हिंदू मुस्लीम ऐक्यावर एका मुस्लीम तरुणाने बनवलेला चित्रपट : 'वेडा बीएफ' !!

"लाइफमध्ये एक तरी पिक्चर बनवायचा आहे राव!" असे आपण सर्वच मनातल्या मनात म्हणत असतो. अगदी स्टारकास्ट सकट सगळं काही डोक्यात तय्यार असतं. पण कधी? या प्रश्नाचं उत्तर पण मनातच जमा असतं. कारणं अनेक असतात. सगळ्यात महत्वाचं एकच ते म्हणजे ही इच्छा आपण कधीच उघडपणे बोलून दाखवत नाही .

तर मग ही तुमच्या मनातली इच्छा आम्ही बोलून आज  जाहीर केलीच आहे. मग आता उशीर कशाला ? चला सिनेमा बनवू या!  वाढवा मुहुर्ताचा नारळ आणि येऊ द्या तुमचा स्वत:चा चित्रपट ! ‌येत्या काही दिवसात आपण शिकणार आहोत सिनेमा बनवायला बोभाटाच्या नव्या लेख मालिकेतून!!

‌या लेखांतून चित्रपट निर्मितीच्या सगळ्या पैलूंचा अभ्यास होणार आहे. ‌काय सांगावं, पुढचा राज्य पुरस्कार बोभाटाच्या एखाद्या वाचकालाच मिळणार असेल !!!

या मालिकेतील पहिला लेख बोभाटाचे एक वाचक अल्ताफ शेख या तरुण निर्मात्याच्या चित्रपटाबद्दल !!

 

मुंबई ही भारताच्या चित्रपटसृष्टीची राजधानी आहे. चित्रपट फक्त मुंबईत राहूनच बनवता येतात या समजूतीला छेद देत मंगळवेढ्याच्या एका तरुणाने 'हिंदू-मुस्लिम ऐक्यावर चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे. या धाडसी निर्मात्याचे नाव आहे अल्ताफ शेख आणि चित्रपटाचे नाव आहे 'वेडा बी. एफ.(वेडा बॉयफ्रेंड)'

चित्रपट बनवण्यासाठी, पॅशन -एक आंतरीक ओढ असावी लागते. अल्ताफच्या मनात ही ओढ बहुतेक लहानपणापासून असावी असे दिसते. कारण या चित्रपटाची कथा त्याने दहावीत असतानाच लिहून काढली होती. त्यानंतर फॅशन डिझायनरचे करीयर करता करता चार-पाच वर्षे गेली. पुण्यात त्याचे ब्युटीक सुरु झाले. पण, चित्रपट निर्मितीचा ध्यास त्याला गप्प बसू देईना आणि एक दिवस हातात असलेले सगळे पैसे- उधार उसनवारी करून उभी राहीलेली जमापुंजी डावाला लावून त्यानी  'वेडा बी.एफ.' चित्रपट पूर्ण केला.

या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी ठळक म्हणजे एका मुस्लिम शाहीराने गायलेला शिवछत्रपतींवरचा पोवाडा आणि अल्ताफ राजा यांनी गायलेली मराठी कव्वाली. या दोन्हीचा आस्वाद आपण आज येथे घेऊ शकता.

 

शूर शिवाजी

दुर्वेश बाबा

प्राजक्ता देशपांडे-सागर गोरे या जोडीचा हा पहिलाच चित्रपट आहे. ' चिमणी-पाखरे’, ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ फेम नागेश भोसले यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटात मोलाची भर टाकली आहे. संगीतकार मोनू अजमीरे, छायाचित्रकार संतोष कादापुरे, काला दिग्दर्शक दिलीप धुमाळ, अभिनेता सागर भोरे आणि निर्माता सफर शेख, सहाय्यक दिग्दर्शक सतीश खांडवे आणि दिग्दर्शक अल्ताफ शेख या फौजेने मिळून सिनेमाला दमदार साकार केलं आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रश्न थेट हाताळण्याचा हा प्रयत्न किती यशस्वी झाला आहे हे आता लवकरच कळेल.

 

या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीला प्रेक्षकांच्या समोर जाताना काय आव्हाने असतात याचा पण आज आपण विचार करू या !

-मराठी चित्रपट हिंदी चित्रपटाच्या तुलनेने कमी खर्चात तयार होतात. पण हे भांडवल सहजा सहजी उभे राहू शकत नाहीत.

-मराठी चित्रपट सृष्टीत पैसा टाकणारे फायनान्सर फारच कमी आहेत.

-मराठी चित्रपटांना अर्थ पुरवठा जर टिव्ही चॅनेलने केला आणि जाहिरातीची जबाबदारी घेतली तरच मराठी चित्रपट  यशस्वी होतात.

-बर्‍याच मराठी  चित्रपटांना अ‍ॅवार्ड्स मिळतात पण प्रेक्षक मिळत नाहीत. प्रेक्षक न मिळण्याचे कारण असे आहे की मराठी चित्रपट विभागवार म्हणजे टेरेटरी पध्दतीने विकले जात नाहीत. एक्जीबीटरला प्रत्येक शो साठी थिएटर भाड्याने घ्यावे लागते. त्यामुळे लावलेल्या भांडवलाची वसूली (रिकव्हरी) होत नाही.

-अशा अनेक समस्यांना तोंड देता देता बर्‍याच वेळा दर्जेदार चित्रपट पेटीच्या बाहेरच येत नाहीत. शासकीय मदत मिळण्यासाठी ज्या अटी आहेत त्यांची पूर्तता करण्याच्या ज्या पूर्व अटी आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर गृहीत धरलेली रिकव्हरी पण होत नाही.

 

आजच्या तारखेस 'वेडा बी.एफ.' हा चित्रपट तयार आहे. पोस्टर तयार आहे, पण वितरकांची कमी आहे. लवकरच ही समस्या दूर होऊन हा चित्रपट पडद्यावर यासाठी अल्ताफ शेख यांना बोभाटातर्फे शुभेच्छा !!

सबस्क्राईब करा

* indicates required