computer

MX प्लेअरचे १०० करोड डाऊनलोड्स!! हे ॲप मूळचं कुठलं आहे आणि याने इतकी झेप कशी घेतली?

एम एक्स प्लेयर हे आजच्या घडीचे आघाडीचे व्हिडीओ स्ट्रीमिंग ऍप हे कधीकाळी व्हिडिओ प्लेयर म्हणून लोकांना माहीत होते. त्याकाळी आपल्या फाईलमध्ये असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी लोक या ऍपचा वापर करायचे. नंतर या ऍपवर स्वतःचे सिनेमे, सिरीज आणि इतर अनेक गोष्टींचे व्हिडिओ दिसायला लागले.

नुकतेच या ऍपने तब्बल एक बिलियन डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे. या ऍपने घेतलेली ही मोठी झेप आहे. २०११ साली व्हिडिओ प्लेयर म्हणून लाँच झाल्यावर कमी कालावधीत मूळ कोरियन असलेल्या या ऍपने लोकांच्या मोबाईलमध्ये आपली जागा भक्कम केली. एम एक्स मीडिया आणि इंटरटेनमेंट या कंपनीने या ऍपची निर्मिती केली आहे. या ऍपची विशेषतः म्हणजे त्यावेळी व्हीएलएक्स व्यतिरिक्त मोठी स्पर्धा नव्हती. त्यातही मोबाईलमध्ये असणाऱ्या व्हिडिओ प्लेयरपेक्षा हे ऍप बरेच सोयीचे असल्याने याचे वापरकर्ते झपाट्याने वाढले.

सध्या बड्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सला एम एक्स प्लेयर टक्कर देत आहे. हा बदल घडून आला तो २०१८ साली. २०१८ ला या प्लेयरचे ५०० मिलियन डाऊनलोडस् होते. त्याकाळी जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे ऍप दिसत होते. या गोष्टीचा फायदा घेत भारतीय कंपनी टाइम्स इंटरनेटने हजार कोटींमध्ये हे ऍप विकत घेतले. गेल्या अडीच वर्षात टाइम्स इंटरनेटने मग या ऍपचा व्हिडीओ प्लेयर ऍपपासून तर सिनेमे, सिरीज स्ट्रीमिंग ऍप असा बदल घडवून आणला त्यामुळे हे ऍप आज १ बिलियनचा टप्पा गाठू शकले आहे.

या ऍपचे भारतात नेटफ्लिक्स, ट्विटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट यांच्या बरोबरीने २८० मिलियन ऍक्टिव्ह युजर्स आहेत. २०१९ मध्ये त्यांनी ११० मिलियन डॉलरची गुंतवणूक मिळवली आणि आपला पसारा जगभरातील १२ देशांमध्ये वाढवला. यूएस, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदीव्ज आणि भूतान या देशांचा यात समावेश आहे.

हळूहळू करत एम एक्स प्लेयरने विविध गोष्टी आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या तिथे जगभरातील विविध भाषांमधील ओरिजिनल कंटेंटला भारतीय भाषांमध्ये डब करून आणले जाते. एम एक्स प्लेयरला इतर प्लॅटफॉर्म्सप्रमाणे सबस्क्रीप्शन घेणे बंधनकारक नाही. लोकांना ऍड फ्री सबस्क्रीप्शनचा पण पर्याय आहे.

 

आश्रम ही एम एक्स प्लेयरने आणलेली सिरीज प्रचंड गाजली आहे. एक थी बेगम, भौकाल अशा सिरीज पण चांगल्याच हिट झाल्या होत्या. टकाटक म्युझिक हा त्यांचा अजून एक प्रयोग टिकटॉकला पर्याय म्हणून आणला गेला आहे.

१ बिलियन डाऊनलोडचा टप्पा गाठणारे एम एक्स प्लेयर हे भारतातील पहिलेच ऍप आहे. भारतातील लोकांच्या आवडीचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी विविध कंटेंट बाजारात आणला. लोकांना सबस्क्रीप्शन बंधनकारक करण्याऐवजी आपली कमाई ऍडच्या माध्यमातून केली तट अधिक लोक आपल्यासोबत जुळतील हा त्यांचा अंदाज खरा ठरला आहे.

व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचाट, टेलिग्राम, झूम अशा ऍपच्या यादीत आता एमएक्स प्लेयर पण जाऊन पोहोचले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या ऍपसाठी H.266 व्हिडिओ कोडेक आणले आहे ज्यामुळे डाटा खर्च होणे, ५० टक्केपर्यंत वाचू शकतो. आजच्या घडीला दुसरे कुठलेही भारतीय ऍप एम एक्स प्लेयरने मिळवलेल्या यशाच्या जवळपास देखील दिसत नाही.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required