computer

भूक लागल्यावर पोटातून गुरगुरण्याचा आवाज का येतो? या मागचं शास्त्रीय कारण जाणून घ्या !!

बऱ्याचदा अनेक लोकांना पोटातून आवाज येतो असे जाणवत असेल. सामान्यतः याला पोटातून गुरगुरण्याचा किंवा गुरगळण्याचा आवाज येत आहे असंही म्हणतात. कधी हे आवाज अगदी सौम्य असतात तर कधीकधी आवाज इतका मोठा असतो की शांतता असेल तर शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही तो ऐकू जातो. हा पोटातून गुरगुरण्याचा आवाज का येत असेल? या आवाजाचे शास्त्रीय कारण आज आपण समजून घेऊयात.

वैद्यकीय तज्ञांनुसार पोटातून गुरगुरण्याचा आवाज येण्याची बरीच कारणे असू शकतात. तरीही मुख्यतः भूक लागल्यानंतर हा आवाज येतो. हा आवाज जरी पोटातून येतो असे वाटत असले तरी कधीकधी लहान आतड्यातूनही येतो. भुकेमुळे पोट आणि आतडे रिकामे होते तेव्हा आवाज जोरात येतो. अशावेळी आपली पचनसंस्था अन्नाशिवाय काम करत राहते आणि या क्रमाने पोटातील ग्रंथी एकत्र होतात. रिकाम्या पोटामुळे तेथे असलेला वायू आणि आतड्यात असलेल्या पाचक घटकांमुळे (enzymes) आवाज निर्माण होतात.

बराच काळ उपवास घडला तर जसा आवाज येतो तसाच घाईघाईने जेवल्यावरही असे आवाज येऊ शकतात. कारण, घाईत जेवल्याने जेवणाबरोबरच बरीच हवाही त्यांच्या पोटात जाते. जेव्हा हा आहार अन्ननलिकेतून खाली उतरतो तेव्हा ती हवा देखील उतरते त्यामुळेही पोटातून आवाज निघतो.

याखेरीज जेव्हा खाण्याची प्रक्रिया थांबते तेव्हा वायू तयार होतो. सोप्या शब्दात सांगण्याचे तर उपवासामुळे पोटात वायू (गॅस) तयार होतो. काही लोकांच्या शरीरात सामान्य लोकांपेक्षा जास्त वायू तयार होतो. यामुळे त्यांच्या पोटातून गुरगुरण्याचा आवाज येतो. पोटात आणि लहान आतड्यात बरेच स्नायू असतात. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट ही एक पोकळ नलिका असते जी तोंडातून गुद्द्वारापर्यंत जाते आणि त्याच्या भिंती मुख्यतः गुळगुळीत स्नायूंच्या थरांनी बनवलेल्या असतात. जेव्हा या भिंती सक्रिय होतात तेव्हा पोट आणि लहान आतड्यांमधून अन्न, वायू आणि द्रव्यांचे मिश्रण एकत्र होते व त्याचा आवाज होतो.

डॉक्टर नेहमी सल्ला देतात जास्त काळ उपाशी राहू नये. त्यामुळे असे आवाज येत असल्यास लगेच काहीतरी खा. दोन जेवणांमध्ये मोठं अंतर असल्यास अशी समस्या येते. जास्त काळ उपाशी राहिल्यानंतर जेव्हा घाईत जेवण करता तेव्हा पचनक्रियेमध्ये त्रास जाणवतो. यामुळेही पोटातून आवाज येतात. म्हणून न्याहारी आणि सकाळचे जेवण व रात्रीच्या जेवणाच्या मध्ये खूप लांब अंतर असू नये. उपासामुळे रक्तातील साखर कमी होते त्यामुळेही हा आवाजाचा त्रास वाढतो. उपासामुळे तयार होणारे आवाज १० ते २० मिनिटे चालतात. आणि समजा अन्न पोटात गेले नाही तर पुढचे दीड दोन तासांनी परत येतात. त्यामुळेच दर २ दोन तासांनी खाण्याचा सल्ला दिला जातो.

तर पोटातून आवाज येण्यामागे एवढे मोठे शास्त्रीय कारण आहे. हे कारण तुम्हाला ठाऊक होते का?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required