दिल्लीच्या तरूणाचा अमेझॉनला गंडा : फुकटात मिळवले १६६ स्मार्टफोन!

बर्‍याचदा अॉनलाईन शॉपींग वेबसाईटवर मोबाईल अॉर्डर केल्यानंतर मोबाईलऐवजी साबणाच्या वड्या किंवा रिकामा बॉक्स मिळाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण हा तरूण मात्र भलताच महाठक निघालाय भाऊ! या दिल्लीच्या तरूणाने अमेझॉनला गंडा घालून तब्बल १६६ स्मार्टफोन्स फुकटात मिळवलेत. आणि हे महागडे स्मार्टफोन्स विकून त्याने लाखो रूपयांची कमाईही केलीय.

स्त्रोत 

दिल्लीत राहणार्‍या या २१ वर्षीय शिवम चोप्रा नावाच्या बेरोजगार तरूणानं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंय. शिवम गिफ्ट व्हाऊचर्स वापरून अॅमेझॉनवरून अॅपल, सॅमसंग अशा कंपन्यांचे महागडे मोबाईल मागवायचा. पण मोबाईल मिळाल्यानंतर मात्र आपल्याला मोबाईलऐवजी रिकामा बॉक्स मिळाला, अशी तक्रार कंपनीकडे करून रिफंड मागायचा. बहुतांश वेळा अॉनलाईन व्यवहारात असे घोळ होत असल्याने कंपनीही त्याला त्याचे पैसे परत करायची. रिफंड मिळाल्यानंतर शिवम हे स्मार्टफोन विकून पैसे कमवायचा. अशा प्रकारे त्याने एप्रिल आणि मे या दोन महिन्यात तब्बल १६६ स्मार्टफोन्स फुकटात खरेदी केले अधिक रिफंड म्हणून लाखो रूपयांची कमाईही केली! यासाठी शिवमने वेगवेगळे १४१ मोबाईल नंबर आणि ४८ कस्टमर अकाउंट्सचा वापर केला आहे. कंपनीला संशय येऊ नये यासाठी तो आपल्याच एरियात ठिकाणं बदलून अॉर्डर स्वीकारायचा.

हा रिफंडचा प्रकार वारंवार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली आणि शेवटी पोलिसांनीच शिवमचे हे कारनामे उघड केले. शिवमकडून १२ महागडे फोन, १२ लाखांची रक्कम आणि ४० बँक पासबुक जप्त करण्यात आलेत. शिवम आणि त्याला सिम कार्ड पुरवणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आलीय. तर मंडळी, यालाच म्हणतात चुना लावणं...