computer

कॉफी बनवण्याच्या १२ पद्धती!! यांतली कोणती कॉफी तुमच्या आवडीची आहे?

कॉफी!! या शब्दातच जणू काही तरतरी आहे. चहापेक्षा हिचा दर्जा जरा वेगळा. तरूणाईला जास्त जवळची, उच्चभ्रू वर्गाचे प्रतीक असलेली कॉफी ही स्वभावाने काहीशी शिष्टच! थोडक्यात सांगायचं तर चहा जसा अगदी गरिबातल्या गरिबाला परवडतो, तसे कॉफीचे नाही. ही काहीशी श्रीमंत वर्गाची मक्तेदारी आहे. पण सांस्कृतिक भेद असला तरी कॉफीचे भोक्ते कमी नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी चार मित्रांची मैफल जमलेली असताना गप्पा रंगू लागल्या की हमखास कॉफीचा बूट निघतो. सबमिशन्स, प्रेझेंटेशन्स यासाठी रात्री जागरण होणार असेल तर कॉफीसारखी सोबत नाही. कॉलेजची मुलेमुली जितक्या आवडीने चहाच्या टपरीवर भेटतात तितक्याच आवडीने वेगवेगळ्या कॉफीशॉपमध्येही अड्डे जमवतात. पण आपल्याकडे घरोघरी होणाऱ्या इन्स्टंट कॉफी आणि फिल्टर कॉफीएवढेच कॉफीचे जग मर्यादित नाही. कॉफी बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपल्याला कोणत्या स्वादाची कॉफी आवडते त्यानुसार कॉफीचा ब्रँड बदलतो आणि बनवण्याची पद्धतही! त्यामुळेच कॉफी करताना क्रिएटिव्हिटीला भरपूर वाव आहे आणि कॉफी करण्याच्या अक्षरशः शेकडो पद्धती अस्तित्वात आहेत. आज अशाच काही पद्धतींची ओळख करून घेऊ.
 

ड्रिप पद्धत

आपल्याकडे साउथ इंडियन फिल्टर कॉफी या पद्धतीने तयार करतात. यामध्ये धातूचा फिल्टर वापरलेला असतो. या फिल्टरवर कॉफीची पूड घालून वरच्या भांड्यात उकळते पाणी ओततात. यासाठी मध्यम आकाराचे कण असलेली कॉफी वापरली जाते. कॉफी पाण्यात मिसळून निर्माण होणारा कॉफीचा द्राव खालील भांड्यात पडतो.
 

फ्रेंच प्रेस पॉट

याचे मूळ फ्रान्समधले. हे साधन म्हणजे एक काचेचे भांडे असते आणि त्याच्या झाकणातून एक दांडा आत सोडलेला असतो. या दांड्याला तारेची किंवा नायलॉनची जाळी बसवलेली असते. कॉफी करण्यासाठी यामध्ये कॉफीचे मध्यम आकाराचे कण वापरले जातात. हे कॉफीचे कण या काचेच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये साधारण ९३ ते ९६ डिग्री सेल्सिअस तापमानाचे पाणी ओतले जाते. त्यानंतर दांड्याच्या साह्याने जाळी हळूहळू खाली दाबली जाते. जाळीचा दाब पडल्यामुळे कॉफीमधील सर्व फ्लेवर्स बाहेर पडतात आणि कडक कॉफी तयार होते.
 

एस्प्रेसो

ही मूळची इटालियन कॉफी आहे. यामध्ये कॉफीची बारीक पूड वापरली जाते. बारीक कॉफी पावडरवर उकळते पाणी उच्च दाबाखाली ओतले जाते. यात कॉफीच्या फिल्टरमध्ये एक परडी बसवलेली असते. कॉफी करताना या परडीमध्ये कॉफी पूड दाबून बसवली जाते. गरम पाणी कॉफीच्या पावडरमध्ये असलेल्या छिद्रांमधून जोराने बाहेर आल्यावर त्यात हवा मिसळून कॉफीवर फेस जमा होतो. या फेसाला क्रीमा म्हणतात. या कॉफीचे एस्प्रेसो हे नावही या दाब देण्याच्या क्रियेवरून आले आहे. इटालियन भाषेत एस्प्रेसो कॉफी म्हणजे दाब देऊन तयार केलेली कॉफी(pressed out).
एस्प्रेसो ही जराशी दाटसर कॉफी असते. ही कॉफी कॅपुचिनो, लाते, मकिआतो, अमेरिकानो, मोका अशा अनेक प्रकारच्या कॉफीचा बेस आहे.

