computer

व्हिन्सेंट व्हॅन गॉग- गरिबी, विक्षिप्तपणा, मानसिक अस्वास्थ्य ते आत्महत्या!! तुम्हांला यातलं काय माहित होतं?

कलाकार नेहमीच आपल्या कलेतून जिवंत राहतो. प्रत्यक्ष आयुष्यात चटके सोसूनही मृत्यूपश्चात उदंड प्रसिद्धी, सन्मान आणि आदर मिळालेले अनेक कलाकार होऊन गेले. याच यादीतील एक महत्वाचे नाव म्हणजे व्हिन्सेंट व्हॅन गॉग!

दीडशे वर्षापूर्वी जन्मलेल्या या कलाकाराला कधीच स्वतःची चित्रे फारशी आवडली नाहीत. पण आज मात्र त्याची चित्रे कोटींच्या भावाने विकली जातात. व्हिन्सेंट व्हॅन गॉगचा जन्म ३० मार्च १८५३ रोजी नेदरलँड्स येथे झाला. त्याच्या चित्रावर इम्प्रेशनिस्ट विचारसारणीचा प्रभाव जाणवतो.

त्याची चित्रे जितकी समजण्यास क्लिष्ट होती, तितकेच त्याचे वैयक्तिक आयुष्यही आश्चर्यकारक घटनांनी भरलेले आहे. त्याचे बालपण अतिशय दारिद्र्यात आणि दारूण अवस्थेत गेले. खाणकामगार आणि तत्सम कष्टकरी समाजाचे दु:ख तो आयुष्यभर पाहत आला. त्याच्या चित्रातही याच व्यथा उमटल्या.

‘द पोटॅटो इटर्स’ ही त्याची पहिली कलाकृती १८८५ मध्ये आली. यात शेतकऱ्यांची विषण्णता आणि त्यांच्या दारूण व्यथांचे चित्रण दिसते. चित्रकलेतच आपण चांगली कामगिरी करू शकतो यावर विश्वास बसल्यानंतर त्याने पुढे पॅरीसला प्रयाण केले. इथल्या चित्रकारांची लखलखीत रंगांचे छोटे छोटे फटकारे देण्याची शैली त्याला बेहद आवडली. इम्प्रेशनिस्ट चित्रकारांच्या विचारसरणीचा त्याच्यावर खूपच मोठा प्रभाव पडला. यानंतर पुढच्या प्रवासासाठी त्याने दक्षिण फ्रान्समधील अर्ल शहराकडे प्रयाण केले. दरम्यान त्याने जापनीज चित्रे आणि चित्रकलेचाही अभ्यास केला. यासाठी त्याने जापनीज चित्रांचा संग्रहदेखील जमवला. या चित्रातून त्याला त्याच्या अभिव्यक्तीसाठी नवी दिशा मिळाली.

१८८८ साली अर्ल मध्ये आल्यानंतर त्याने मोकळ्या जागेत जाऊन चित्रे काढण्याचा सराव सुरु केला. इथे आल्यानंतर त्याने पेंटींग्ज ऑफ ऑर्चर्ड सिरीजमधील चौदा पेंटींग्ज पूर्ण केली. यातील प्रत्येक पेंटिंगमध्ये त्याने काही ना काही नवता आणण्याचा प्रयत्न केला आहे. अर्ल मधील पावसाळी ऋतू त्याच्या सर्जनशीलतेसाठी जास्तच पोषक ठरला. आपल्या सगळ्या कलाकार मित्रांनी एकत्र येऊन एखादी आर्ट गॅलरी सुरु करावी अशी त्याची इच्छा होती.

यासाठी त्याने आपला मित्र गॉग्वीन याच्याशी संवाद साधून अर्लमध्ये येण्याची विनंती केली. दोघांनी मिळून वेगवेगळी पेंटींग्ज बनवायची आणि त्यातूनच स्वतःची आर्ट गॅलरी सुरू करायची असा त्याचा विचार होता.

गॉग्वीन आणि गॉग यांच्यात फक्त पाच वर्षांचं अंतर होतं. दोघेही एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते तरी, गॉगसाठी गॉग्वीन हा त्याचा मार्गदर्शक होता. सुरुवातीचे काही दिवस त्यांचं खूप छान जमलं. दोघेही गॉगच्या येलो हाऊस मध्ये राहत होते. दोघांनीही राहण्याचा निम्मा-निम्मा खर्च उचलायचा आणि घरातील कामं वाटून घ्यायची असं त्यांचं ठरलं होतं.

