computer

वैद्य सांगताहेत हेल्दी नाश्त्याचे २९ पर्याय. तेही सहज,सोपे आणि कमीत कमी वेळेत होऊ शकणारे..

तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका,आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणतात. "अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?'"असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना हा लेख समर्पित आहे. अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २९ पथ्य पदार्थांची यादी देत आहे. महिना तर ३०/३१ दिवसांचा.  मग एक-दोन पदार्थ कमी का? तर  याचं उत्तर पोस्टच्या तळाशी सापडेल. अहं! आधी लेख पूर्ण वाचा. माझे अमहाराष्ट्रीय पेशंट सुद्धा समजावून सांगितले की हे पदार्थ करून खातात.  त्यामुळे व्यर्थ  कारणं किमान मराठी लोकांनी तरी देऊ नयेत.


तर हे आहेत नाश्त्यासाठीचे उत्तम पदार्थ आणि तेही अगदी सहज, सोपे आणि कमीत कमी वेळेत होऊ शकणारे..
 

१. भाज्या आणि मिश्र पीठ वापरून कोथिंबीर वडीप्रमाणे वाफवून वडी अथवा बट्ट्या

या वड्या पुदिना/लसूण/खोबरे /तीळ चटणी बरोबर अत्यंत रूचकर लागतात.

२. मिश्र भाज्यांचा पराठा साजूक तूप 

३. मिश्र भाज्यांचे(किसून कोबी/ गाजर/मुळा/ इ.)थालीपीठ किंवा धिरडे

४.अंड्याचे ऑम्लेट अथवा नुसतेच उकडलेले अंडे 

५.मटार,मका,घेवडा,खोबरे,डाळी,टोमॅटो,इतर भाज्या वापरून पोहे/उपमा.

६.फोडणीची ताक भाकरी.

७.ओले खोबरे, डाळी, शेंगदाणे, मटार टाकून तांदळाचे उब्जे

८.भाकरी गूळ-तुपाचा लाडू

९.दडपे पोहे भरपूर ओले खोबरे,कोथिंबीर ,कांदा तसेच लिंबाचा रस टाकून

१०.क्वचित साजूक तुपाचा कणकेचा केळ घालून शिरा

११. नाचणीची उकड

१२. नाचणीची भाकरी व खोबरे चटणी

१३. शिजवलेल्या हिरव्या मुगाची कांदा, टोमॅटो शेव घालून मिसळ

१४.ओले खोबरे वापरून साबुदाणा खिचडी

१५.खारीक-खोबरे-डिंक-मेथ्या पौष्टिक लाडू आणि सुंठ घालून गरम दूध

१६. पुदिना-जवस चटणीसोबत मिश्र पिठाचा ढोकळा

१७.तांदुळाचे घावन (डोसा/पॅनकेक)

१८.मिश्र पिठाचे धिरडे व चटणी

१९. मोड आलेल्या हिरव्या शिजवलेल्या मुगाचा डोसा /इडली /अप्पे इ.

२०.गव्हाच्या दलियाची गुळाची गरम लापशी

२१.ओले खोबरे मटार,मका,भाज्या हिरवी मिरची घालून फोडणीचा गव्हाचा दलिया

२२. खमंग भाजलेल्या गव्हाच्या पिठाची झणझणीत उकडपेंडी

२३.गुळाचा राजगिरा लाडू/चिक्की दुधाबरोबर

२४.साळीच्या लाहीचा चिवडा कांदा टोमॅटो शेव घालून भेळेसारखा

२५. फोडणीच्या तिखट शेवया

२६.रताळ्याचे पॅटिस (गाजर व इतर भाज्या वापरून )

२७.रताळ्याची गुळ घालून खीर अथवा शिरा

२८.मुगाची डाळ शिजवून त्यात कणिक मिसळून करून केलेला पौष्टिक पराठा

२९.फोडणीची भगर आणि ताक

 

३० वा पदार्थ दिला नाही.  कारण जर २९ दिवस हे पदार्थ तुम्ही नेमाने आळीपाळीने खाल्ले, तर ३०वा दिवस तुमचा हक्काचा असेल. भरपूर बटर थापून ब्रेड, टोस्ट खा किंवा वैशाली वाडेश्वरला जाऊन इडली-डोसा, उडीदवडा चोपा. 

वैद्य रुपाली पानसे, आद्यआयुर्वेद, पुणे. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required