रुग्णाच्या जीवाशी केलेला खेळ आला जॉन्सन अँड जॉन्सनच्या अंगलट....प्रत्येक रुग्णाला मिळणार २० लाख रुपये !!

मंडळी, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे एकेक घोटाळे उघड होत आहेत. या आधी त्यांच्या ‘बेबी पावडर’, बेबी सोपवर अनेक खटले दाखल करण्यात आले होते. आणि आता त्यांच्या ‘हिप ट्रान्सप्लान्ट’ (खुबारोपण) मधल्या घोटाळयावरून त्यांना दंड ठोठावण्यात आलाय. या दंडाची किंमत आहे प्रत्येक रुग्णाला २० लाख रुपये.

चला तर जाणून घेऊया हे प्रकरण आहे तरी काय !!

साधारण माणसाला जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी लहानबाळांसाठी प्रोडक्ट बनवते एवढंच माहित असतं. पण या कंपनीचा कारभार मोठा आहे राव. त्यातलाच एक उद्योग म्हणजे खुबारोपणासाठी ‘खुबे’ पुरवणे. खुबा रोपणात या फोटोत दाखवल्याप्रमाणे उखळीचा सांधा बदलण्यात येतो. हाडांना जोडणारा हा भाग धातूच्या भागाने जोडला जातो.

स्रोत

तर, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने पुरवलेल्या या भागात दोष होता. या दोषामुळे रुग्णाचा त्रास तर कमी झाला नाहीच, उलट नवीन त्रास निर्माण झाला. खुब्याचा पार्ट तयार करण्यासाठी वापरलेला धातू निकृष्ट दर्जाचा होता. या धातुमुळे त्या जागी इन्फेक्शनही झालं. काही केसेसमध्ये हाडांमध्ये फ्रॅक्चर सुद्धा झालं.  असे सदोष खुबे एक दोन नव्हे, तर तब्बल ४७०० रुग्णांना बसवण्यात आले आहेत.

भारतीय ड्रग रेग्युलेटरने दिलेल्या आदेशानुसार या सर्व लोकांचा पत्ता लावून त्यांना प्रत्येकी २० लाख रुपये दिले जावेत. यासोबतच कंपनीच्या गलथान कारभारामुळे २०२५ पर्यंत होणाऱ्या आणखी शस्त्रक्रिया आणि खर्चाचा बोजा कंपनीनेच उचलावा, असंही तो आदेश म्हणतो. 

राव, समस्या इथेच संपलेली नाही. जॉन्सन अँड जॉन्सनने २०१० पर्यंत सर्व ट्रान्स्पप्लांट मागे घेतले होते. २००४ ते २०१० पर्यंतच्या सर्जरीजमध्ये हे खुबे वापरण्यात आले होते. आता समस्या अशी आहे की कोणकोणत्या रुग्णांना जॉन्सन अँड जॉन्सनचे खुबे लावण्यात आले होते हे शोधून काढावं लागेल. या सर्वांना शोधणं तितकं सोप्पं नाही. ४७०० रुग्णांपैकी ३६०० रुग्णांचा शोध लागलेला नाही. आदेशानुसार उरलेल्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीला प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्यावी लागणार आहे.

स्रोत

मंडळी, कंपनी रुग्णांपर्यंत कधी पोहोचेल ते सांगता येत नाही. पण रुग्ण कंपनीपर्यंत लगेचच पोहोचू शकतात. जर तुमच्या घरातल्या, नातेवाइकांमधल्या किंवा ओळखीतल्या कोणाचं २००४ ते २०१० दरम्यान ‘हिप ट्रान्सप्लान्ट’ झालं असेल, तर ASR च्या 0008 0065 01713 (toll free for TATA subscribers) 0008 आणि 0065 00226 (toll free for Airtel subscribers) या हेल्पलाईनवर संपर्क करून आपल्या सर्जरीची माहिती देऊ शकता.

राव, खरं तर आपल्याला थोडी उशिराच जाग आली. खरं तर जॉन्सन अँड जॉन्सनवर अमेरिकेसह ऑस्ट्रेलियानेसुद्धा कायदेशीर कारवाई खूप पूर्वीच केली आहे. अमेरिकेने तर जॉन्सन अँड जॉन्सनला २५० कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला होता. जवळजवळ एवढीच भारी किंमत त्यांना ऑस्ट्रेलियामध्येसुद्धा मोजावी लागली होती. पण म्हणतात ना ‘देर आये दुरुस्त आये !!’

सबस्क्राईब करा

* indicates required