computer

भर समुद्रात तयार होणारा १.८ मैल लांबीचा रस्ता!! याची आख्यायिका काय सांगितली जाते?

प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या दैवी शक्तीने समुद्रावर शिळा टाकून रस्ता बांधला आणि ते लंकेला गेले. ही रामायणातील कथा तुम्ही ऐकलीच असेल. अशीच अजून एक कथा तुम्हाला आज सांगणार आहोत. समुद्रावर चालत जाण्याची! होय.. असे म्हणतात, दक्षिण कोरियाच्या जिंदो समुद्रात वर्षातून एकदा एक समुद्र विभागला जाऊन रस्ता आपोआप तयार होतो आणि त्यावेळेस कोणीही त्या रस्त्याद्वारे समुद्रावरून चालत जाऊ शकते. हा रस्ता १.८ मैल अंतराचा आहे आणि तो दोन बेटांना जोडतो. एरवी एका बेटावरून दुसऱ्या टोकाला जायला बोटीद्वारे जाता येते, पण जेव्हा हा रस्ता तयार होतो तेव्हा कोणीही चालत जाऊ शकते. या विलक्षण घटनेला दक्षिण कोरियात फार महत्व आहे म्हणूनच त्या दिवसांतच तिथे मिरॅकल सी रोड फेस्टिव्हल साजरा होतो. आज पाहूयात या घटनेमागची पौराणिक कथा आणि विज्ञान ही!

ही नैसर्गिक घटना साजरी केली जाते कारण तिथे म्हणतात हे समुद्र देवतेचे कार्य आहे! त्यामुळेच इथे असा रस्ता उघडला जातो. त्याकाळात तिथे ही घटना अनुभवायला अनेकजण लांबून प्रवास करून येतात. याला मिरॅकल सी रोड फेस्टिव्हल म्हणतात. यामध्ये लोक मोठमोठ्यांनी गाणी गात, पारंपरिक नृत्य, कला सादर करतात. पारंपारिक वाद्यं वाजवली जातात. निरनिराळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल उभे केले जातात. जिंदो बेटापासून मोडो बेटापर्यंत एकदम आरामात चालायचा आनंद लोक घेतात. अनेकजण सेल्फी, फोटो, व्हीडिओ काढत मजा करतात.

ही घटना पहिल्यांदा 1970 च्या दशकात पियर लँडीने (Pierre Land)जगासमोर आणली होती. त्यावेळी दक्षिण कोरियातील माजी फ्रेंच राजदूताने या नैसर्गिक घटनेचा एका फ्रेंच वृत्तपत्रात "biblical parting of the Red Sea" चमत्कार म्हणून उल्लेख केला होता. त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. लोकांना खूप आश्चर्य वाटले. परंतु यामागे फार सोपे विज्ञान आहे. भरती आणि ओहोटीमुळे समुद्राच्या लाटा पाणी कमी जास्त होत असतात. हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. भरतीमध्ये उंच लाटा तयार होतात, तर ओहोटीत लाटा आत गेल्यासारखे वाटतात. भरतीवर अनेक घटक परिणाम करत असतात. जसे पृथ्वीची प्रदक्षिणा किंवा पृथ्वी आणि चंद्राच्या हालचाली. याला टायडल हार्मोनिक्स म्हणतात. यामुळे भिन्न गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण होते आणि त्यामुळे समुद्रातील लाटांचे पॅटर्न बदलत राहते.तेच जिंदो समुद्रात घडते. टायडल हार्मोनिक्स एकतर खूप उच्च समुद्राची भरती निर्माण करते किंवा जिंदो समुद्रासारखे एकदम कमी पातळी निर्माण करते. पाणी एकदम कमी झाल्याने तिथे वाळूही गोळा होते आणि तिथे 40 ते 60-मीटर रुंद जमिनीचा भाग दिसू लागतो.
 

या घटनेचे स्पष्टीकरण एका जुन्या लोककथेने ही केले जाते. ही लोककथा जास्त लोकप्रिय आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार जिंदो बेटावर एकेकाळी वाघांचे वास्तव्य होते. जेव्हा प्राणी स्थानिक गावात घुसू लागले, तेव्हा लोकांना मोडो बेटावर पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण बेयोंग नावाची एक स्त्री चुकून मागे राहिली. तिने समुद्रातील देव योंगवांगला दिवस -रात्र प्रार्थना केली. त्या देवाने तिला स्वप्नात दृष्टांत दिला की समुद्रात इंद्रधनुष्य दिसू शकेल त्याच्यावरून ती पार करू शकेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली की समुद्र विभागला गेला होता. तिच्या सुटकेचा मार्ग तयार होता. तोच इंद्रधनुषी रस्ता, जो तिला त्या बेटावर घेऊन गेला आणि तिथे तिची आणि कुटुंबाची भेट झाली.

तुम्ही या नैसर्गिक घटनेचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहा किंवा लोककथेवर विश्वास ठेवा. पण एक गोष्ट निश्चित आहे - जिंदो समुद्रात तयार होणारा रस्ता खरोखरच एक अदभुत घटना आहे.

लेख आवडल्यास जरूर कमेन्ट करून सांगा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required