'लै भारी' नंतर 'रितेशभौ द्येसमुख' आलेयत घेऊन नवा शिनिमा 'माऊली'...बघून घ्या पहिली झलक, येकदम कडक !!

रितेश देशमुखने ‘लय भारी’ चित्रपटातून मराठीत लय भारी एन्ट्री मारली होती. हा चित्रपट हिट झाल्यानंतर त्याचा पुढचा सिनेमा ‘माऊली’ लवकरच येणार म्हणून बोललं जात होतं. पण तो सिनेमा काही कारणांनी बनू शकला नाही. रितेश देशमुखने स्वतः एका इंटरव्ह्यूमध्ये हा सिनेमा होणार नसल्याचं सांगितलं होतं.

.....पण रितेश देशमुखच्या फॅन्ससाठी एक सरप्राईज आलंय राव. माऊली चित्रपट अखेर तयार होणार आहे. ही फक्त बातमी नसून चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं खुद्द जेनेलिया वहिनींनीच ट्विटरवरून सांगितलं आहे. 

‘लय भारी’ सारख्या तद्दन व्यावसायिक सिनेमाच्या जोडीला येऊ घातलेला ‘माऊली’ सिनेमा कसा असेल याची आपण कल्पना करू शकतो. फिल्मी मसाला, मारधाड, हिरोवाली एन्ट्री, गाणी, हिरोईन, मेलोड्रामा आणि एक व्हिलन. अशा व्यावसायिक दृष्टीने गरजेच्या असलेल्या सगळ्या गोष्टी यात असतील हे वेगळं सांगायला नको. शेवटी काय तर, फुल टू एन्टरटेन्मेंट असेल राव.

मंडळी, लय भारी  दिग्दर्शित करणारे ‘निशिकांत कामत’ यांनी माऊली चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. त्यांच्या जागी क्लासमेट्स आणि फास्टर फेणेचे दिग्दर्शक 'आदित्य सरपोतदार' दिग्दर्शन करणार आहेत. त्याच बरोबर वाय-झेड आणि फास्टर-फेणेचे लेखक क्षितीज पटवर्धन यांनी माऊली लिहिला आहे. चित्रपटाच्या निर्मितीची धुरा जेनेलिया वहिनींनी हाती घेतली आहे. मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली ‘माऊली’ तयार होईल.

मंडळी, ‘लय भारी’ रितेश देशमुखच्या करियरला वेगळं वळण देणारा ठरला होता. आता ‘माऊली’ काय कमाल करतो ते पाहूयात.