computer

'ठाकरे' : नवाजुद्दीन सिद्दिकी बाळासाहेबांच्या भूमिकेत...पाहा बरं ही भूमिका त्याला जमली आहे का !!

Subscribe to Bobhata

बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवणारा “ठाकरे” हा सिनेमा वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज लाँच झाला. नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आजवरच्या कारकिर्दीतला हा सर्वोत्तम चित्रपट आहे असं तर म्हणता येणार नाही, पण एवढ्या ताकदीची भूमिका त्याला पहिल्यांदाच मिळाली आहे हे नक्की.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरुवातीच्या दिवसाचं चित्रण दिसतं. शिवसेना कशी जन्माला आली इथपासून ते बाबरी मशीद, मुंबईच्या दंगली, राजकारण, इत्यादी गोष्टींचा एक धावता आढावा ट्रेलर मधून पाहायला मिळतो. चित्रपटाचं मेकिंग हे एकंदरीत उत्तम जमून आलंय.

‘ठाकरे’ चित्रपटाच्या निमित्ताने नवाजुद्दीन सिद्दिकी हा मंटोच्या भूमिकेच्या एक पाऊल पुढे गेला आहे. मंटो मधला ‘जे जसं आहे ते तसंच’ पेश करणारा लेखक इथे आणखी बेदरकर होतो. बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत असताना त्याने नवाजुद्दीन सिद्दिकी ही त्याची ओळख कुठेही मागे पडू दिलेली नाही, हे त्याचं अभिनेता म्हणून असलेलं कसब आहे असं आपण म्हणू शकतो.

हे झालं हिंदी ट्रेलर बद्दल. मराठी ट्रेलरच्या बाबतीत थोडी गडबड उडाली आहे. चित्रपट तोच, पण आवाज सचिन खेडेकर यांचा. नवाजुद्दीन सिद्दिकीला लीप-सिंकद्वारे मराठी बोलण्यास भाग पाडण्यात आलंय. इथेच नेमका गोंधळ उडाला आहे. सचिन खेडेकर हे बाळासाहेब म्हणून बोलतायत की त्यांचा आवाज बॅकग्राउंड वॉइस म्हणून येतोय हेच समजत नाही. ‘ठाकरे’ चित्रपट बघण्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर हिंदी मध्ये बघितल्यास उत्तम ठरेल.

‘रेगे’ मधून आपलं वेगळेपण दाखवून दिलेले अभिजित पानसे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. वायाकॉम१८ सारख्या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली. मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं यानिमित्ताने कौतुक केलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा जिवंत करण्यात त्यांच्या मेकअपचा फार मोठा वाटा आहे.

मंडळी, चला तर आता तुम्ही दोन्ही ट्रेलर पाहून घ्या आणि लगेच तुमच्या प्रतिक्रीया द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required