computer

भारतात १,७२,००० वर्षांपूर्वी लुप्त झालेली नदी सापडली आहे...ही माहिती वाचायलाच हवी !!

सृष्टी आज जशी दिसते तशी काही लाख वर्षांपूर्वी नक्कीच नव्हती. हवामानातील बदलांनी समुद्राचा वाळवंट झाला, तर जिथे वाळवंट होतं तिथे हिरवं रान उभं झालं. याचा एक नवीन पुरावा नुकताच पुरातत्वज्ञांच्या हाती लागला आहे. थारच्या वाळवंटात बिकानेरजवळ तब्बल १,७२,००० वर्षं जुनी नदी आढळून आली आहे. ही नदी काळाच्या ओघात लुप्त झाली आणि तिच्या खुणाही उरल्या नाहीत. पण आता तिचा प्रवाह ज्या भागात होता ती जागा शोधण्यात यश आलं आहे.

हा शोध लुप्त झालेल्या संस्कृतीचा मागोवा घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज थारचं वाळवंट कोरडं आणि शुष्क आहे, पण त्या जागी नदी आढळल्याने लाखो वर्षांपूर्वी तिथलं जनजीवन वेगळं असण्याची शक्यता नाकारता येत नाही..

Quaternary Science Reviews या मासिकात या शोधावर लेख छापून आला आहे. जर्मनीची 'दि मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट ऑफ दि सायन्स ऑफ ह्यूमन हिस्टरी' आणि तमिळनाडूच्या ऍना युनिव्हर्सिटीने मिळून या लुप्त झालेल्या नदीवर संशोधन केलं आहे. संशोधनातील एक माहिती असं सांगते की 'अश्मयुगात या ठिकाणी माणसांची वस्ती होती. त्याकाळी हा परिसर आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता.' एक असाही दावा करण्यात येत आहे की या नदीमुळे त्या भागात मानवी वस्ती तर होतीच, पण नदीच्या मार्गानेच माणसाचं स्थलांतरही झालं असावं. या संशोधनामुळे थार वाळवंटातील लुप्त झालेल्या नदींचा अभ्यास आणि घग्गर हकरा नदीच्या अभ्यासात मोठी भर पडणार आहे.

अनेक वर्षांपासून ऋग्वेदात वर्णन केलेल्या आणि आता लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा शोध घेणं सुरु आहे. थार वाळवंटातील नदीमुळे सरस्वती नदीचा अभ्यासही सोपा होणार आहे. कदाचित हीच नदी सरस्वती नदी तर नाही ना याचाही अभ्यास केला जाणार आहे.

वाचकहो, एकूण नवीन अभ्यासाचे मार्ग खुले झाले आहेत. इतिहास सांगतो की मानवी संस्कृती नदीकिनारी वाढली आणि नदी आटल्यामुळे संस्कृती नष्ट झाली किंवा माणसांनी इतरत्र स्थलांतर केलं. पुरातत्त्वशास्त्रातील या नवीन शोधांमुळे त्या हरवलेल्या संस्कृतीचा शोध घेणं आता सोपं होणार आहे.

 

आणखी वाचा :

काय म्हणता, आशियातील सर्वात मोठी लायब्ररी भारतात आहे? हा घ्या पत्ता !!

सबस्क्राईब करा

* indicates required