मात्र काही दिवसांतच दोघाही मित्रांमध्ये काही गोष्टीवरून खटके उडू लागले. चित्रांचा विषय, चित्र काढण्याची पद्धत, घरकाम किंवा घरखर्च अशा कारणांवरून दोघांच्यात वाद होत असत. वादाच्या क्षणी बऱ्याचदा गॉग आक्रमक होत असे. त्यामुळे गॉग्वीनला त्याच्यासोबत राहणं अवघड वाटू लागलं.

शेवटी वैतागून गॉग्वीन म्हणाला, “तू जर तुझ्या वागण्यात बदल नाही केला गॉग तर मी तुझ्यासोबत राहणार नाही. मी हे घर आणि हे शहर सोडून कायमचा निघून जाईन.”

गॉग्वीनची ही धमकी ऐकून गॉग खूपच अस्वस्थ व्हायचा. अशाच एका भांडणावेळी जेव्हा गॉग्वीनने घर सोडून जाण्याची धमकी दिली तेव्हा गॉगने त्याला चाकू हातात घेऊन मारून टाकण्याची धमकी दिली. गॉगचं असं विक्षिप्त वागणं दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. या प्रकरणानंतर गॉग्वीन तावातावाने घरातून बाहेर पडला.

गॉग्वीन खरंच आपल्याला सोडून निघून गेला की काय या भीतीने गॉगची पुरती गाळण उडाली. गोग्वीन पासून कायमचे दूर होण्याची भीतीने त्याचा थरकाप उडत होता. अशा निराश मन:स्थितीत त्याने हातात रेझर घेऊन आपल्याच हाताने आपल्या डाव्या कानाची पाळी कापून घेतली. अशा या चक्रम माणसासोबत राहणं अशक्य असल्याचं जाणवल्यानंतर गोग्वीन अर्ल सोडून निघून गेला.

आपल्याच हाताने आपलाच कान कापणाऱ्या गॉगने असं का केलं असावं याचं उत्तर आजही मिळालेलं नाही. त्याच्या विक्षिप्त वागण्यामागचं कारण ही समजू शकलं नाही. या घटनेनंतर काही दिवसांनी त्याला मानसिक उपचारासाठी मनोरुग्णालयातही ठेवण्यात आलं. इथे असतानाही त्यानं भरपूर चित्रं काढली. गॉग्वीन सोबत राहिल्याने गॉगच्या चित्रावर त्याचा थोडाफार ठसा उमटलाच होता. गॉग्वीनला कल्पनाचित्रे रेखाटण्याची आवड होती तर गॉगला निसर्गचित्रं. पण, नंतर दोघांच्याही चित्रांवर एकमेकांचा प्रभाव दिसू लागला.

दोघांच्याही एकत्र येण्यानं काही तरी भव्य दिव्य निर्माण होईल अशी अपेक्षा दोघांनाही होती मात्र गॉगच्या मानसिक अस्वास्थ्यामुळे या स्वप्नांवर विरजण पडलं. गॉगची मानसिक स्थिती शेवटपर्यंत अशीच राहिली. शेवटी त्याने आत्महत्या केली. त्याच्या अखेरच्या काळातील उदास भावानांची अभिव्यक्ती त्याच्या चित्रांतून झालेली आढळते.

गॉगच्या हयातीत त्याच्या चित्रांना कधी प्रसिद्धी मिळाली नाही की त्याच्या चित्रांचा खप वाढला नाही. पण म्हणून त्याने चित्रं काढण्याचं काम थांबवलं नाही. कलाकार हे काहीसे विक्षिप्त असतात असं म्हणतात ते काही खोटं नाही.


हे ही वाचा..
वेश्येला आपलं कान कापून देणारा 'व्हिन्सेंट व्हॅन गॉग' होता तरी कोण? 

वेश्येला आपलं कान कापून देणारा 'व्हिन्सेंट व्हॅन गॉग' होता तरी कोण ?


व्हिन्सेंट व्हॅन गॉग: तब्बल १२५ कलाकारांनी साकार केलेला जगातील पहिला चित्रमय सिनेमा!! 

तब्बल १२५ कलाकारांनी साकार केलेला जगातील पहिला चित्रमय सिनेमा !!

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required