व्हॅक्यूम कॉफी

या प्रकारांमध्ये एकावर एक अशी दोन काचेची भांडी रचलेली असतात. यामध्ये कॉफी मुख्यतः वाफेचा दाब आणि गुरुत्वाकर्षण यांच्यामुळे तयार करता येते. या खालच्या भांड्यातील पाणी उकळून त्याची वाफ आणि हवा वरच्या भांड्यातील कॉफीच्या पावडरमध्ये मिसळली जाते. खालच्या भांड्याला उष्णता देणे बंद झाले की वाफ तयार व्हायची थांबते आणि खालच्या भांड्यात एक निर्वात पोकळी म्हणजेच व्याक्युम तयार होते हातावरच्या भांड्यातील हवेचा दाब जास्त होतो आणि त्यामुळे दाबातील फरकामुळे त्या भांड्यातील कॉफीचा द्राव खालच्या भांड्यात खेचला जातो. या कॉफी-मेकरला सिफन कॉफी मेकर असे ही म्हटले जाते. याचा वापर आजकाल बहुधा हॉट कॉकटेल्स व ब्रॉथ बनवण्यासाठी होतो.
 

कॉफी पर्कोलेटर

कॉफी पर्कोलेटर मध्ये गरम पाणी कॉफी पावडर मध्ये परत परत गेल्याने कॉफीमधला सर वर्क या पाण्यात उतरतो त्यामुळे कॉफी चांगलीच कडक आणि कडू होते मात्र ही कॉफी तशीच राहून परत परत गरम केल्यास तिचा स्वाद नाहीसा होऊ शकतो
 

आयब्रिक आकाझेव्ह

या पद्धतीत कॉफी तयार करण्यासाठीचे मिश्रण म्हणजेच पाणी, कॉफी, वेलची इत्यादी एकत्र करून एका अरुंद तोंड असलेल्या भांड्यामध्ये म्हणजे आयब्रिकमध्ये गरम करतात. कॉफी उकळू लागली की भांडे बाजूला काढून कॉफी खाली बसू देतात. ही क्रिया दोन-तीन वेळा करून नंतर कॉफी कपामध्ये ओततात.

मोका पॉट

मोका पॉट हे इटालियन पद्धतीचे कॉफीपात्र आहे. हे पॉट्स स्टीलचे, मेटल किंवा ॲल्युमिनियमचे, विजेवर चालणारे, किंवा गॅसवर ठेवता येण्याजोगे असतात. यात तीन भांडी वापरलेली असतात. या पॉटमधील बॉयलर वापरण्यासाठी एक व्हॉल्व्ह असतो. त्याच्या खाली पाणी असते. या पाण्याच्या वर म्हणजे मधल्या भागात नरसाळ्यासारखे मेटलचे फिल्टर असते. यात कॉफीची पूड घालतात. किटलीच्या वरच्या भागाच्या तळाशी अजून एक गाळणी असते. हे भांडे मध्यम आचेवर ठेवतात. पाणी उकळल्यावर आतील वाफेच्या दाबाने कॉफी किटलीच्या वरच्या भागात उतू लागते. ही कॉफी मग कपमध्ये ओतून सर्व्ह केली जाते.
 

कॅपुचिनो

हिचा उगमसुद्धा इटलीमधलाच. कॅपुचिनो बनवताना निम्मी एस्प्रेसो(एक्स्प्रेसो नाही!) कॉफी आणि निम्मे वाफाळते दूध एकत्र करतात. या कॉफीवर दुधाचा फेस घातलेला असतो. दुधाच्या फेसातून कॉफी ओतल्याने फेसाला कॉफीचा स्वाद लागतो. दुधाला फेस आणण्यासाठी छोटा कॅपुचिनो मेकर वापरतात. साखर घालायची असेल तर ती दुधात घालतात. या कॉफीवर आवडीनुसार कोको पावडर, दालचिनी, जायफळ पूड किंवा व्हॅनिला हे घातले जातात.
 

कोल्ड कॉफी

हा प्रकार ज्यांना थंडगार प्यायला आवडते त्यांच्यासाठी उत्तम आहे. कॉफीमध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालून घुसळल्यावर कॉफी मिल्कशेक तयार होतो.
 

आईस कॉफी

आईस्ड टी प्रमाणेच आईस कॉफी! हा कॉफीचा अजून एक प्रकार आहे. यामध्ये बर्फाच्या चुऱ्यात साखर घातलेली काळी कॉफी घालून सर्व्ह केली जाते.
 

फ्रॉस्टेड मोका

यामध्ये कोल्ड कॉफी, व्हॅनिला आइस्क्रीम, चॉकलेट सिरप हे एकत्र करून घुसळले जाते.

लिकर कॉफी

कॉफीमध्ये आवडीच्या कुठल्याही लिकरचा २५ मिली शॉट घालून ब्रू करतात तेव्हा लिकर कॉफी तयार होते. या कॉफीवर वरून लाईट व्हिप्ड क्रीम घालून ती सर्व्ह केली जाते.यात देशोदेशी बदल केलेले दिसतात. उदाहरणार्थ आयरिश कॉफीमध्ये व्हिस्की वापरली जाते, तर रशियन कॉफीत व्होडका. अनेक ठिकाणी कॉफीमध्ये रमदेखील घालतात.

ही झाली काही प्रकारांची यादी. पण यात अजूनही भर घालता येईल. कॉफी करण्याच्या पद्धतींबद्दल बोलायचे तर ओन्ली स्काय इज द लिमिट. तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर अवश्य आमच्याशी शेअर करा. लेख कसा वाटला तेही कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required