बिल गेटस यांनी 'शी'ने भरलेली बरणी स्टेजवरून का दाखवली ??

बिल भाऊ गेट्स यांनी २००९ सालच्या कॅलिफोर्नियामधल्या सभागृहात चक्क मलेरियाचे मच्छर सोडले होते. मलेरियाच्या धोक्याबद्दल कल्पना देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला होता. नंतर समजलं होतं की ते सगळे मच्छर रोग मुक्त होते. आज बिल गेट्स पुन्हा अशाच एका अतरंगी प्रकारामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी चक्क ‘शी’ ने भरलेली बरणी स्टेजवर आणली आहे राव!!

तर, मुद्दा असा आहे की जेव्हा बिलतात्या सारखा मोठा माणूस स्टेजवर ‘शी’ घेऊन येतो तेव्हा त्याला कारणही तसंच काहीसं असतं. बिल गेट्सने शौचालय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती पसरवण्यासाठी हा अजब प्रकार केला.

स्रोत

बीजिंग येथील आपल्या भाषणात त्यांनी म्हटलं, “या बरणीत २०० ट्रिलियन रोटाव्हायरस म्हणजे अतिसाराला कारणीभूत असलेल्या पेशी, २० अब्ज शिगेला म्हणजे पोटाचे विकार निर्माण करणारे बॅक्टेरिया,  आणि १,००,००० परजीवी कीटकांची अंडी आहेत”.  पुढे ते म्हणाले की  हे सगळे विषाणू ५ वर्षांच्या आतल्या तब्बल ५,००,०००  मुलांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरू शकतात.

बीजिंगमध्ये झालेल्या Reinvented Toilet Expo या ३ दिवसांच्या कार्यक्रमात बिल गेट्स बोलत होते. या ठिकाणी २० पेक्षा जास्त कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांनी विकसित केलेल्या नवनवीन शौचालय तंत्रज्ञानांचं प्रदर्शन भरवलं होतं. स्वच्छता आणि शौचालय संदर्भात नवीन वाटा शोधण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बिल गेट्स यांचंही यात मोठं योगदान आहे. त्यांनी आणि त्यांच्या कंपनीने जवळजवळ २७६ मिलियन डॉलर्स खर्च करून सुरक्षित स्वच्छता तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

स्रोत

मंडळी, शौचालय आणि संबंधित स्वच्छता हा खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. UNICEF च्या अहवालानुसार स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसाराला बळी पडून दर वर्षी ५ वर्षाखालील ४,८०,००० मुलांचा मृत्यू होतो. याच गोष्टीकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी बिल गेट्स यांनी ‘शी’ ने भरलेली बरणी १० मिनिटे स्टेजवर आणून ठेवली होती. बिलतात्यांना मानलं बुवा! या आधी अशा प्रकारची जनजागृती कोणीच केली नव्हती राव.

सबस्क्राईब करा

* indicates required