computer

१९३० पासून १९९४मध्ये झालेल्या भारतातल्या पहिल्या हृदयरोपण शस्त्रक्रियेपर्यंतचा हार्ट ट्रान्सप्लांट तंत्राचा प्रवास!! हा तर वाचायलाच हवा!!

हृदय प्रत्यारोपण म्हणजे नेहमीच्या शब्दांत सांगायचं तर हार्ट ट्रान्सप्लांट आज अनेकांसाठी वरदान ठरलं आहे. मात्र या तंत्राचा आजवरचा प्रवास तसा खाचखळग्यांनी भरलेला आहे. जगात पहिलं हृदय प्रत्यारोपण झालं दक्षिण आफ्रिकेमध्ये १९६७ साली. तिथला कार्डीयॅक सर्जन क्रिस्तियान बर्नार्ड याने अशी शस्त्रक्रिया करण्याचा धोका पत्करला आणि आधुनिक वैद्यकशास्त्रातला एक चमत्कार घडवून दाखवला. हे तसं अंधारात उडी मारण्यासारखंच होतं, पण या माणसाकडे गट्स होते, आत्मविश्वास होता. यात किती आणि कोणकोणते धोके होते हे पाहिलं तर त्याच्या धाडसाचं मोल लक्षात येतं.

त्यासाठी जाऊयात १९३० च्या दशकात.

त्या काळात हृदयावर शस्त्रक्रिया करताना मोठमोठ्या नामांकित सर्जन्सना घाम फुटायचा. विशेषकरून आकाराने लहान आणि नाजूक अशा हृदय आणि रक्तवाहिन्यांना हाताळणं महाकठीण होतं. हृदय एका विशिष्ट लयीत कंपन पावत असल्याने ते अजून कठीण जायचं. कुठे एवढीशी चूक झाली तरी ती थेट जीवावर बेतण्याची भीती! कारण हृदयाच्या स्पंदनांमुळेच तर पार मेंदूपर्यंत महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा होतो. त्यामुळे या रक्तवाहिन्यांना कुठे धक्का लागला तर हा रक्तपुरवठा बंद पडण्याचा आणि त्यातून तो अवयव कायमसाठी निकामी होण्याचा धोका असे.

साधारण त्याच काळात फिलाडेल्फिया इथल्या एका सर्जनने एक मशीन तयार केलं होतं. हे मशीन हृदय आणि फुफ्फुस यांची प्रतिकृती होती. त्या मशीनचं नाव होतं हार्ट लंग मशीन आणि त्याच्या संशोधकांचं नाव होतं जॉन हेशॅम गिब्बन. हे मशीन गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियांदरम्यान हृदय आणि फुफ्फुस यांची कामं करायचं, त्यामुळे या शस्त्रक्रिया थोड्या का होईना सुलभ झाल्या होत्या. एखाद्या स्टील बारपासून बनवलेल्या ट्रॉलीसारखं दिसणारं हे यंत्र हृदयातून रक्त काढून घेऊन, त्यात ऑक्सिजन मिसळून, शरीराकडे परत पंप करायचं.

या हार्ट लंग मशीनचा आधी मांजरांवर प्रयोग केला गेला. साधारण वीस वर्षं ट्रायल अँड एररने त्यात सुधारणा केल्या गेल्या. त्यानंतर १९५३ मध्ये पहिल्यांदाच ते मानवी शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आलं. ऑपरेशन होतं एका किशोरवयीन मुलीचं. ऑपरेशन यशस्वी झालं. इतकं, की ती पेशंट स्वतः गिब्बनपेक्षा जास्त काळ जगली!

हार्ट लंग मशीनने प्रत्यारोपणाचं काम नजरेच्या टप्प्यात तर आणलं, पण अजून एक प्रश्न होता. तो म्हणजे शरीराच्या बाहेर काढलेलं हृदय जिवंत ठेवणं. मात्र नॉर्मन शमवे आणि रिचर्ड लोवर हे स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधले दोन डॉक्टर्स यावर आधीपासूनच काम करत होते. कुत्र्यांवर केलेल्या प्रयोगातून त्यांनी टॉपिकल हायपोथर्मिया नावाची पद्धत विकसित केली होती. यात शरीराचं तपमान ८९.६ फॅरनहाईटपर्यंत कमी केलं जातं. त्यानंतर बर्फाइतकं थंड असं आयसोटोनिक (आयसोटोनिक म्हणजे द्रावक आणि त्यात विरघळणारं द्राव्य समप्रमाणात असलेलं) सलाईन सोल्युशन हृदयातून फिरवलं जातं, ज्यामुळे हृदयाचं तापमान अजून खाली जातं. यामुळे हृदयाचं पंपिंग कमी वेगाने होतं, पण पूर्ण थांबत नाही. अशा परिस्थितीत हृदय कुठलाही बिघाड न होता एक तासभर सुस्थितीत राहू शकतं.

