computer

ऑस्करच्या शर्यतीतले 9 सर्वोत्कृष्ट चित्रपट....यातले तुम्ही किती पाहिले आहेत??

अमेरिकन वेळेप्रमाणे ९ तारखेच्या रात्री आणि भारतीय वेळेप्रमाणे १० तारखेला पहाटे ६:३०वाजता ऑस्कर पुरस्कार जाहीर होणार आहेत. आजवर तुम्ही सोमवारी सकाळी लवकर उठून ७:३० वाजता गेम ऑफ थ्रोन्स पाह्यलं असेलच, आता ऑस्कर पुरस्कार सोहळाही पाहालच, हो ना? 

तर,  २०१९ सालात सिनेजगताच्या इतिहासात महत्त्वाच्या म्हणता येतील अशा अनेक फिल्म्स प्रदर्शित झाल्या. रॉबर्ट डी नीरो, अल पचिनो आणि जो पेस्सी या तीन दिग्गज अभिनेत्यांचा 'आयरिशमन', जोकरची जन्मकथा सांगणारा ‘जोकर’, दिग्दर्शनाचा अप्रतिम नमुना असलेला ‘१९१७’ आणि जागतिक सिनेमात सध्या गाजत असलेला ‘पॅरासाइट’ सिनेमा २०१९ गाजवणारे ठरले.
आजच्या लेखात आपण ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत स्थान मिळालेल्या ९ चित्रपटांची ओळख करून घेणार आहोत. 

१. फोर्ड वर्सेस फरारी (Ford v Ferrari) 

फोर्ड कंपनीला Ford GT40 ही अत्यंत वेगवान रेसिंग कार बनवून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर म्हणजे फरारीवर मात करायची आहे. यासाठी फोर्डचे मालक ‘हेन्री फोर्ड २’ हे केन माईल्स आणि कॅरल शेल्बी या अत्यंत कसलेल्या इंजिनियर आणि डिझाइनर मित्रांवर ही जबाबदारी सोपवतात. कार तयार होण्याच्या संपूर्ण प्रवासाची कथा म्हणजे फोर्ड वर्सेस फरारी. ऑस्करसाठी नामांकन मिळवणारा हा इतिहासातला पहिला रेसिंग सिनेमा आहे.

२. द आईरिश मॅन (The Irishman)

प्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी आणि रोबर्ट डी नीरो या जोडगोळीचा हा आणखी एक सिनेमा. आयरिशमन सिनेमा हा त्यातल्या कथानकापेक्षा रॉबर्ट डी नीरो, अल पचिनो आणि जो पेस्सी या दिग्गज अभिनेत्यांच्या एकत्र अभिनयामुळे गाजला. 
आयरिश सिनेमाचं कथानक थोडक्यात असं, की एक ट्रकड्रायव्हर (रॉबर्ट डी नीरो) एका गुन्हेगाराच्या (जो पेस्सी) संपर्कात येऊन त्याच्यासाठी काम करू लागतो. काम म्हणजे ‘खून’. या सिनेमाच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘हाऊस पेंटर’. सोबत तो एका लेबर युनियनच्या प्रमुखासाठीही (अल पचिनो) कामे करत असतो. पुढे काय घडतं हे तुम्ही स्वतःच बघायला हवं. सिनेमाची लांबी मोठी आहे म्हणून कंटाळा येऊ शकतो. नेटफ्लिक्सवर ही फिल्म हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. 

जोजो रॅबिट (Jojo Rabbit) 

१० ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘हिटलर युथ’ संघटनेतील जोहानस उर्फ जोजो आणि त्याने मनात तयार केलेला त्याचा मित्र ‘हिटलर’ यांची ही गोष्ट आहे. हा हिटलर जोजोच्या बालबुद्धीतून आलेला असल्याने त्याचं वागणं, बोलणंही एखाद्या लहान मुलासारखं आहे. हिटलरला विनोदी करून हिटलर आणि एकंदर नाझी विचारांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाला आहे. या कामात जोजो रॅबिट यशस्वी होतो. गंभीर आशय उपरोध आणि विनोदातून लोकांच्या गळी कसा उतरवावा याचा हा सिनेमा उत्तम उदाहरण आहे.

४. जोकर (Joker)

बॅटमनचा कट्टर शत्रू आणि आजवरचा सर्वात प्रसिद्ध व्हिलन जोकरची जन्मकथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. जोकर या पात्राचा जन्म कसा झाला याच्या अनेक कथा आजवर प्रचलित होत्या. जोकर चित्रपटात या सर्व कथा घेऊन सुवर्णमध्य साधला आहे. मार्टिन स्कॉर्सेसी या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या काही मोजक्या सिनेमांचा आधार घेऊन जोकरची कथा तयार झाली आहे. 

