उगाच फिनिशर नाही म्हणत धोनीला!! पाहा धोनीच्या आतापर्यंतच्या टॉप ३ बेस्ट फिनिशिंग इनिंग्स..
क्रिकेटमध्ये जेव्हाही फिनिशरचा उल्लेख केला जातो त्यावेळी एक नाव सर्वात पुढे असतं ते म्हणजे महेंद्र सिंग धोनी (Ms Dhoni). मध्यक्रमात फलंदाजी करताना त्याने अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढत विजय मिळवून दिला आहे. अनेकदा असंही घडलं होतं जेव्हा फलंदाज बाद होऊन माघारी परतायचे आणि एमएस धोनी एकटा शेवटपर्यंत अडून राहायचा. हेच कारण आहे की, त्याला क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फिनिशर म्हणतात. चला तर पाहूया एमएस धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील टॉप ३ फिनिशिंग इनिंग. (best innings of ms dhoni)
१) त्रिकोणीय मालिकेत ४५ धावांची खेळी (२०१३)
२०१३ मध्ये वेस्टइंडिजमध्ये त्रिकोणीय मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेत भारत आणि श्रीलंका संघाने अंतिम फेरी गाठली होती. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने २०१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघातील एका पाठोपाठ एक माघारी परतले होते. असे वाटू लागले होते की, भारतीय संघ हा सामना गमावणार. भारताचे ९ गडी बाद झाले होते. ईशांत शर्मा आणि एमएस धोनी खेळपट्टीवर होते.
हा सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला होता. शेवटच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी ६ चेंडूंमध्ये १५ धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडू निर्धाव राहिला. आता ५ चेंडूंमध्ये १५ धावांची आवश्यकता होती. त्यानंतर धोनीने एक गगनचुंबी षटकार मारला. तर पुढील चेंडूवर चौकार मारत सामना भारतीय संघाच्या दिशेने वळवला. शेवटी ३ चेंडूंमध्ये ५ धावांची आवश्यकता असताना धोनीने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
२) श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ धावांची खेळी (२००५)
ही खेळी एमएस धोनीने २००५ मध्ये केली होती. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये जयपूरच्या मैदानावर रोमांचक सामना पार पडला होता. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेच्या खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाने २९८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सचिन तेंडुलकर स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर एमएस धोनी फलंदाजीला आला. त्याने वीरेंद्र सेहवाग सोबत मिळून भागीदारी करायला सुरुवात केली.
या खेळीदरम्यान धोनी जोरदार फॉर्ममध्ये होता. वीरेंद्र सेहवाग बाद झाल्यानंतर देखील एमएस धोनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच हजेरी घेत होता. ८५ चेंडूंमध्ये धोनीने आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर १४५ चेंडूंमध्ये त्याने १८३ धावांची खेळी करत ४ षटक शिल्लक ठेवून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
३) २०११ विश्वचषक स्पर्धेत नाबाद ९१ धावांची खेळी (२०११)
२०११ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एमएस धोनी युवराज सिंगच्या आधी फलंदाजीला आला होता. या सामन्यात देखील भारतीय संघाचा टॉप ऑर्डर कोसळला होता. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनी डाव सांभाळत धावांची भर घातली. विराट कोहली बाद झाल्यानंतर एमएस धोनी खेळपट्टीवर आला आणि त्याने सामन्याचा निकाल बदलला. धोनीने या सामन्यात ९१ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने ऐतिहासिक षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
यापैकी कुठला सामना तुम्ही लाईव्ह पाहिला होता? कमेंट करून नक्की कळवा.




