computer

भेंडीला चक्क ८००रुपये किलो भाव मिळालाय? भेंडी, एवढं काय खास आहे या भेंडीत??

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत भाजीपाला फेकावा लागला याचे व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. खर्च सुद्धा निघत नाही असे भाव मिळत असल्यावर शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय उरत नाही. मध्य प्रदेशात मात्र एका शेतकऱ्याच्या भेंडीपिकाला तब्बल ८०० रुपये किलोचा भाव मिळाला आहे. देशभर या शेतकऱ्याचीच चर्चा आहे.

भेंडी ही व्हिटॅमिन ए आणि सी देण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने चांगली भाजी समजली जाते. प्रत्येक रेस्टॉरंटमधल्या मेन्यूवर भेंडी असतेच. सध्या भेंडी बरीच महागली आहे. शेतकऱ्यांना तर परवडत देखील नाही अशी परिस्थिती आहे.

मध्य प्रदेशातील मिसरीलाल राजपूत यांनी मात्र लाल भेंडी पिकवली आहे. ज्यामुळे त्यांच्या पिकाला इतका तगडा भाव मिळत आहे. ते सांगतात की लाल भेंडी हिरव्या भेंडीच्या मानाने कितीतरी अधिक आरोग्यदायी आहे. हृदयाचा, डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.

हिरव्या भेंडीपेक्षा या भेंडीची किंमत ही तब्बल १० पट अधिक असते. भोपाल जिल्ह्यातील खजुरी कलान परिसरातील शेतकरी असलेले मिसरीलाल सांगतात की, त्यांनी वाराणसीच्या शेती संशोधन संस्थेतून या पिकाचे बियाणे घेतले आणि ४० दिवसांत हे पीक तयार होण्यास सुरुवात झाली.

त्यात ते असेही सांगतात की कुठल्याही रासायनिक पेस्टीसाईड्सचा यात वापर केलेला नाही. एका एकरमध्ये कमीतकमी ४० क्विंंटल, तर जास्तीतजास्त ७० क्विंंटल भेंडी पिकू शकते. त्यांनी सांगितलेले हे सर्व वर्णन वाचून ही लाल भेंडी शेतकऱ्यांना श्रीमंत करू शकते. भविष्यात अजून प्रमाणात या लाल भेंडीचे उत्पन्न घेतले जाते का हे दिसेलच. यापूर्वी कोथिंबीर विकून फायदा झाल्याच्या बातमीमुळे सगळीकडे कोथिंबीर दिसत होती, आता सगळीकडे लाल भेंड्या दिसायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको!!

सबस्क्राईब करा

* indicates required