computer

स्त्रियांपेक्षा पुरुषांना टक्कल लवकर पडते. हे आहे शास्त्रीय कारण...

साधारणपणे वयाची ठराविक वर्ष ओलांडल्यावर स्त्रिया आणि पुरुषांमध्ये अनेक शारिरीक बदल जाणवतात. शरीराची हळूहळू झीज सुरु होते.. समजा आहार आणि व्यायामाची जोड नसेल तर एखादी व्याधीही जडते. पण याशिवाय असेही काही बदल होतात जे नैसर्गिक असतात. म्हणजे आपल्या डोक्यावर असलेल्या केसांचे पाहा. स्त्रियांपेक्षा पुरुषांना टक्कल लवकर पडायला सुरु होते. बरेच जण म्हणतात पुरुषांवर जास्त जबाबदारी असते म्हणून टक्कल पडतं. तर काही जण म्हणतात हे अनुवांशिक घडतं. आज आपण वैज्ञानिकदृष्ट्या पाहूयात की स्त्रियांपेक्षा पुरुषांना टक्कल का लवकर पडते ?

वैज्ञानिकदृष्ट्या केसांची वाढ किंवा गळणे या दोन्हीमागे हार्मोन्स महत्वाचे काम करतात. टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांमध्ये स्रवणारा एंड्रोजन ग्रुपचा एक स्टिरॉइड हार्मोन आहे. जेव्हा काही एन्झाईम टेस्टोस्टेरॉनला डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉन (DHT) मध्ये रूपांतरित करतात तेव्हा हे DHT टेस्टोस्टेरॉन केसांच्या मुळांवर हल्ला करते. त्यामुळे केस वेगाने गळू लागतात आणि काही दिवसातच टक्कल पडते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे एन्झाईम्स आनुवंशिक असतात. त्यामुळे काही कुटुंबात पिढ्यानपिढ्या टक्कल पडलेले पुरुष आपण पाहिले असतील. टक्कल पडण्याची समस्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. म्हणजेच जर वडिलांना टक्कल पडण्याची समस्या असेल तर मुलालाही त्याची समस्या असू शकते.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्राव नगण्य असतो. स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्राव होतो. पंरतु त्यासोबत इस्ट्रोजेन नावाचा हार्मोनही स्राव होतो. त्यामुळे महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रियाही कमी असते.

डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉनचे प्रमाणक कमी असल्याने स्त्रियांमध्ये विशेष टक्कल पडत नाही.. काहीवेळा गर्भधारणेदरम्यान किंवा रजोनिवृत्ती दरम्यान डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉन तयार करण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांना केस गळण्याची समस्या देखील होते. पण काही काळानंतर केस पुन्हा येतात.

हेच कारण आहे की स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये टक्कल लवकर पडते.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required