटांचा नायक सिल्व्हेस्टर स्टॅलोन.

सिल्व्हेस्टर गार्डनजिओ स्टॅलोनला कोण ओळखत नाही? जगातील असंख्य प्रेक्षकांचा लाडका सिल्वेस्टर स्टॅलोन हा अमेरिकन अभिनेता, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. रॉकी आणि रॅम्बो या चित्रपटांनी त्याला ॲक्शन चित्रपटांचा आयकॉन बनवले. पण त्याचा हा प्रवास कसा होता? हे जय हो या मालिकेत वाचायलाच हवे.

त्याचा जन्म धर्मादाय रुग्णालयात झाला. जन्माच्या दरम्यान त्याच्या चेहऱ्याच्या मज्जातंतूला हानी पोहोचली. त्यामुळे त्याची डावी पापणी अर्धवट बंद झाली. शिवाय बोलण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण झाला. बाल्यावस्थेतील बराच काळ बोर्डिंग केअरमध्ये घालवल्यानंतर तो पुन्हा आपल्या आईवडिलांबरोबर राहू लागला झाला. १९५७ मध्ये त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तो सुरुवातीला आपल्या वडिलांसोबत राहिला, परंतु वयाच्या १५ व्या वर्षी तो फिलाडेल्फियामध्ये त्याच्या पुनर्विवाहित आई बरोबर राहू लागला. त्याला अनेक शाळांमधून काढून टाकावे लागले आणि खाजगी शाळेत दाखल करण्यात आले. पुढे त्याच्या खिशात घराचं भाडं भरण्याइतके देखील पैसे नसल्यामुळे तो बेघर झाला. एकदा त्याने आपल्या पत्नीचे दागिने विकले आणि सर्वात वाईट म्हणजे एकदा त्याला आपला कुत्रा विकावा लागला, कारण त्याच्याकडे त्याला खायला घालायला पैसे नव्हते. त्याच्यामते तो त्याच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण होता.

अमेरिकन कॉलेज ऑफ स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना स्टॅलोनला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तो मायामी विद्यापीठात शिकण्यासाठी अमेरिकेत परतला. वुडी ॲलनच्या "बनानाज", आणि "क्लूट" या सारख्या चित्रपटांमध्ये त्याने छोट्या भूमिका केल्या. चित्रपट आणि दूरचित्रवाणीचे काम सुरू असले तरी यातून बाहेर पडण्यासाठी स्टॅलोनला प्रचंड संघर्ष करावा लागला.

त्याच्या समोर उभा असलेला पहिला अडथळा म्हणजे त्याच्या जबड्याचा खालच्या डाव्या भागाला जन्मतःच अर्धांगवायू झाला होता, ज्यामुळे तो अस्पष्टपणे बोलत असे. त्याने अनेक कास्टिंग एजंट्स बरोबर संपर्क साधला आणि जवळजवळ प्रत्येक कास्टिंग कॉलला प्रतिसाद दिला, पण भूमिका काही मिळेनात. काही कास्टिंग एजंट्स त्याच्या अस्पष्ट बोलण्यावर हसले आणि त्याला शेकडो वेळा नाकारण्यात आले. पण त्यामुळे सिल्वेस्टर स्टॅलोनचा संघर्ष थांबला नाही. आपले ध्येय साध्य करण्याचा त्याचा पक्का निर्धार होता. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर त्याने पटकथा लिहिण्याचा प्रयत्न केला.

काही वर्षांनंतर मात्र त्याच्या अस्पष्ट बोलण्यामुळे त्याला एक अनोखी अभिव्यक्तीच दिली.

एक दिवस स्टॅलोन जगज्जेता बाॅक्सर मोहम्मद अली आणि चक वेपनर नांवाच्या तुलनेने अपरिचित आणि सर्वसाधारण बॉक्सर यांच्यातील सामना बघत होता. तो सामना संपत नाही तोवर स्टॅलोनच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं आणि त्याने "रॉकी" या चित्रपटासाठी पटकथा लिहिण्यास सुरुवात केली. तीन दिवस तो सतत ती पटकथा लिहित होता. तो अनेक निर्मात्यांना भेटला आणि त्याने रॉकी चित्रपटाची कथा आणि पटकथा त्यांना ऐकवली. बऱ्याच जणांना ती आवडली देखील, पण एक अडचण होती. रॉकी बल्बोआकरीता त्यांना कुणीतरी प्रसिद्ध नट हवा होता,आणि स्टॅलोन मात्र ती भूमिका तो स्वतः करेल यावर ठाम होता. आता आली का पंचाईत!

निर्मात्यांना बॉक्सर रॉकी बल्बोआ याचे पात्र साकारण्यासाठी एखादा प्रसिद्ध नट हवा होता. पण स्टॅलोनने केवळ कथा पटकथा विकण्यास नकार दिला. त्याला आधी ५०,००० डाॅलर, मग १ लाख, नंतर २ लाख, असं करत-करत तब्बल ३ लाख डॉलर देऊ करण्यात आले, पण हा मात्र रॉकी बल्बोआची भूमिका मीच करणार यावर अडून बसला. खरं तर त्याच्या खिशात दमडीसुद्धा नव्हती आणि हे सगळं फिसकटलं असतं तर त्याचं काही खरं नव्हतं.

शेवटी एका मोठ्या स्टुडिओने तोच रॉकी बल्बोआची भूमिका करेल हे मान्य केलं आणि पुढे इतिहास घडला. "राॅकी" हा चित्रपट १९७६ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्याशिवाय स्टॅलोनने त्याच्या अभिनय आणि पटकथेसाठी अकादमी पुरस्कार नामांकन मिळवले आणि चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याचे सात सिक्वेल आले, यांपैकी चार स्टॅलोनने दिग्दर्शित केले. रॉकी बल्बोआची भूमिका मिळाल्यावर त्याने सर्वात आधी काय केलं असेल? तर ज्याला त्याने आपला कुत्रा विकला होता, त्या माणसाला शोधून काढलं आणि त्याच्याकडून आपला कुत्रा तब्बल १५ हजार डॉलर्सना पुन्हा विकत घेतला.

रॉकीच्या सात सिक्वेल दरम्यान स्टॅलोन अनेक ॲक्शन थ्रिलर्समध्ये दिसला. १९८२ मध्ये त्याने "फर्स्ट ब्लड" मध्ये माजी ग्रीन बेरेट जॉन रॅम्बोचे काम केले. या चित्रपटाने दुसरी अत्यंत यशस्वी मालिका सुरू केली. रॅम्बो: फर्स्ट ब्लड, रॅम्बो: फर्स्ट ब्लड पार्ट २, रॅम्बो ३. कोब्रा, डेमॉलिशन मॅन, क्लिफहॅंगर, द स्पेशलिस्ट, द ॲसॅसिन्स, जज ड्रेड, गेट कार्टर यांसारख्या थ्रिलर्समध्ये स्टॅलोनने ॲक्शनचे सूत्र चालू ठेवले. यापैकी बहुतेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले, आणि परदेशातील प्रेक्षकांना आकर्षित करण्याची स्टॅलोनची प्रचंड क्षमता सिद्ध झाली. २०१० मध्ये त्याने भाडोत्री सैनिकांच्या टीमबद्दल एक थ्रिलर "द एक्सपेंडेबल्स" या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय केला. या चित्रपटाचे आतापर्यंत चार सिक्वेल आले आणि सगळे सुपर हिट झाले.

स्टॅलोनने अधूनमधून बिगर-ॲक्शन चित्रपटातून भूमिका केल्या, पण अशा चित्रपटांना म्हणावे तसे यश लाभले नाही. याचा अर्थ प्रेक्षकांना त्याला ॲक्शन हिरो म्हणूनच पहायला आवडत असणार यावर शिक्कामोर्तब झाले. त्याच्या "ऑस्कर" आणि "स्टॉप! ऑर माय मॉम विल शूट" या विनोदी चित्रपटांना माफक यश मिळाले. १९९७ च्या "कॉप लँड"साठी त्याला अधिक चांगली समीक्षा मिळाली, ज्यासाठी त्याने जाड असलेल्या शेरीफच्या भूमिकेसाठी वजन वाढवले. बॉक्सिंगच्या खेळावर आधारित उपहासात्मक "ग्रज मॅच" मध्ये रॉबर्ट डी नीरो आणि तो बनले होते वृद्ध प्रतिस्पर्धी. स्टॅलोनने "स्टेइंग अलाईव्ह" ह्या १९७७ मध्ये आलेल्या "सॅटर्डे नाईट फीव्हर" ची कथा आणि दिग्दर्शन केले. दोन्ही चित्रपटांमध्ये जॉन ट्रॅव्होल्टाची भूमिका होती.

"आधी तुमचं ध्येय ठरवा, मग ते साध्य करण्यासाठी संघर्ष करा आणि तोपर्यंत संघर्ष करत रहा, जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही." सिल्वेस्टर स्टॅलोन एकदां म्हणला होता आणि त्याचे विचार असंख्य लोकांसाठी अमूल्य ठेवा आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required