computer

स्त्री बीजांडाच्या काळ्याबाजारानंतर आता वाचा मानवी गर्भाच्या तस्करीची गोष्ट!!

एक काळ असा होता की भारतात आणि त्यामुळे सिनेमातसुद्धा सगळीकडे स्मगलर्स असायचे. सोने, चांदी, हिरे, अंमली पदार्थ यांच्या मोठ्या प्रमाणावर तस्करी चालत असे. आताही ती काही बंद झाली नाहीय, पण आताशा स्मगल होणाऱ्या वस्तू आणि स्मगलिंगच्या पद्धती बदलल्या आहेत. डीआरआय म्हणजे डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स ही केंद्र सरकारी सरकारच्या अखत्यारीत येणारी संस्था देशात होणाऱ्या तस्करीला आळा घालत असते. अर्थात त्यांबद्दल वृत्तपत्रात येणार्‍या बातम्यांमधून आपण वाचत असतोच. सर्वसाधारणपणे सोने आणि मादक पदार्थांच्या तस्करीवर बारीक नजर ठेवणारी ही संस्था इतर प्रकारच्याही काही तस्करीवर आळा घालण्यासाठी गस्त घालत असते. 

२०१९ च्या मार्च महिन्यात अशाच एका जगावेगळ्या तस्करीची कुणकुण डीआरआयला लागली होती. पार्थेबान दुराई या तस्कराला अर्थातच डीआरआय आपल्या पाळतीवर आहे याची कल्पना नव्हती.

(स्रोत)

पार्थेबान दुराई या तस्कराला अर्थातच डीआरआय आपल्या पाळतीवर आहे याची कल्पना नव्हती. मलेशियाहून येणार्‍या पार्थेबन दुराई मुंबईच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा तो अत्यंत निर्धास्त होता. त्याने आणलेली वस्तू कस्टम अधिकार्‍यांच्या नजरेत भरणार नाही अशीच होती. त्याच्या बॅगेत एक धातूची थंडगार कुपी (कॅनिस्टर) होती. या कुपीचा आकारही फारसा मोठा नसल्याने आपण सहज कस्टमचा दरवाजा पार करू अशा भ्रमात असलेल्या पार्थेबन दुराईला जेव्हा डीआरआयच्या अधिकार्‍यांनी घेरले तेव्हा तो गांगरला आणि त्यानी ती कुपी डीआरआयच्या स्वाधीन केली. 

काय होते त्या कुपीत ?

वरवर साध्या दिसणार्‍या त्या कुपीत एक जिवंत मानवी कोंब म्हणजे ह्युमन एंब्रियो (मानवी गर्भ) होता. द्रवीभूत नायट्रोजन (लिक्वीड नायट्रोजन) वापरून Cryo preservation केलेला हा गर्भ अर्थातच काही दिवसांचा होता. सरोगसीवर बंदी आल्यानंतर चक्क मानवी गर्भ स्मगलिंग करणार्‍या एका मोठ्या तस्करी टोळीसाठी 'कॅरीअर' म्हणून काम करणारा पार्थेबन डीआरआयच्या ताब्यात आल्यावर पोपटसारखा बोलायला लागला. अशी तस्करी त्याने यापूर्वीही अनेक वेळा केल्याची कबुली दिली. प्रत्येक वेळी मालाची 'डिलीव्हरी' केल्यावर आपल्याला ४५०० आरएम (Malaysian Ringgit) मिळत असल्याची माहिती दिली. ( एक Malaysian Ringgit म्हणजे १७.५०रुपये)  पार्थेबन दुराईचे पुढे काय झाले आपण नंतर वाचूयाच, पण त्याआधी हा मानवी गर्भ तस्करी हा काय प्रकार आहे हे बघू या! 

काय असतो क्रिप्टो प्रिजर्व्हड एंब्रियो?

या आधीच्या लेखात आपण स्त्री बीजांडाच्या काळया व्यापाराबद्दल वाचलेच आहे. क्रिप्टो प्रिजर्व्हड एंब्रियो ही त्याच व्यापाराची पुढची पायरी आहे. यात आयव्हीएफ तंत्र वापरून स्त्री बीजांड आणि पुरुष शूक्राणू यांचे मिलन घडवून आणले जाते. थोडक्यात गर्भाशयाबाहेर एका मानवी जीवाचा जन्म होतो. आता अशा पध्दतीने तयार झालेला गर्भ सुरक्षितरित्या मातेच्या ओटीत घालणे ही पुढची पायरी आहे.

पण ज्या देशात हा गर्भ तयार झाला तेथे सरोगसीवर बंदी असेल तर काय? त्यावर उपाय असा आहे की गर्भ लिक्वीड नायट्रोजन वापरून सुमारे -२१० ते -१९६  डिग्री  तापमानाला गोठवून भारतासारख्या देशात पाठवायचा आणि तिथे गुपचुप बेकायदेशीर सरोगसी करायची. गर्भ गोठवल्यावर विज्ञानाचे काम संपते आणि आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीचे काम सुरु होते. पार्थेबनसारख्या कॅरीअरचा वापर करून हा मानवी जीवाचा नवजात कोंब सरोगसीसाठी भारतातल्या नावाजलेल्या आयव्हीएफ सेंटरपर्यंत पोहचवला जात असे. 

आता बघू या पार्थेबन दुराईचे पुढे काय झाले ?

