कोणत्याही काँस्मेटिक क्रीम्स शिवाय मिळवा तजेलदार त्वचा....करा हे ५ उपाय !!

टीव्ही लावला रे लावला की पन्नास ब्युटी क्रीम्सच्या जाहिरातींचा आपल्यावर मारा व्हायला लागतो. त्यातपण स्त्रियांच्या क्रीम्स वेगळ्या आणि पुरुषांच्या वेगळ्या. शाहरुख खानची पाहिलीच असेल ती 'परी हू मै..!' ची जाहिरात! म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की, सगळ्यांनाच हल्ली 'लव्हली आणि फेअर' व्हायचं आहे. अर्थात त्वचेचा रंग ही निसर्गाची देणगी आहे. पण आजकाल उपलब्ध असलेल्या काँस्मेटिक क्रीम्स आणि काँस्मेटिक सर्जरीमुळे तुम्ही थेट कोणत्याही सेलिब्रिटीसारखे दिसू शकता..
पण कशाला हवेत हे महागडे उपचार?? आमच्याकडे तुमच्यासाठी अत्यंत सोप्पे उपाय आहेत. म्हणजे ते म्हणतात ना 'आजीच्या बटव्यातले नुस्खे' तसेच काहीसे उपाय. करायला सोप्पे!!
१. सगळ्यात आधी स्वतःला शरीरातील विषारी पदार्थांपासून मुक्त करायला हवे. त्यासाठी काय कराल? तर रोज जेवढे पाणी पिता त्याचे प्रमाण वाढवा. निदान ८ - १० ग्लास पाणी तरी पोटात गेलेच पाहिजे. म्हणजे विषारी द्रव्यांचा शरीराच्या आतून निचरा होईल आणि त्वचा आपसूकच नितळ होईल. त्यातून तुमची स्किन खूप कोरडी असेल तर हलकीशी मॉइश्चरायझिंग क्रिमपण लावत जा.. मात्र हे रोज करायला हवं..
२. आता चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या म्हटलं तर तुम्हाला आठवेल मेकअपचा थर!! पण त्याची गरज नाहीय. फक्त आहारातील व्हिटॅमिन सी चं प्रमाण वाढवा. व्हिटॅमिन सी म्हणजे 'नैसर्गिक अँटी रिंकल' पदार्थत असं आहे समजा. हे व्हिटॅमिन सी मिळवायचं कसं?? सोप्पं आहे. रसदार आंबट-गोड फळं भरपूर खायची. कधी मोड आलेली कडधान्यं आणि मिरच्यासुद्धा खायच्या हं.. हे पदार्थ तुमची त्वचा तरुण तेजस्वी राखतात.
३. धूळ प्रदूषणामुळे त्वचेतील ओलावा म्हणजे मॉइस्चर उडून जाते आणि आपली त्वचा निस्तेज दिसते. हे मॉइस्चर कायम राहावे म्हणून आणखी काही पदार्थ आहेत ते खाल्लेच पाहिजेत. द्राक्ष, बेरीज, प्लम ही फळं परत आणतील तुमच्या त्वचेचा ओलावा. कारण त्वचेच्या मऊपणासाठी हवं 'सॉर्बिटॉल' आणि हे सॉर्बिटॉल फळांना मधुरता देखील देतं. म्हणजे आपल्याला मॉइस्चर आणि माधुर्य दोन्ही मिळणार तर.
४. वडीलधारी मंडळी कायम सांगतात की आंघोळ कशी 'खसाखसा' करावी. म्हणजे मृतपेशी निघून जातात आणि शरीराला तरतरी येते. हा उपाय चेहऱ्याच्या त्वचेलाही लागू होतो. डॉक्टरी भाषेत याला म्हणतात एक्सफोलियेशन!! म्हणजे चेहऱ्यावरची डेड स्किन काढायची. आंघोळीचा लुफा चेहऱ्यावर हलकेच घासायचा किंवा छान स्क्रबर क्रीमने हलकेच मसाज करायचा. सगळ्या मृतपेशी निघून जातील आणि सगळी रंध्रे मोकळी होतील. त्वचेला तरतरी येईल. मात्र नंतर थोडे मॉइसचरायझर लावायला विसरू नका बरं..
५. हा शेवटचा उपाय मात्र काही जणांना नकोस वाटेल कारण त्यात तुमच्या आवडीचे दुग्धजन्य पदार्थ थोडे कमी करावे लागतील. म्हशीचे जाड सायीचा थर असलेले दूध जरी पौष्टिक असले तरी स्किनला थोडे त्रासदायक आहे. आणि तुमची स्किन फारच तेलकट असल्यास त्रास डबल!! आता दुग्धजन्य म्हणजे स्निग्ध पदार्थ. ते शरीराला तेल - तूप पुरवतात आणि त्यांच्या अतिसेवनाने चेहऱ्यावर फोड म्हणजे शुद्ध मराठीत 'पिंपल' येतात. म्हणून जर दूध हवंसच असेल तर स्कीम्ड मिल्क म्हणजे स्निग्धांश काढलेले दूध उत्तम. चेहऱ्याला ही आणि तब्येतीलाही बरंच नाही का ते?
कसं आहे ना माहिती सगळं असतं, पण आपल्याला रोजच्या रुटीन मध्ये लक्षात मात्र राहत नाही. म्हणून तुम्हाला 'रिमाईंडर' दयायला हा लेखप्रपंच!! सुरू करा मग हे आज पासूनच आणि काढा 'नो फिल्टर' नॅचरल सेल्फी..!!