बायकोसाठी आणलेलं गिफ्ट तुम्ही रेल्वेत विसरलात तर काय होतं ?? जाणून घ्याच हा किस्सा नक्की काय घडलं ते

राव, बायकोला देण्यासाठी आणलेलं गिफ्ट जर तुम्ही विसरलात तर ? लग्न झालेल्या मंडळींना नक्कीच घाम फुटला असणार. असाच काहीसा प्रकार सागर मवाणी सोबत घडला. सागरने विद्याविहार वरून कल्याण ट्रेन पकडली आणि तो ठाकुर्लीला उतरला. पण उतरताना तो सोबतची बॅग घ्यायला विसरला होता. या बॅगेत त्याच्या बायकोसाठीचं गिफ्ट होतं. मग काय त्याची भंबेरी उडाली ना.

त्याने लगेचच १८२ या RPF हेल्पलाईनला फोन लावला. पण कोणीच फोन उचलला नाही. मग शेवटी त्याने ट्विटर वरून ‘मध्य रेल्वेला’ बॅग ट्रेन मध्ये राहिल्याची माहिती दिली. या माहितीत त्याने लिहिलं होतं की मी ८.०१ मिनिटांनी विद्याविहार येथून कल्याण ट्रेन पकडली आणि ८.५८ मिनिटांनी ठाकुर्लीला उतरलो. माझ्याकडे असलेली पेपरबॅग मी ट्रेन मध्येच विसरलोय. बॅगेत ‘सलोनी’ लिहिलेलं माझ्या बायकोसाठीचं गिफ्ट आहे. मी चौथ्या कोच मध्ये बसलो होतो. मला बॅग परत कशी मिळेल ?’  त्यानंतर लगेचच सेन्ट्रल रेल्वेने RPF ला मदत करण्यास सांगितलं.

चक्क १५ मिनिटापेक्षा कमी वेळात सागरकडे त्याची बॅग पुन्हा आलेली होती.

या दरम्यान त्याला अनेकांनी सल्ले दिले. एकाने तर गमतीत म्हटलं की ‘तू बायकोचं गिफ्ट हरवून किती मोठा गुन्हा केलायस माहित आहे का ?’. शेवटी गिफ्ट परत मिळाल्या नंतर सागरने म्हटलं की आता मी शांततेत रात्रीचं जेवण उरकू शकतो.

त्याने रेल्वेचे आभार मानलेत. मध्यरेल्वेने आणि सोबतच RPF टीमने अत्यंत जलद हालचाली करून सागरला त्याचं गिफ्ट परत मिळवून दिलं. याची तुलना धोनीच्या स्टंपींग सोबतच होऊ शकते....नाही का ? यानंतर ही बातमी सोशल मिडीयावर पसरली आहे. लोक रेल्वे विभागाचं कौतुक करतायत.

राव, बायकोचं गिफ्ट हरवणं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. तुम्हाला आठवत असेलच पूर्वी ‘मेन विल बी मेन’ची एक जाहिरात यायची. त्यात आपल्या सुमित राघवनने काम केलं होतं. बायकोचा वाढदिवस विसरलेल्या व्यक्तीची त्याने भूमिका केली होती. आम्हीच सगळी ष्टोरी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघून घ्या ना.

सबस्क्राईब करा

* indicates required