व्हिडीओ ऑफ दि डे : तासगाव नगरपालिकेने 4 वासुदेवांवर सोपवली कचरा व्यवस्थापन जागृती मोहीम !!

मंडळी, स्वच्छ भारत अभियान वेगवेगळ्या नगरपालिकांनी खूपच गांभीर्यानं घेतलंय बरं. शहरात आणि लहान गावात कचरा तोच असला तरी कचरा व्यवस्थापनाच्या समस्या वेगळ्या असतात. शहरात लोकांना शून्य कचरा मोहीम माहित असते. ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा हे सगळं काय असतं आणि हे सगळे कचरे वेगवेगळे का करायचे असतात हे ठाऊक असतं. काही सोसायट्या याही पलीकडे जाऊन कंपोस्ट बनवणं वगैरे प्रकार करत असतात. पण लहान गावात या सगळ्या गोष्टी अजूनही म्हणाव्या तितक्या पोचलेल्या नाहीत. त्यामुळं नगरपालिका आणि ग्रामपंचायतींसमोरचं आव्हान मोठं आहे. लोकांना समजेल अशा प्रकारे सोप्या भाषेत आणि तरीही प्रभावीपणे प्रबोधन करणं म्हणजे काही खायचं काम नाही राव!!
आपल्या सांगली जिल्ह्यातल्या तासगावनं यासाठी एकदम भारी मार्ग निवडलाय. त्यांनी नाशिकहून चक्क चार वासुदेव या कामासाठी बोलावले आहेत. या वासुदेवांनी चार एकदम भन्नाट गाणी तयार केली आहेत आणि ही गाणी गात ते तासगावात गल्लोगल्ली फिरत आहेत. या गाण्यांत ते ओला आणि सुका कचरा वेगळा करा, परिसर स्वच्छ ठेवा असे छान संदेश देत आहेत.
हा पाहा त्यांच्या गाण्याचा एक नमुना..
हा अभिनव प्रकार लोकांना आवडला नसता तर नवल.. लोक थांबून ही गाणी ऐकत आहेत. व्हिडीओ रेकॉर्ड करून व्हॉटसअँप युनिव्हर्सिटीमध्ये पाठवत आहेत. लोकांचं लक्ष वेधून आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोचवण्याच्या कामात या वासुदेव मंडळींना आणि पर्यायाने तासगांव नगरपालिकेला यश मिळालंय. आता पाहूया नागरिक हा संदेश कितपत अंमलात आणतात.
पण हो, हे वासुदेव फक्त परवा म्हणजे शुक्रवार, २९ डिसेंबरपर्यंतच इथं असणार आहेत. बोभाटावाचक तासगांवकरांनो, हे वासुदेव तुमच्या गल्लीत आले की व्हिडीओ रेकॉर्ड करा आणि इथं कमेंटमध्ये पोस्ट करा..