computer

प्रेमत्रिकोणावर तोडगा म्हणून चक्क नाणेफेक? पण पुढे झालं काय?

प्रेम आणि प्रेमप्रकरणांची आपल्या आजूबाजूला कमी नाही. त्यात आगळ्यावेगळ्या भन्नाट प्रेमाच्या गोष्टी आणि किस्सेही आपण नेहमी ऐकत असतो. कधी एखादा सासूला घेऊन पळून जातो तर कुणी लग्नात आलेल्या पाहुण्यांपैकी एखाद्याला घेऊन पोबारा होतो. असे अनेक किस्से कानावर येत असतात. पण कर्नाटकातला एक किस्सा मात्र जास्तच विचित्र आहे.

बॉलिवूड सिनेमांमुळे प्रेमत्रिकोण काही नवलाईची गोष्ट राहिली नाहीय. अनेक ठिकाणी एक मुलगा दोन मुली किंवा दोन मुली एक मुलगा असे त्रिकोणी प्रेम असते. यांच्यातून अनेक भांडणे उभी राहतात. कारण लग्न फक्त दोघांचे होऊ शकते. यावर तोडगा म्हणून कर्नाटकात थेट टॉस करून मुलगा कुणाला मिळेल हे ठरविण्यात आले आहे.

कर्नाटकातील सकलेशपूर येथे एका युवकाची ओळख दुसऱ्या एका बाजूच्या गावातील मुलीशी झाली. त्यांच्यात पुढे प्रेमही झाले. पठ्ठ्याने दुसरीकडे अजून एका मुलीला लग्नाचा शब्द देऊन ठेवला. एके दिवशी हा भाऊ पहिल्या मुलीसोबत फिरताना दिसला म्हणून त्याच्या घरातल्या लोकांनी त्याचे लग्न ठरवण्याचा निर्णय घेतला.

त्याचे लग्न ठरत आहे हे ऐकून दोन्ही मुली आपापल्या कुटुंबाला घेऊन तिथे पोहोचल्या. तिथे कुठलाही निर्णय होत नाहीत हे बघून प्रकरण पंचायतीत गेले. आता तिथे पंचायत पण काय करणार? त्यांनी मग टॉस करून कुठल्या मुलीशी लग्न होईल हे ठरवले.

गोष्ट इथेच संपत नाही. एका बातमीनुसार तोवर शांत असलेला मुलगा मग अचानक टॉस हरलेल्या मुलीने कसा त्याच्यासाठी जीव देण्याचा प्रयत्न केला होता हे आठवतो आणि टॉस हरूनही तिच्या खऱ्या प्रेमासाठी तो तिच्याशी लग्न करायला तयार होतो.

आहे ना टोटल फिल्मी गोष्ट!!

सबस्क्राईब करा

* indicates required