computer

हा व्हायरल फोटो बघितला ? आता त्या मागची गोष्ट आणि त्यामुळे घडलेला बदलही जाणून घ्या !!

(फोटो सौजन्य : मुंबई मिरर)

टाटा मेमोरियल हॉस्पिटल बाहेरचा तो फोटो तुम्ही पाहिलाच असेल. पुलाच्या खाली एक म्हातारा माणूस हातात सलाईनची बाटली पकडून बसला आहे. हा फोटो आपल्या देशातील आरोग्य सेवेची काळी बाजू दाखवणारा होता. फोटोबद्दल जाणून घेण्यापूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे कॅन्सरवरच्या उपचाराचं देशातील सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक आहे. मेमोरियलमध्ये दरवर्षी ६५००० रुग्ण नव्याने दाखल होतात.  पाठपुराव्यासाठी ४,५०,००० लाख रुग्णांची ये जा असते. एवढ्या मोठ्याप्रमाणात कॅन्सरवर उपचार करणाऱ्या केंद्रात मात्र रुग्णांना राहण्यासाठी पुरेशी जागा नाही. हॉस्पिटलने दिलेली मोफत जागा भरलेली आहे. हॉस्पिटलच्या आवारातली जागाही शिल्लक नाही. शिवाय सामाजिक संस्थांनी दिलेल्या जागाही भरलेल्या आहेत.

धर्मशाळांमध्ये १०० रुपये प्रत्येकी दिवस या हिशोबाने राहण्यासाठी जागा उपलब्ध होते, पण देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गरीब जनतेसाठी ही रक्कम पण मोठी आहे. अशा रुग्णांची एक शाखा आता हिंदमाता फ्लायओव्हरच्या खाली तयार झाली आहे. यातील बऱ्याचशा रुग्णांचं नुकतंच ऑपरेशन झालं आहे. त्यांना पूर्णपणे विश्रांती घ्यायला सांगण्यात आलंय.

याबद्दल माहिती देणारी बातमी मुंबई मिररने छापली होती. या बातमीसोबत दिलेल्या फोटोंनी लोकांची झोप उडवली.

या बातमीमुळे आता एक चांगली बातमी आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या रुग्णांना सुरक्षित आणि स्वच्छ जागी हलवण्यास सुरुवात केली आहे. यापुढे हे रुग्ण दादरच्या धर्मशाळेत आणि केइएम रुग्णालयात राहतील. रुग्णांना स्वच्छ पाणी आणि शौचालय मिळेल याची खात्री घेण्यात आली आहे. हा पाहा त्या आजोबांचा फोटो. या आजोबांचं नाव रामजतन तानी आहे. ते उत्तर प्रदेशच्या भागलपूर येथून तोंडाच्या कॅन्सवर उपचार घेण्यासाठी आले होते. नुकतंच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

बीएमसीच्या पुढाकारानंतर आता सामाजिक संस्थाही पुढे आल्या आहेत. काही रुग्णांची जबाबदारी आता या सामाजिक संस्था घेतील.

वाईट बातमीनंतर आलेला हा चांगला बदलही कौतुकास्पद आहे. जीवघेण्या कॅन्सरशी लढताना कोणत्याही रुग्णाला अशा परिस्थितीला सामोरं जावं लागू नये एवढंच वाटतं.

सबस्क्राईब करा

* indicates required