computer

DRDOने कोडावर औषध आणलंय भाऊ. काय आहेत या रोगाची कारणं आणि त्याबद्दलचे गैरसमज?

कोड म्हणजे ‘व्हिटीलोगो’ हा एक त्वचेचा विकार आहे. कोड आल्यावर शरीरावर पांढरे डाग उठतात. हे डाग संसर्गजन्य नसतात. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते संक्रमित होत नाहीत. असं असलं तरी या एका विकाराने अनेक मुलींचे आयुष्य संपून जातं. त्यांचं लग्न होत नाही. लग्नानंतर कोड आले तर घटस्फोट होतो. लग्न ठरवताना मुलीला कोड आहेत का हे तपासलं जातं.

आज कोडाबद्दल सांगण्यामागचं कारण म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने (DRDO) नुकतंच कोडावर औषध शोधून काढलं आहे. या औषधाने कोडग्रस्त असलेल्या अनेकांना फायदा होईल. त्यानिमित्ताने बोभाटा तुम्हाला कोडाविषयी सगळी माहिती सांगणार आहे.

कोड का होतो?

कोड हा पूर्वी कुष्ठरोगाचा प्रकार समजला जायचा. पण कोड म्हणजे कुष्ठरोग नाही. कोड का होतो याची अनेक कारणं देता येतील. पहिलं कारण म्हणजे हा आजार अनुवांशिक आहे. घरात जर कोणाला कोड झाला असेल तर तो पुढच्या पिढीलाही होण्याची शक्यता असते.

दुसरं कारण म्हणजे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती. रोगप्रतिकारशक्ती तयार करणाऱ्या पेशींचा शरीरालाच त्रास होतो. ह्यामुळे त्वचेचा रंग बनवणाऱ्या मेलॅनोसाइट पेशी कमी होतात. काहीवेळा मेलॅनोसाइट पेशींचं काम बंद पडतं. याचा परिणाम होऊन शरीरावर पांढरे डाग उठतात. हे डाग कालांतराने मोठे होत जातात. मान, हात, कंबर, चेहरा आणि ओठांवर प्रामुख्याने कोड उठतात. शरीराच्या दर्शिनी भागावर कोड होत असल्याने कोडाविषयी गैरसमज पसरले आहेत.

कोडावविषयी असलेले गैरसमज

कोड हा संसर्गजन्य आहे असा फार मोठा गैरसमज असतो. त्यामुळेच कोड झालेल्या व्यक्तीला वाळीत टाकले जाते. कोड झालेल्या व्यक्तीसोबत राहिल्याने, खाल्ल्याने, संपर्काने कोड होत नाही. तो एक ऑटो इम्यून सिंड्रोम आहे. महत्वाचं म्हणजे तो जीवघेणा आजार नाही.

दुसरा गैरसमज असा की कोड होण्यामागे विशिष्ट अन्नपदार्थ कारणीभूत असतात. लोकांना वाटतं की आंबट पदार्थ खाल्यास, मासे खाऊन दूध प्यायल्यास किंवा पांढरे पदार्थ खाल्यास कोड होतो. खरंतर कोड अन्नपदार्थामुळे होतच नाही.

तिसरा गैरसमज होतो तो डाग बघितल्यावर. जन्मतःच पांढरे डाग असणे म्हणजे कोड नव्हे. त्याला Albino म्हणतात. तसेच हा कुष्ठरोगसुद्धा नाही. शरीरावर असे पांढरे डाग असू शकतात, पण याचा अर्थ तो कोड आहे असा होत नाही. कोडाचे डाग ओळखण्याचा एक मार्ग आहे. बरेचदा या डागांवर दाह जाणवतो. तसेच हे डाग चमकतात. इतर पांढऱ्या डागांमध्ये आणि कोडाच्या डागांमध्ये हे मुलभूत फरक आहेत.

कोडावर उपचार

कोड मुळातून नष्ट करेल असं कोणतंच औषध कालपर्यंत उपलब्ध नव्हतं. याचा फायदा घेऊन अनेक खोट्या डॉक्टरांनी खोटी औषधं विकून लोकांना फसवलं आहे. पण योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती औषधं घेतल्यास कोडावर मात करता येते.

एक महत्वाची बाब म्हणजे या बऱ्याचदा औषधांनी पण रुग्णाच्या समस्यांमध्ये वाढ केली आहे. ही औषधं महाग असायची आणि त्यांचे दुष्परिणाम असायचे. जळजळ, फोड, सूज येणे यांसारख्या समस्या उत्पन्न व्हायच्या. DRDO ने शोधून काढलेल्या औषधाने या समस्या होणार नाहीत असं म्हटलं जात आहे.

तर मंडळी, कोड हा शाप नाही, तर तोही एक सर्वसामान्य आजार आहे. DRDO ने शोधलेल्या औषधामुळे हा गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल.