computer

'व्हिटॅमिन डी', रोगप्रतिकारशक्ती आणि कोरोनाशी लढाई यांचा परस्परसंबंध काय आहे ?

व्हिटॅमिन डी हे महत्वाचं जीवनसत्व आहे. आपल्या शरीरात अनेक महत्वाच्या भूमिका हे जीवनसत्व बजावत असते. शरीरातल्या प्रतिकारशक्तीसाठी हे खूप आवश्यक आहे. असे असूनदेखील अनेकजण व्हिटॅमिन डीच्या कोरोनाचे लक्षण कमी करण्याच्या क्षमतेबद्दल साशंक आहेत. अजूनही कोरोनासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि वैयक्तिक सुरक्षा यांचाच उपाय म्हणून उपयोग करणे महत्वाचे ठरत आहे. अनेक संशोधनांनुसार शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी असणे हे तुमचे आरोग्य चांगले असण्यासाठी तसेच अनेक रोगांना रोखण्यासाठी सुध्दा मदत करत असते. या लेखात आपण व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारशक्तीवर कसा प्रभाव पाडत असते आणि या पोषकत्त्वांचे सेवन कशाप्रकारे श्वसनप्रक्रियेतील अडथळ्यांना दूर करू शकते हे बघणार आहोत.

व्हिटॅमिन डी हे आपल्या रोगप्रतिकार प्रणालीसाठी खूप आवश्यक आहे. हेच आपल्या शरीरात होणारे इन्फेक्शन आणि आजारांशी लढण्याचे पहिले शस्त्र असते.

व्हिटॅमिन डी हे इम्युन सेल्स, टी सेल्स आणि मॅक्रोफेजेस वाढवत असते. हे शरीराचे रोगजंतूंपासून रक्षण करत असते. व्हिटॅमिन डी ची कमतरता इन्फेक्शन, अनेक रोग आणि प्रतिकारक्षमतेशी निगडित आजारांना थेट आमंत्रण ठरू शकते.

व्हिटॅमिन डीची कमतरता ही टीबी, अस्थमा, सीओपीडी सारखे गंभीर आजार तसेच बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढवत असते. सोबतच फुफ्फुसाचे काम व्यवस्थित होण्यासाठीसुद्धा व्हिटॅमिन डी महत्वाचे आहे.

मागे १४ देशांतल्या ११,३२१ लोकांवर एक चाचणी घेण्यात आली. त्यात असे आढळून आले की व्हिटॅमिन डी श्वसनविषयक इन्फेक्शन होण्यापासून व्हिटॅमिन डी आपल्याला वाचवत असते. याचाच अर्थ व्हिटॅमिन डी ज्यांच्यात योग्य प्रमाणात आहे त्यांची प्रतिकारशक्ती इतरांच्या मानाने चांगली असते.

यात असेही आढळून आले की व्हिटॅमिन डीचे नियमित सेवन प्रभावशाली आहे. मात्र हेच जास्त दिवसांच्या अंतराने घेतले तर त्याचा विशेष प्रभाव होत नाही. याचबरोबर हे वृद्धांमधील मृत्युदरसुद्धा कमी करत असलेले पाहायला मिळते. कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे हे तर सर्वांना माहित आहेच.

व्हिटामिन डीची कमतरता शरीरात सायटोकिन स्टॉर्म नावाची प्रोसेस वाढण्यात मदत करत असते. आता तुम्ही म्हणाल ही सायटोकिन स्टॉर्म काय भानगड आहे? सायटोकिन्स हे प्रतीकारप्रणालीचा महत्वाचा भाग असलेले प्रोटिन्स असतात. यात प्रो आणि अँटी दोन्ही इंफ्लामेट्री इफेक्ट्स असतात आणि ते महत्वाची भूमिका बजावत असतात. सायटोकिन स्टॉर्म म्हणजे हाताबाहेर जाणारे प्रो-इंफ्लामेट्री सायटोकिन्स रिलीज होणे. यामुळे इन्फेक्शन वाढण्याचा धोका असतो. हे असे होणे अनेक टिश्यूंचे नुकसान आणि आजारांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकते.

कोरोनाच्या बऱ्याच पेशन्ट्समध्ये सायटोकिन्स रिलीज झाल्याचे पाहायला मिळते. त्यात मुख्यत्वे इंटरल्यूकीन 1(IL1) आणि इंटरल्युकीन 6 यांचा समावेश असतो. यामुळेच अनेक संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की व्हिटॅमिन डी ची कमतरता असणे कोरोनाची तीव्रता वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, तर व्हिटॅमिन डीचे सेवन कोरोनाचा धोका कमी करू शकतो.

सध्या अनेक ठिकाणी व्हिटॅमिन डी चा किती डोस कोरोना पेशन्ट्ससाठी फायदेमंद ठरू शकतो याच्या चाचण्या सुरू आहेत. एवढे सगळे असले तरी फक्त व्हिटॅमिन डीचे सेवन आपलं संरक्षण करु शकेल असे समजणे योग्य होणार नाही. व्हिटॅमिन डी चा डोस किती घ्यायचा हे तुमच्या ब्लड लेव्हलवर अवलंबून असले तरी साधारणपणे 1000 ते 4000 iu हे योग्य प्रमाण आहे. एवढे सगळे असून देखील एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की कोणतेही औषध -मग त्यात व्हिटॅमिन डी देखील आले- तुमचे कोरोनापासून पूर्णपणे रक्षण करेल असे सिद्ध झालेले नाही. आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत हे ही तितकेच खरे आहे.

 

संदर्भ- https://www.healthline.com/nutrition/vitamin-d-coronavirus#11

 

आणखी वाचा :

उत्तम आरोग्यासाठी जाणून घ्या ई-जीवनसत्वाचे फायदे !!

कोणत्या पालेभाज्या, फळे, डाळी आणि बियांमधून सहजपणे 'क' जीवनसत्व मिळवाल?

सबस्क्राईब करा

* indicates required