computer

तुम्ही 'दीक्षित' की ' दिवेकर' ? हे ठरवण्यापूर्वी हे नक्की वाचा !! आहाराचे सहा पंथ !

मंडळी सध्या दीक्षित आणि दिवेकर डाएटची जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्यापैकी अनेकजण डॉ. दीक्षित किंवा दिवेकर यांनी सुचवलेल्या डाएट पद्धतीचा अवलंब करत असाल. कुठली पद्धत चांगली यावरही आपली मते मांडत असाल. पण तुम्हाला माहीत आहे? या पद्धती आधीपासूनच अस्तित्वात आहेत. आणि फक्त या दोनच नाही तर एकूण सहा डाएट प्लॅन्स जगभरात लोकप्रिय आहेत. हे डाएट प्लॅन्स चांगल्या जीवनशैलीसाठी बनवले गेले मात्र आपण दुर्दैवाने त्यातला फक्त एकच घटक लक्षात घेतोय, तो म्हणजे वजन कमी करणे! 

हे प्लॅन्स का तयार करावे लागले याचीही कारणे आहेत मंडळी… रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण काय आणि किती जेवतो यावर नियंत्रण राहत नाही. मग त्यातून अनेक विकार निर्माण होतात. बद्धकोष्ठ, ऍसिडिटी, अपचन असे आजार होतात. पाठदुखी, सांधेदुखी वगैरे व्याधी मागे लागतात तसेच झोप न येणे, थकवा वाटणे असेही प्रकार होतात. हे प्लॅन अवलंबल्यास या सर्वांपासून वाचता येते. आपण जेव्हा काही खातो तेव्हा आपल्या स्वादुपिंडात इन्सुलिन तयार होते. हे इन्सुलिन जर जास्त प्रमाणात तयार झाले तर त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीर जाड व लठ्ठ बनते. नेहमी खात राहिल्यास नेहमीच इन्सुलिन तयार होत असल्याने खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे ठरले आणि या पद्धती अस्तित्वात आल्या.

पण त्यासोबतच, वजन कमी करणे हा अनेक उद्देशांपैकी एक उद्देश आहे. तो मुख्य उद्देश नाही हे लक्षात घ्यायला हवं… चला जाणून घेऊया जगभरातील सहा लोकप्रिय डाएट प्लॅन्स जे आपल्या जीवनशैलीवर प्रभाव टाकू शकतात…

1) 16/8 पद्धत

या 16/8 पद्धतीमध्ये दिवसातील 16 तास उपवास पाळायचा असतो. जे काही खायचं ते फक्त 8 तासामध्येच. पण याचा अर्थ असा नाही की 8 तास खातच राहायचं… या 8 तासांमध्ये 2 किंवा 3 वेळेस जेवण करता येते. 

ही पद्धत ‘लिनगेन्स प्रोटोकॉल’ म्हणून ओळखली जाते आणि याला प्रसिद्ध करण्याचे श्रेय जाते फिटनेस तज्ञ मार्टिन बेरखान कडे.

ही पद्धत पाळायचा सोपा मार्ग म्हणजे तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर उपवास सुरू करून दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या जेवणापर्यंत पाळणे. सकाळचा नाश्ता यामध्ये टाळला जातो. उदाहरणार्थ, तुमचे जेवण रात्री 8 वाजता झाले असेल तर दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत काहीही खायचे नाही. पण या मधल्या काळात तुम्ही चहा कॉफी, पाणी किंवा इतर पेय घेऊ शकता. 

लक्षात ठेवा, खाण्याच्या 8 तासात जर तुम्ही जंक फूड खात असाल तर ही पद्धत कामी येऊ शकणार नाही. पण या पद्धतीमध्ये महिलांना 1-2 तासांची सूट दिलेली आहे. महिला 16 तासाऐवजी 14-15 तासांचा उपवास करू शकतात.

2) 5:2 डाएट

आठवड्यातील 5 दिवस जेवणे आणि 2 दिवस संपूर्ण उपवास अशी यामागची संकल्पना आहे. या पद्धतीला फास्ट डाएट म्हणतात आणि ही पद्धत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते ब्रिटिश पत्रकार आणि डॉक्टर मायकल मोसली यांना. 

या 5:2 डाएट मध्ये जे दोन दिवस उपवासाचे असतात त्यात किमान 500-600 कॅलरी पोटात जायला हव्यात असा सल्ला दिला जातो. बाकी दिवशी तुमचे दैनंदिन कॅलरीचे जेवण करण्यास हरकत नाही.

उदाहरणार्थ, तुम्ही सोमवारी उपवास पाळला तर मंगळवार, बुधवार जेवण करून परत गुरुवारी उपवास करू शकता. नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार जेवण करू शकता. आठवड्यातील कुठले दोन दिवस उपवास पाळायचा हे तुम्हीच ठरवा मात्र त्यात योग्य अंतर असायला हवे. या पद्धतीचे फायदे होतात की नाही याबाबत बरीच मतमतांतरे असली तरी अनेकांनी याचा वापर करून बघितलेला आहे.
 