५. लिटिल विमेन (Little Women) 

लेखिका ‘लुईसा मे अल्कोट’ यांनी १८६८ साली लिहिलेल्या ‘लिटिल विमेन’ पुस्तकावर आधारित हा सातवा सिनेमा आहे. सिनेमाचं कथानक ४ बहिणींच्या भोवती फिरतं. गोष्ट अमेरिकन यादवी युद्धाच्या वेळची आहे.  घरातला कर्ता पुरुष युद्धावर गेला आहे आणि या चौघींना उदरनिर्वाहासाठी आपापल्या परीने कष्ट घ्यावे लागतात. 

७ वेळा वेगवेगळ्या माध्यमातून समोर आलेली कथा नव्याने सांगण्याचं कठीण काम दिग्दर्शिका ग्रेटा गर्विग हिने यशस्वीपणे पार पाडलं आहे.

६. १९१७

ही गोष्ट पहिल्या महायुद्धाच्या वेळची आहे. ब्रिटिश सैन्य जर्मनीवर हल्ला करण्याच्या बेतात आहे, पण  जर्मनीने ब्रिटिश सैन्याला कोंडीत पकडण्यासाठी मोठा बेत आखला आहे. ब्रिटिश सैन्याला हल्ला न करण्याची सूचना देण्यासाठी दोन सैनिकांना पाठवलं जातं. या दोघांच्या प्रवासावर हा चित्रपट बेतलेला आहे.
१९१७ साली घडलेल्या घटनेमुळे चित्रपटाला १९१७ नाव देण्यात आलंय. हा चित्रपट पहिल्या महायुद्धाची भीषणता दाखवतो. कथा सरळसोपी आहे, पण दिग्दर्शकाने खिळवून ठेवण्यासाठी सिनेमात वेगवेगळ्या तंत्रांचा खुबीने वापर केला आहे. बर्डमन सिनेमात वापरलेली एकही शॉट कट न करता दाखवलेली दृश्यं या चित्रपटाची खासियत ठरली आहेत. सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या शर्यतीत हा सिनेमा सर्वात पुढे समजला जातोय..

७. वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड (Once Upon a Time in Hollywood)

१९१० ते १९६० च्या दशकातील अमेरिकन सिनेमा म्हणजे हॉलीवूडचा सुवर्णकाळ समजला जातो. ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड’ हा सिनेमा म्हणजे या सुवर्णकाळाला दिलेली आदरांजली आहे. हॉलीवूडच्या उतरत्या काळापासून या कथानकाला सुरुवात होते. अभिनेता आणि त्याचा स्टंट डबल या दोघांच्या भोवती कथानक फिरतं. सिनेमाला एकच एक कथानक नाही. एकापेक्षा जास्त कथानकं आणि त्यातून  हॉलीवूडचं दिसणारं जग हा या सिनेमाचा विषय आहे. 
क्वेंटिन टोरन्टिनो या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हा ९ वा सिनेमा आहे. त्यामुळे त्याचं वेगळं महत्त्व आहे. 

८. पॅरासाइट (Parasite)

ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या मुख्य यादीत जागतिक सिनेमा असणे हे तसं दुर्मिळ आहे. गेल्यावर्षी रोमा हा मेक्सिकन सिनेमा ऑस्करच्या मुख्य यादीत होता. यावर्षी ही जागा ‘बॉन्ग जून हो’ या प्रसिद्ध दक्षिण कोरियन दिग्दर्शकाच्या पॅरासाइट सिनेमाने घेतली आहे. 
समाजातील गरीब आणि श्रीमंत हे दोन स्तर ‘पॅरासाइट’ सिनेमाचा विषय आहे. समाजातील खालची पायरी आणि वरची पायरी दाखवण्यासाठी सिनेमात पायऱ्यांचाच वापर करण्यात आला आहे. एक कुटुंब बेसमेंटमध्ये राहातं, तर दुसरं कुटुंब हे मोठ्या घरात राहतं. एका घरात एवढं समान आहे की खोली पुरत नाही आणि दुसऱ्या घरात भरपूर जागा आहे, पण माणसं आणि वस्तू नाहीत. पॅरासाइट सिनेमा या दोन समांतर विश्वांना कलात्मकतेने दाखवतो. 

९. मॅरेज स्टोरी (Marriage Story)

मॅरिज स्टोरी ही घटस्फोटाची कथा आहे. कथानकातली मुख्य दोन्ही पात्रं ही नाटकात अभिनय करणारी आहेत. त्यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर कसा परिणाम होतो हे खेळकर आणि आणि फार गंभीर न होता दाखवण्यात आलं आहे. स्कार्लेट जोहान्सन या अभिनेत्रीचा ऑस्करच्या शर्यतीत असलेला हा दुसरा सिनेमा आहे.  

यापैकी किती  सिनेमे तुम्ही पाहिले आहेत?? आणि कोणत्या सिनेमाला अखेरीस पुरस्कार मिळेल असं तुम्हांला वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required