computer

ॲपल सायडर व्हिनेगर- वजन कमी करा, शरीर डिटॉक्स करा.. आणखी काय फायदे आहेत?

तासनतास खुर्चीवर बसून वर्क फ्रॉम होम केल्याने आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होत असताना दिसत आहेत. याचा सर्वात जास्त प्रभाव आपल्या वजनावर होताना दिसतो. कंबरेजवळ आणि पोटावर अतिरिक्त चरबी साठतेय. या वाढत्या वजनामुळे अनेक लोक तणावाचे शिकारही होत आहेत. वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा फार पूर्वीपासून औषधाच्या स्वरुपात वापर करण्यात येत आहे. कमरेवरील चरबी घटवण्यासह शरीर डिटॉक्स करण्यापर्यंत,अ‍ॅपल सायडर व्हिनेगर खूप लाभदायक आहे. आज आपण याची सविस्तर माहिती घेऊयात.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर सफरचंदापासून तयार केला जातो आणि सफरचंदात आरोग्यासाठी फायदेशीर असे अनेक गुणधर्म असतात. हे सर्व शरीराला चांगले पोषण देतात. इतर कोणत्याही व्हिनेगरच्या तुलनेत अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मध्ये भरपूर जीवनसत्त्वे तसेच अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. हे वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे, तसेच यातील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते. तुम्ही सॅलडमध्ये ड्रेसिंग म्हणून याचा वापर करू शकता. ते कोणत्याही पेयात मिसळून पिऊ शकता. जर तुम्ही खास डिश बनवत असाल तर त्यातही त्याचा वापर करता येईल. याशिवाय कित्येक प्रकारच्या पाककृतींमध्येही याचा उपयोग केला जातो. व्हिनेगरमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असतात. त्यामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. इतर अनेक फायदे खालीलप्रमाणे आहेत.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमुळे सारखी भूक लागत नाही

या व्हिनेगरमुळे आपली पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. सोबत आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांचे हळूहळू, पण नियंत्रित गतीने पचन होते. यामुळे आपले पोट भरलेले राहते आणि सतत काही तरी खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे भूक नियंत्रित राहते.

अतिरिक्त ​चरबी घटवण्यासाठी

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमधील घटक आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्याचे कार्य करतात. नैसर्गिक पद्धतीने आपल्या कमरेवरील चरबी देखील कमी होण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी या व्हिनेगरमधील घटक पोषक आहेत. हे व्हिनेगर रोज एक चमचा तुम्ही पाण्यात मिसळून घेऊ शकता. अर्थातच, आहारतज्ञांच्या सल्याने व्हिनेगर किती प्रमाणात आणि कितीवेळा घ्यावे हे ठरवणे जास्त परिणामकारक ठरेल

भरपूर पोटॅशिअम आणि अमिनो अ‍ॅसिड

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये पोटॅशिअम आणि अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण भरपूर असते. हे व्हिनेगर आपल्या आरोग्यासाठी अँटी ऑक्सिडेंट्सप्रमाणे कार्य करते. यातील पोषण तत्त्वांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी मदत मिळते. पण कधीही केवळ हे व्हिनेगर पिण्याची चूक करू नका. पाणी आणि व्हिनेगर एकत्र करून प्यावे.

​शरीर डिटॉक्स करण्यासाठी

शरीर डिटॉक्स करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर एक उत्तम पर्याय आहे. यातील औषधी गुणधर्म शरीरातील अनावश्यक आणि विषारी तत्त्वे बाहेर फेकण्याचे काम करतात. या प्रक्रियेमुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत नाही. पण जास्त प्रमाणात या व्हिनेगरचे सेवन करणे टाळावे. आरोग्यास अपाय होऊ नये, यासाठी मर्यादित प्रमाणात अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यास शरीरास लाभ मिळू शकतील.

हानिकारक ​बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी

दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कित्येक प्रकारच्या पदार्थांचे सेवन करतो. याद्वारे कळत - नकळत असंख्य हानिकारक विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. काही बॅक्टेरिया गरजेचे असतात तर काही बॅक्टेरियांमुळे कित्येक प्रकारच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमुळे हानिकारक ​बॅक्टेरिया मारले जातात.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे फायदे आम्ही सांगितले, पण प्रत्येकाची जीवनशैली आणि शारीरिक स्थिती वेगळी असते. त्याप्रमाणे याचे सेवन करणे हितावह ठरते. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेऊनच याचे सेवन करावे.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required