3) 24 तासांचा उपवास आठवड्यातून एकदा किंवा दोनदा

ही पद्धत लोकप्रिय केली फिटनेस तज्ञ ब्रॅड पिलन यांनी. आणि ही काही वर्षांपासून चांगलीच मान्यता पावलेली आहे. या मध्ये आठ दिवसातून एकदा किंवा दोनदा पूर्ण 24 तासांचा उपवास करायचा असतो. म्हणजे, आज रात्रीच्या जेवणापासून ते उद्या रात्रीच्या जेवणापर्यंत काहीही खायचे नाही. यात तुम्ही नाश्ता ते नाश्ता किंवा दुपारचे जेवण ते दुपारचे जेवण असेही बदल करू शकता. मधल्या काळात कमी कॅलरीचे पेय, पाणी चहा कॉफी पिल्यास चालू शकते पण घन खाद्यपदार्थ अजिबात चालणार नाहीत.

ही पद्धत अवलंबण्यास काही जणांना कठीण जाते कारण पूर्ण 24 तासांचा उपवास केल्याने अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे सुरुवातीला 14-16 तास उपवास करून नंतर कालावधी वाढवत नेल्यास सोपे जाईल. पण जेव्हा जेवण्याचा दिवस असेल तेव्हा नॉर्मल जेवण करण्यास विसरू नका. 

4) एक दिवसाआड उपवास

या पद्धतीमध्ये एक दिवस जेवण आणि एक दिवस उपवास अशी संकल्पना आहे. म्हणजे सोमवारी जेवण केल्यास मंगळवारी उपवास, बुधवारी जेवण आणि गुरुवारी उपवास असे एक दिवसाआड करत गेल्यास या डाएटचा फायदा होतो. परंतु नवीन लोकांनी या पद्धतीच्या मार्गाला जाऊ नये. आठवड्यातून कित्येक दिवस उपाशी राहण्याने तब्येतीवर उलटा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. या डाएट मध्ये अनेक उपप्रकार आहेत. काहीजण उपवासाच्या दिवशी 500 कॅलरी पर्यंत पदार्थांचे सेवन करण्यास सुचवतात. हा कॅलरीचा आकडा अनेकांनी कमी जास्त सांगितलेला आहे. तुमच्या प्रकृतीला हे शक्य असेल तरच या पद्धतीचा अवलंब करावा असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. 

5) वॉरिअर डाएट

युद्धावर असणारे सैनिक जसे दिवसभर काही न खाता कामावर लक्ष केंद्रित करतात आणि युद्ध संपल्यावर रात्री एकदाच जेवतात तसेच या उपवासाच्या पद्धतीमध्ये दिवसभर संपूर्ण उपवास आणि रात्री भरपेट जेवण अशी संकल्पना आहे. ही पद्धत ओरी होफमेकलर यांनी प्रचलित केली. दिवसभर संपूर्ण उपवास करून रात्री एकदाच भरपूर प्रमाणात जेवण करावे असा सल्ला यात दिला जातो. दिवसा फारच भूक लागल्यास अल्प प्रमाणात फळे खाल्ली तर चालतात. ही पद्धत सुदधा अनेक ठिकाणी लोकप्रिय आहे आणि याचा फायदा झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. 

6) उत्स्फूर्त उपवास

या मध्ये जसा जमेल तसा उपवास करण्यात सांगितले जाते. तुम्हाला कुठलाही डाएट प्लॅन अवलंबण्याची गरज यात नाही. तुमच्या सोयीप्रमाणे, तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता.
असा एक गैरसमज असतो की, ठराविक वेळेत जेवण न केल्यास मनुष्य उपासमारीने अशक्त होतो. पण तसे काही नसते मंडळी. नॉर्मल मानवी शरीरात आवश्यक घटकांचा साठा असतो जो एखादेवेळी उपवास घडला तरी उपासमार होऊ देत नाही. 

तर, तुम्ही नाश्ता केला आहे आणि दुपारी जास्त भूक नसेल तर सरळ दुपारचे जेवण टाळा. किंवा रात्री जास्त भूक नसेल तर जबरदस्तीने जेवण्यापेक्षा सरळ जेवण टाळून झोपायला जा. प्रवासात असाल तर बाहेरचे खाण्यापेक्षा शक्यतो खाणेच टाळा. सोयीनुसार एखादा नाश्ता किंवा एकवेळचे जेवण रद्द केल्यास फायदा होऊ शकतो. मात्र ज्या वेळी खाल, त्यावेळी आरोग्यदायी अन्नच सेवन करा. 

जाता जाता -

(डॉ. जगन्नाथ दीक्षित)

तर मंडळी जगभरात लोकप्रिय असणाऱ्या या डाएट पद्धती आपण पाहिल्यात. यातल्याच काही पद्धती दीक्षित किंवा दिवेकर किंवा इतर कुणाच्या नावे आपण ओळखतो. 
जगातील अनेक लोकांना या पद्धती वापरून फायदा झालेला आहे, होत आहे. 

पण सगळे करतात म्हणून आपणही एखादा डाएट प्लॅन करावा असे मनात असेल तर ते चुकीचे आहे मंडळी! आपले आरोग्य चांगले असेल, स्वतःच्या प्रकृतीविषयी आपण समाधानी असाल तर आपले दैनंदिन जेवणखाण चालू ठेवणेच इष्ट आहे. मग तुम्ही या सर्व पद्धतींकडे सरळ दुर्लक्ष केलेलेच उत्तम असेल. 

आणखी एक, जर तुम्हाला यातला कुठला प्लॅन निवडायचा असेल तर लक्षात असू द्या की, हे प्लॅन्स फक्त वजन कमी करणे यासाठी बनवले नसून शरीराचे मेटोबोलीजम सुधारणे, चांगली जीवनशैली बनवणे आणि आयुष्य जास्त काळ जगणे यासाठी बनवले आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required