computer

रेल्वे रुळाचे सांधे बदलणाऱ्या माकडाची गोष्ट!! त्याला या कामाचा पगारही मिळत असे!

ध्वनी संदेशावरुन रेल्वेचे रुळ बदलणाऱ्या माकडाची गोष्ट!! त्याला या कामाचा पगारही मिळत असे!

तुम्हाला प्राणी पाळायला आवडतात? याचे उत्तर जर हो असेल तर तुम्हाला हे माहितच असेल की पाळीव प्राणी तुमचे अनुकरण करतात किंवा तुम्ही त्यांना ज्या सुचना देता त्या ते तंतोतंत पाळतात. कुत्र्याला त्याच्या नावाने हाक दिली की तो पळत येतो. मांजरीचेही तसेच. आपण पाळलेले हे प्राणी आपल्यावरही तितकाच जीव लावतात. हे झालं कुत्रा मांजर अशा पाळीव प्राण्यांच्या बाबतीत. पण तुम्ही कधी एखादे माकड पाळले आहे का? नाही? १९व्या शतकात आफ्रिकेतील एका रेल्वे सिग्नल मॅन एक माकड पाळले होते आणि तो आपल्या माकडाकडून ज्या कामासाठी त्याला रेल्वेत नोकरी देण्यात आली होती ती सगळी करवून घेत होता.

रेल्वेला सिग्नल देणे आणि रेल्वेचे ट्रॅक बदलण्याचे काम किती अवघड असते याची तुम्हाला चांगलीच कल्पना असेल. जॅक नावाच्या या माकडाने आपल्या मालकासाठी तब्बल नऊ वर्षे म्हणजे त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे काम केले. या माकडाला हे काम जमले कसे? यावर कुणी आक्षेप का घेतला नाही? सर्वात हुशार समजल्या जाणाऱ्या माणूस प्राण्याकडूनही कधी कधी चुका होतात आणि रेल्वेचा ट्रक बदलण्यात जर या माकडाकडून काही चूक झाली तर ते कितीला पडले असते? हा साधा प्रश्नही कुणाला पडला नाही का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतीलच, त्यासाठी हा पूर्ण लेख नक्की वाचा.

दक्षिण आफ्रिकेच्या युटेन्हेग रेल्वे स्टेशनवर जेम्स एडविन नावाचा एक सिग्नलमन होता. १८८० च्या त्याकाळात आतासारखी इलेक्ट्रिक सिग्नलची सोय नव्हती. त्याकाळी हे सिग्नल पोहोचवण्यासाठी सिग्नलमनला मैलोनमैल तंगडतोड करावी लागत असे. एखादा सिग्नल पोचवण्यात जरा जरी उशीर झाला तरी पुढे जो अनर्थ घडला असता त्याची कुणाला कल्पनाही करवणार नाही. जेम्स आपल्या कामात तसा तरबेज होता. रेल्वेचे सिग्नल पटापट पोहोचवण्यात, रेल्वेचे पॉइंट आणि रूळ बदलण्यातही त्याचा हातखंडा होता. त्याचा वेग पाहून अनेकांना आश्चर्य वाटत असे. जेम्स कधी कधी एका रेल्वेकडून दुसऱ्या रेल्वेकडे जाण्यासाठी चालत्या रेल्वेसमोरूनही उडी मारत असे. त्याच्या या अजबगजब धाडसामुळेच त्याला जम्पिंग मॅन म्हणूनही ओळखले जात असे.

एकदा आपले काम करत असताना जेम्स नेहमीच्या सवयीप्रमाणे एका रेल्वेवरून दुसऱ्या रेल्वेवर उडी मारून जाण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात त्याची उडी चुकली आणि तो खाली पडला. समोरून येणारी रेल्वे त्याच्या पायावरून गेली आणि या अपघतात जेम्सचे दोन्ही पाय निकामी झाले.

आता जेम्सपुढे आपला चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश्न होता. त्याने काही दिवसांनी लाकडाचे खोटे पाय वापरायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा आपल्याला कामावर घ्यावे म्हणून तो रेल्वे अधिकाऱ्यांकडे विनवण्या करू लागला. त्याची परिस्थिती, त्याचा प्रमाणिक स्वभाव आणि पूर्वीचे त्याचे काम या सगळ्या गोष्टींचा विचार करून रेल्वे अधिकाऱ्यांनी जेम्सला पुन्हा एक संधी दिली. यावेळी त्याला सिग्नल पोहोचवण्याऐवजी रेल्वेकडून मिळालेल्या सिग्नलनुसार रेल्वेचा ट्रॅक बदलण्याचे काम मिळाले. या कामासाठी त्याला फार धावाधाव करायची गरज नव्हती.