डीआरआयने पटापटा बोलणार्‍या दुराईचा वापर करून एक स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरवले. पार्थेबन दुराई हा तर रॅकेटचा एक छोटा पित्त्या होता. त्याच्या मोबाईलवरच्या टेक्स्ट मेसेज वरून हे कळले होते की त्याची मलेशियामधील टोळी हार्ट टू आर्ट या आयव्हीएफ सेंटरसोबत काम करत होती. पण या व्यवहाराचे दुसरे टोक भारतात होते. मग भारतातले भागीदार कोण ? हे नक्की करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्यात आले.

पार्थेबन पकडला गेला आहे हे जाहीर न करता त्याला ज्याप्रमाणे सूचना दिल्या गेल्या आहेत त्याच प्रमाणे वागण्याचे सांगण्यात आले. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सेल्फी आणि फोटो काढण्याची आज्ञा टोळीने दिली असल्याने ज्या हॉटेलमध्ये पार्थेबन उतरणार होता त्या हॉटेलचे फोटो पाठवण्यात आले. यामुळे भारतातले आयव्हीएफ सेंटर डीआरआयने छापा मारेपर्यंत गाफिलच राहीले. थोड्याच वेळात पार्थेबनची वरात मुंबईतल्या डॉ. गोरल गांधी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या इंडो-निप्पॉन आयव्हीएफ सेंटरपर्यंत पोहचली. 

कोण आहेत डॉ. गोरल गांधी?

(डॉ. गोरल गांधी)

डॉ. गोरल गांधी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या Clinical Embryologist आहेत. देश-परदेशात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आयव्हीएफ क्लिनीक्स उभी राहिली आहेत. पाचशेहून अधिक आयव्हीएफ तंत्रज्ञांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. आयव्हीएफद्वारे सर्वाधिक अपत्य प्राप्तीचा उच्चांक त्यांच्या नावावर आहे. फ्रोजन एंब्रियो म्हणजेच गोठवलेला गर्भ वापरून संतती मिळवून देणे या क्षेत्रात त्यांचे विशेष नाव आहे. 

पुढे काय झाले ?

(डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स)

स्टिंग ऑपरेशन करणारी डीआरआयची टीम इंडो-निप्पॉन पर्यंत म्हणजे गोरल गांधींच्या क्लिनिकला पोहचली. त्यानंतर ती डिलीव्हरी तेथे स्वीकारण्यात आल्यावर डीआरआयच्या टीमने परिस्थितीचा ताबा घेतला. डॉ. गोरल गांधींना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले आणि आपला या तस्करीशी काहीच संबंध नसल्याचा दावा केला. डीआरआयच्या मते डॉ. गोरल गांधी यांना या तस्करीची माहिती होती. त्यानुसार त्यांनी डॉ. गोरल गांधी यांची चौकशी सुरु केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसात डॉ. गोरल गांधी यांचे काही आक्षेपार्ह टेक्स्ट मेसेजेसही डीआरआयच्या हातात सापडले आहेत. डॉ. गोरल गांधी यांच्या वकिलांनी हा प्रतिस्पर्धी गटांनी केलेला कट आहे असे निवेदन कोर्टात केले आहे. सध्या तरी कोर्टात पहिल्या सुनावणीत डॉ. गोरल गांधींना तात्पुरते का होईना अभय मिळाल्याचे दिसते आहे.पार्थेबन दुराई तुरुंगात आहे. खटला भारतीय कोर्टांच्या गतीने पुढे चालला आहे.

या मालिकेच्या पहिल्या आणि दुसर्‍या भागात जे जसे घडले, ते आम्ही वाचकांसमोर मांडले आहे. विज्ञानाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यांचे बाजारीकरण होते आहे. केवळ बाजारीकरण नव्हे, तर गुन्हेगारीच्या स्वरुपाचे बाजारीकरण होते आहे. सरकार वेळोवेळी कायद्याच्या चौकटी आखून विज्ञानाला गुन्हेगारी बाजारीकरणापासून दूर करण्याचा प्रयत्न करते आहे. पण एकूण परिस्थिती 'धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं ' अशी आहे. मानवी जीव ही व्यापार करण्याची वस्तू नाही हे सांगणे हा या लेखमालिकेचा खटाटोप होता. 

२०१८ च्या सरोगसी अ‍ॅक्टनुसार-

१. केवळ परोपकारी हेतूने प्रेरीत सरोगसीची परवानगी आहे.व्यापारी हेतूने केलेल्या सरोगसीवर पूर्णपणे बंदी आहे 
२. ओव्हम, एंब्रियो यांच्या विक्रीवर पूर्ण बंदी आहे. 
३. एंब्रियो आयात करण्यावरही पूर्ण बंदी आहे. या कायद्याचा भंग करणार्‍याला दहा वर्षे तुरुंगवास आणि दहा लाखापर्यंतचा दंंड अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. पण अपत्यप्राप्तीसाठी कोणी कोणत्या मार्गाचा स्वीकार करावा हा नैतिकतेचा प्रश्न आहे. 

तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत.

 

आणखी वाचा :

सरोगसीचा व्यापार कसा चालत असे? कायद्याची गरज निर्माण करणारे 'बेबी मंजी' प्रकरण काय होते?

स्त्री बीजांडाचा व्यापार कसा होतो? पैसे कमावण्याच्या या मार्गाला विरोध का असावा?

सबस्क्राईब करा

* indicates required