३० पर्यंतचे पाढे म्हणा आणि वर्गणी घ्या....कोणी घातली आहे ही आगळीवेगळी अट !!

गणपती बाप्पाचं आगमन थोड्याच दिवसात होईल. गणेश मंडळं सध्या वर्गणी गोळा करण्याच्या अवघड कामावर फिरत आहेत. “बाबा घरी नाहीत” पासून ते “अजून पगार झालेला नाही”, “आम्ही दुसऱ्या मंडळाला आधीच वर्गणी दिली आहे”, “एवढी वर्गणी घेऊन करता काय” वगैरे कारणं त्यांना ऐकावी लागतायत. हे तर दरवर्षीचं झालं राव. सध्या जोरदार चर्चा आहे ती एका अटीची.
काय आहे ना, जळगावमधील जामनेरच्या 'जडे बंधूं ज्वेलर्स'नी गणेश मंडळांना एक अट घातली आहे. वर्गणी हवी असेल तर ३० पर्यंतचे पाढे म्हणा आणि वर्गणी घेऊन जा. ही अजबगजब अट ऐकून चक्राऊन गेलात ना ? यामागे एक चांगली कल्पना आहे. ते आधी समजून घेऊ...
तर, गणेश चतुर्थीत मुलं हिरीरीने भाग घेतात. वर्गणी गोळा करण्यापासून ते, मंडप बांधणे, सुशोभीकरण, प्रसाद, इत्यादी कामात बच्चे कंपनी असते. या सगळ्या कामात त्यांचा अभ्यास बाजूला पडतो. गणेश चतुर्थीच्या उत्साहात अभ्यास मागे राहू नये, मुलांनी मंडळाच्या कामासोबत अभ्यास सुद्धा करावा या कल्पनेतून ही अट घालण्यात आली. म्हणजे अभ्यासही होईल आणि गणेश चतुर्थीचा उत्साह सुद्धा अबाधित राहील.
आहे की नाही भन्नाट कल्पना ?
आपली बच्चे कंपनी सुद्धा मागे नाही राव. या अटीला कोण घाबरतंय ? काही मुलांनी तर चक्क ३० पर्यंतचे पाढे म्हणून दाखवलेत आणि वर्गणी मिळवली आहे. पण काहींना पाढे येत नसल्याने रिकाम्या हाती परतावं लागलं. यावर्षीच्या गणेश चतुर्थीचं हे पाहिलं आकर्षण म्हणावं लागेल राव.