ट्रेन जेव्हा युटेन्हेग स्टेशनमध्ये येईल तेव्हा ती ठराविक शिट्ट्या वाजवत असे. रेल्वेने किती शिट्या वाजवल्या यावरून तीचा रूळ ठरत असे आणि त्याप्रमाणे तो रूळ बदलला जात असे. आता काम एका ठिकाणी बसून करण्यासारखे असले तरी याकामातही चपळता खूप महत्वाची होती. दोन्ही पाय गमावल्यामुळे कधीकधी जेम्सला बसल्या ठिकाणाहून उठून रेल्वे रूळापर्यंत जाण्यासही उशीर लागत असे. घरापासून रेल्वे स्टेशनपर्यंत ये-जा करणेही त्याच्यासाठी खूप मुश्किलीचे काम बनले होते. पण कुणाजवळ काही तक्रार करून उपयोग नव्हता. आपल्या हाताखाली एखादा मदतनीस असेल तर किती बरे होईल या विचाराने तो एखादा मदतनीस मिळतो का हे शोधण्यासाठी आठवडा बाजारात गेला. तिथे त्याला असे दृश्य दिसले जे पाहून तो चक्रावूनच गेला. त्या बाजारात एका मालकाने आपला वानर विकायला आणला होता आणि हा वानर चक्क बैलगाडी चालवत होता. बैलगाडी चालवणारा हा वानर आपल्याला ढकलगाडीतून स्टेशनपर्यंत तरी नेईलच या विचाराने जेम्सने त्याला घरी आणले आणि त्याचे नाव ठेवले जॅक! जॅक आता जेम्सला ढकलगाडीतून स्टेशन पर्यंत ने-आण करू लागला.

जेम्ससोबत राहून राहून जक त्याच्या प्रत्येक कामात त्याला मदत करू लागला. जेम्सने त्याला रेल्वेने दिलेला सिग्नल ओळखून तराफ्याच्या सहाय्याने रेल्वे रूळही बदलायला शिकला. जेम्सची सगळी कामे आता जॅकच करू लागला. युटेन्हेगसारख्या दुरस्थ स्टेशनवर अधिकारी वर्गांची फार वर्दळ नसे. त्यामुळे जॅककडून कामे करून घेताना जेम्सला कुणीही रोखू शकत नव्हते. पण एकेदिवशी रेल्वेतील एक पॅसेंजर खिडकीतून वाकून पाहत होता आणि त्याला जे काही दिसले ते पाहून त्याचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली. तो ज्या ट्रेनमध्ये बसला होता त्या ट्रेनने रूळ चेंज करण्याचे सिग्नल दिले आणि एक माकड तराफा घेऊन रूळ बदलू लागला. वानराने तराफ्याने रूळ बदलले आणि ट्रेन पुढच्या प्रवासाला निघून गेली. मात्र त्या प्रवाशाने या गोष्टीवरून रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. एका माकडाला रूळ बदलण्यासारखी अवघड जबाबदारी सोपवून रेल्वे कर्मचारी करतात तरी काय? असा त्याच्या तक्रारीचा सूर होता. त्या तक्रारीची दखल घेऊन रेल्वे अधिकारी युटेन्हेग स्टेशनवर पोहोचले. त्यांनी जेम्सला याबाबत काही प्रश्न विचारण्याऐवजी जॅकचीच परीक्षा घेण्याचे ठरवले.

ज्याप्रमाने रेल्वे रूळ बदलण्यासाठी सिग्नल देते, तसेच सिग्नल त्याला ऐकवण्यात आले. ऐकू आलेल्या शिट्ट्यांच्या संख्येवरून जो काही संदेश दिला जातो तो अचूक समजून घेऊन जॅकने त्यानुसार रूळ बदलले. जॅकने आपले काम निर्धोकपणे पार पाडले होते आणि त्याच्या परीक्षेत तो पास झाला होता.

जॅकच्या कामावर खुश होऊन स्टेशन सुपरीटेंडंट जॉर्ज बी. हाऊ यांनी जॅकला रेल्वे कर्मचारी म्हणून ठेवून घेतलं. त्याला दररोज २० सेंट आणि आठवड्यातून अर्धी बॉटल बिअर असे मानधन निश्चित करण्यात आले. तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत जॅकने हे काम केले आणि आश्चर्य म्हणजे नऊ वर्षांच्या कार्यकाळात त्याच्या हातून एकदाही चूक झाली नाही. १८९०मध्ये जॅकने या जगाचा निरोप घेतला.

प्राविण्य ही फक्त माणसाचीच मक्तेदारी नाही, प्राण्यांनाही एखाद्या गोष्टीत प्राविण्य मिळवणे जमू शकते हे जॅकने आपल्या जगण्यातून दाखवून दिले.

सबस्क्राईब करा

* indicates required