थोडक्यात हार्ट लंग मशीन होतं, शरीराबाहेरही हृदय व्यवस्थित काम करू शकेल अशी यंत्रणा विकसित झालेली होती, फक्त प्रत्यक्ष प्रत्यारोपणाची खोटी होती. तीही, हे ऑपरेशन करायला कुणी धजावत नव्हतं त्यामुळे! आणि इथेच क्रिस्तियान बर्नार्डने बाजी मारली. पहिलं प्रत्यारोपण होणाऱ्या पेशंटचं नाव होतं लुईस वाशकॅन्सकी. त्यासाठी एका अपघातात मरण पावलेल्या डेनिस डुवाल नावाच्या २५ वर्षांच्या तरुणीचं हृदय वापरण्यात आलं. ते पूर्णपणे बंद पडण्यासाठी १२ मिनिटं लागली. त्यानंतर वाशकॅन्सकीला ऑपरेशन थिएटरमध्ये आणण्यात आलं. मग टॉपिकल हायपोथर्मियाची प्रक्रिया सुरू झाली. ५ तासांत प्रत्यारोपण पूर्ण झालं.
 

या ऑपरेशनला लाईफ मासिकात प्रसिद्धी दिली गेली, तीही त्याच्या अंकाच्या कव्हरवर. यामुळे बर्नार्ड विश्वविख्यात बनला. पण १८ दिवसांनीच वाशकॅन्सकी न्यूमोनिया होऊन मरण पावला. एक मात्र होतं, त्याच्या शरीराने नवीन हृदय नाकारलं नव्हतं! निदान ते त्याच्या मृत्यूचं कारण तरी नव्हतं. पण तरी पहिली कित्येक वर्षं हृदय प्रत्यारोपण शास्त्रक्रियांनी जोर धरलाच नाही. अजूनही त्यात इन्फेक्शन, ऑर्गन रिजेक्शन आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचा धोका खूप होता. अगदी त्यावर बंदी आणावी अशीही मागणी जोर धरत होती.

शरीर फॉरेन बॉडी कशा प्रकारे नाकारते यावर संशोधन झालं आणि मग त्यावर उपायही शोधण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. त्यांना जसजसं यश येत गेलं तसतसं अवयव रोपण म्हणजेच ऑर्गन ट्रान्सप्लांट उपचारांना बरे दिवस आले. पण आजही जितक्या प्रमाणात किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट केलं जातं तितक्या प्रमाणात हार्ट ट्रान्सप्लांट केलं जात नाही.
 

दरम्यान १९५४ सालापासून भारतातही हृदय प्रत्यारोपणावर संशोधन सुरू झालं होतं. डॉ. पी. के. सेन या कार्डीयॅक सर्जनने बेडकांवर प्रयोग केले होते. शेवटची पायरी म्हणून ऍनाटॉमीचा अभ्यास करण्यासाठी माणसांच्या प्रेतांचा त्यांच्या टीमने डीटेल अभ्यास केला होता. १६ फेब्रुवारी १९६८ या दिवशी डॉ. सेन यांनी आशिया खंडातली पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. मात्र ती अयशस्वी ठरली. भारतात पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडण्याचं श्रेय एम्स(AIIMS)च्या पी. वेणूगोपाल यांना जातं. ही घटना १९९४ मधली.

बर्नार्डने केलेलं ऑपरेशन 'पहिलं' म्हणून कितीही प्रसिद्ध झालं असलं तरी ते करायची खरंच गरज होती का? ते बरोबर होतं का? या प्रश्नाचं नैतिकदृष्ट्या योग्य उत्तर आजही कुणी देऊ शकलेलं नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required