computer

चक्क सोन्याने सजवलाय वडापाव, कुठे मिळतोय असा वडापाव?

नुकताच जागतिक वडापाव दिवस होऊन गेला. यावेळी वडापावप्रेमींनी त्यावर भरभरून लिहिले. महाराष्ट्रात तशी वडापावप्रेमींची कमी नाही. पण यावेळी अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे वडापाव जागतिक केव्हा झाला? आज मात्र आम्ही जे सांगणार आहोत ते वाचून वडापाव किती जागतिक आहे हे तुम्हाला लक्षात येईल.

सध्या दुबईतील वडापाव हिट झाला आहे. यामागे असलेले कारण तितकेच भन्नाट आहे. दुबईत 'ओ पाव' नावाचे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये चक्क सोन्याचा वडापाव मिळतो. हो, २२ कॅरेट सोन्याने सजवलेला वडापाव इथे मिळतो. मात्र हा वडापाव तुम्ही पार्सल करून घेऊन जाऊ शकत नाही. तिथल्या तिथेच तुम्हाला तो खावा लागतो.

हा वडापाव जर तुम्हाला खायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तब्बल २ हजार रुपये मोजावे लागतील. रेस्टॉरंटने या वडापावचा बनविलेला व्हिडीओ जगभर हिट होत आहे. हा वडापाव चीज आणि फ्रेंच ट्रफल बटरने भरलेला असतो. तर पाव होममेड मिंट मेयोनेज डीप सोबत वाढला जातो.

या वडापावला स्पेशल बनविणाऱ्या सोन्यासोबत इतरही अनेक गोष्टी आहेत. हा वडापाव एका लाकडी बॉक्समध्ये दिला जातो. तसेच डिश अजून जास्त आकर्षक दिसावी म्हणून यात नायट्रोजनचा पण वापर केला गेला आहे. सोबतीला स्वीट पोटॅटो फ्राय आणि मिंट लेमोनेड पण दिला जातो.

उद्या जर का तुम्हाला दुबई जायची संधी मिळाली तर या गोल्डन वडापावचा आस्वाद नक्की घ्या.

सबस्क्राईब करा

* indicates required