computer

ओळख करुन घेऊया निसर्गाच्या वैविध्याने नटलेल्या ईशान्य भारताची!

भारताचा भूगोल आपण सगळ्यांनीच अभ्यासला आहे. पण म्हणून भारत आपल्याला खऱ्या अर्थाने कळला आहे का? साधं चार दिवस कुठे निवांत भटकायचं असेल तर आपल्या यादीत हमखास येणारी ठिकाणं म्हणजे गोवा, उटी, सिमला, नैनिताल, मुन्नार, मनाली, दार्जिलिंग, लेह लडाख, लक्षद्वीप, अंदमान नाहीतर राजस्थान. इतर ठिकाणं म्हणजे धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली तिरुपती, जगन्नाथपुरी, चारधाम, वाराणसी, सोमनाथ, गिरनार यांसारखी ठिकाणं. आता आम्ही तुम्हाला मौसेनराम, लोकटाक सरोवर, नामदाफा अभयारण्य, क्रेमपुरी केव्हज, डावकी नदी अशी काही ठिकाणं सांगितली, तर भेट दिलेली तर दूरच, पण ती कुठे आहेत हे नक्की सांगता येणारी पण फार कमी माणसं असतील. म्हणूनच भारत खरोखर कळला आहे का, हा प्रश्न विचारावासा वाटतो. फार सस्पेन्स न ठेवता आम्ही उत्तर सांगून टाकतो. ही सर्व ठिकाणं ईशान्य भारतात आहेत.

ईशान्य भारताबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल पी. बी. आचार्य यांचं एक वाक्य खूप बोलकं आहे: "भारतीयांना भारताचाच भाग असलेल्या ईशान्येकडल्या राज्यांची जेवढी माहिती आहे त्यापेक्षा जास्त माहिती त्यांना अमेरिकेची आहे." तर या लेखात ईशान्य भारताबद्दल काही रंजक गोष्टी माहिती करून घेऊयात.

१. ईशान्येकडे आठ राज्यं आहेत: अरुणाचल प्रदेश, मिझोरम, आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम, आणि नागालँड.
२. या आठ राज्यांमध्ये मिळूनच जवळपास २२० विविध भाषा आणि बोली बोलल्या जातात. ईशान्येकडील संस्कृतीवर तिबेटियन, आग्नेय आशियाई आणि पूर्व भारतीय संस्कृतीचा प्रभाव आढळून येतो.
३. ईशान्य भारत हा भारताचा एकमेव भाग आहे, जो मुघलांना कधीही जिंकता आला नाही.
४. अहोम राजसत्ता हे ईशान्य भारतातील सगळ्यात दीर्घकाळ चाललेलं राज्य होतं. अहोम राजांनी सहाशे वर्ष ईशान्येवर राज्य केलं.

५. अजून दोन आश्चर्यं ईशान्य भारतात आढळतात. ती म्हणजे जगातील सगळ्यात मोठं नदीबेट माजुली आणि सगळ्यात लहान नदीबेट उमानंद.
६. ईशान्य भारत वनसंपदेनेही समृद्ध आहे. भारतातल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी सात महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं ईशान्य भारतात आहेत. या प्रदेशात जैवविविधताही मोठ्या प्रमाणावर आढळते. एकशिंगी गेंडा, संगाई जातीची हरणं, सोनेरी वानरं यासारखे दुर्मिळ प्रजातींचे प्राणी इथे आढळतात.
७. मेघालयाची राजधानी असलेलं शिलॉंग हे शहर भारताची रॉक कॅपिटल म्हणून ओळखलं जातं.
८. पृथ्वीवरचा सर्वात जास्त पर्जन्यवृष्टीचा प्रदेश म्हणून मेघालयातलं मौसेनराम ओळखलं जातं.

९. सालकुची हे आसाममध्ये असलेलं एक गाव आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातलं सगळ्यात मोठं विणकाम करणारं गाव म्हणून हे प्रसिद्ध आहे. या गावाची संपूर्ण लोकसंख्या रेशीम विणून रेशमी कापड तयार करण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे.
१०. आसाममध्ये तयार होणारे मुगा सिल्क हे रेशीम आसामची ओळख आहे. हे जगात इतरत्र कुठेही तयार होत नाही.
११. गर्दी, कचरा, प्रदूषण यांना कंटाळलात? मग ईशान्येला जरूर भेट द्या. हा संपूर्ण प्रदेश अतिशय स्वच्छ आहे. मेघालयातलं मावलाइलॉंग हे आशिया खंडातलं सगळ्यात स्वच्छ गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
१२. भारतातली ७० टक्के ऑर्किड्स ईशान्येकडे आढळतात.

१३. मिझोरम आणि त्रिपुरा ही राज्यं देशातल्या सर्वाधिक साक्षर राज्यांमध्ये गणली जातात.
१४. ईशान्य भारतात हुंडा घेण्याची पद्धत अस्तित्वात नाही. ईशान्येकडील संस्कृतीत स्त्रियांना मानाचं स्थान आहे. विशेष म्हणजे स्त्रियांवरील अत्याचारांचं प्रमाण येथे अत्यंत कमी म्हणजे जवळपास शून्य टक्के आहे. मेघालयातील खासी जमातीत मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात आहे.
१५. सिक्कीम हे जगातलं पहिलं राज्य आहे, जिथे शेतीची सर्व उत्पादनं सेंद्रिय पद्धतीने पिकवली जातात. सिक्कीमला तसं प्रमाणपत्रही मिळालं आहे.
१६. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर या चार राज्यांमध्ये जाण्यासाठी इनर लाईन परमिटची गरज असते. हे केंद्र सरकारकडून दिलं जाणारं डॉक्युमेंट असून इतर राज्यांमधील नागरिक याच्या आधारे मर्यादित कालावधीसाठी या प्रदेशाला भेट देऊ शकतात.
आहेत की नाही कमाल गोष्टी? तुम्हाला ईशान्य भारताबद्दल अशाच काही गोष्टी माहीत असतील तर जरूर शेअर करा.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required